मुंबई : शिवसेनेच्या आमदारांबाबत सुरु असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाची काही दिवसांपूर्वी सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेनेच्या आमदारांना कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीनंतर आता पुन्हा एकदा या प्रकरणाला वेग मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे गुरुवारी दिल्लीला रवाना झाल्याने आता या प्रकरणात पुढे काय घडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
गुरुवार, दि. २१ सप्टेंबर रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या दिल्ली दौऱ्यावर आणि अपात्रता प्रकरणावर वक्तव्य केले आहे. नार्वेकर म्हणाले की, ''माझा दिल्ली दौरा पूर्वनियोजित असून माझ्या नियोजित कामांसाठी मी दिल्लीला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने माझ्यावर कुठल्याही प्रकारचे ताशेरे ओढलेले नसून केवळ प्रक्रियेबाबत टिप्पणी केली आहे. आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर कारवाई सुरु असून यात कुठलीही दिरंगाई होणार नाही,'' असे नार्वेकरांनी आश्वस्त केले आहे.
ठाकरे शिंदेंनाही बजावली जाणार नोटीस
दरम्यान, आमदार अपात्रता प्रकरणात आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वतीने दोन्ही गटाच्या प्रमुखांना नोटिसा धाडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभाध्यक्षांकडून शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उबाठा गटाचे गटप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. अपात्रता प्रकरणात दोन्ही गटाच्या प्रमुखांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही नोटीस देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
दैनिक 'मुंबई तरुण भारत' आयोजित MPCB प्रस्तुत 'MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म नक्की भरा!