मुंबई : मालाड पश्चिम येथील श्री साई दर्शन मित्र मंडळ गेल्या ११ वर्षापासुन इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत आहे. दरवर्षी नवनवीन संकल्पनांयुक्त संदेशात्मक बाप्पाचे रूप ते आकारतात. यावर्षीसुद्धा त्यांनी बाप्पाच्या मुर्तीतून नवा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
यावर्षीची मंडळाची मूर्ती पूर्णतः टिश्यु पेपरपासून बनवली असून त्यावर सूर्यफुलाच्या काळ्या-पांढऱ्या बिया, भोपळ्याच्या बिया, चंदन आणि आळशीच्या बिया अशा पाच वेगवेगळ्या प्रकारच्या सेंद्रिय बिया चिकटवल्या आहेत. ही इको फ्रेंडली बियांची गणेशमूर्ती ९ फूट असुन तब्बल १०० किलो वजनाची आहे. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना मूर्ती साकारण्यासाठी ४५ दिवस लागले.
शेतकरी आपल्यासाठी वर्षभर कष्ट करून वेगवेगळ्या प्रकारची भाजी, फळे, धान्य यांचे उत्पादन शेतातून घेतात त्यामुळे त्यांनी पिकवलेल्या गोष्टीतून गणपती तयार करणे. तसेच आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आरोग्यासाठी महत्त्वाच्या या बियांपासून मूर्ती साकारून आरोग्याबाबत संदेश देणे असे या संकल्पनेमागील मुख्य उद्देश असल्याचे मांटू रुईया (मंडळ कार्यकर्ता) यांनी सांगितले.