जीव लावावी अशी बहीण

    21-Sep-2023   
Total Views |
Supriya Sule's jibe at Ajit Pawar during Women's Reservation Bill discussion

सुप्रिया सुळे यांचे म्हणणे की, प्रत्येक घरात बहिणीचे कल्याण करणारा भाऊ नसतो. काय खरे नि काय खोटे? घरोघरी मातीच्याच चुली. भांड्याला भांडे लागतेच. यावर काही लोक म्हणतात भावाने माया लावावी, अशी बहिणाबाईदेखील असायला हवी ना? भावामध्ये गुणवत्ता, योग्यता असूनही बहिणीसाठी कायमच माघार घ्यायची का? तर बहिणीने विनासायास सगळी लाभाची पदे पदरात पाडून घ्यावीत म्हणून हा अन्याय का? याबद्दल अजित पवार स्वतःच म्हटले होते की, त्यांनी शरद पवारांचा पुत्र म्हणून जन्म घेतला नव्हता, त्यामुळे त्यांना हे सगळे सहन करावे लागले. काही महिन्यांपूर्वी शरद पवारांनी ‘निवृत्ती घेणार’ हा विषय घेऊन एक मोठा ‘इव्हेंट’ घडवून आणला. त्यावेळी त्यांच्यानंतर कोण यावर अगदी ‘कौन बनेगा करोडपती’च्या धर्तीवर चर्चा झाली. खरे तर त्यात अजित पवारांचे नाव बहुचर्चित होते. याला कारणेही अनेक आहेत. पण, प्रत्यक्षात जेव्हा पक्षाच्या प्रमुखपदी कोण, अशी कार्यवाही करण्याची वेळ आली, तेव्हा शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळेच या पदासाठी योग्य आहे, असा सूर उमटला. हा सूर उमटवण्यामागचे संगीतकार शरद पवार आहेत, हे काय लपून राहिले? त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी केली. उपमुख्यमंत्रिपद मिळवले. त्यावेळी सगळ्यांना प्रश्न पडला होता की, आता उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणारे अजित पवार यांनी एक-दोन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांशी हात मिळवून पुन्हा माघार का घेतली होती. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, ”मला देवेंद्रजींसोबत पाठवून पुन्हा माघारी परत बोलावले. मी वाईट खलनायक असल्याचे चित्र महाराष्ट्रात बनवले गेले.” अजित जे म्हटले ते बरोबरच होते, तर अजित पवार यांची प्रतिमा मलिन करण्याचा घाट कुणी आणि का घातला? त्यातून कुणाला काय फायदा मिळणार होता. जरा मागोवा घेतला तर जाणवेल की, एखाद्याची प्रतिमा खोटी का होईना, मलिन केली की, दुसर्‍या शून्य प्रतिमा असलेल्या व्यक्तीची प्रतिमा शून्य म्हणून का होईना, समोरच्याला दिसते. काही लोक म्हणतात की, अजित पवार यांना राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या नजरेत खलनायक ठरवून सुप्रिया सुळेंना निष्ठावान-सज्जन दाखवण्याचा प्रयत्न होता. जर हे खरे असेल तर अजित पवार हे म्हणू शकतात की जीव लावावी अशी बहीणही प्रत्येक भावाला लाभत नसते!

राहुल गांधींचा जाती-बुद्धिभेद

भारताच्या प्रशासकीय सेवेत ९० सचिव आहेत. त्यापैकी केवळ तीनच मागासवर्गीय समाजाचे आहेत-इति राहुल गांधी. आपण मोठे निधर्मी आणि पुरोगामी आहोत, याचा आव आणत राहुल गांधीच प्रशासकीय उच्च सेवेतही जातीय आधार मागू शकतात. सत्ताधारी सरकारला विरोध करण्यासाठी आपण काय बोलतो आहोत, कुठे बोलतो आहोत, याचे भान जर राहुल गांधींना असते, तर कदाचित त्यांच्या मातोश्रींना आजही काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय राहावे लागले नसते. असो. ज्यांना वाटते की, राहुल गांधी भोळे आहेत, त्यांना राजकारण कळत नाही, त्यांच्यासाठी राहुल गांधी धूर्त आणि प्रसंगी भारतीयांना जातीपातीत लढवायचे कौशल्य राखतात, हे कळणे गरजेचे आहे. देशात विविध स्तरांवर विविध समाज सातत्याने आरक्षणाच्या मागण्या करीत असतात. संविधानाने दिलेल्या आरक्षणामध्ये बदल करायचा, तर हेच राहुल गांधी आणि त्यांच्या मागे-पुढे फिरणारे चेलेचपाटे म्हणणार संविधानात बदल करणारे हे कोण? संविधान खतरे मे हैं. दुसरीकडे देशाचा कारभार पाहणारा उच्चपदस्थ अधिकारी केवळ भारतीय असतो. त्याचे जगणे मरणे आणि प्रत्येक श्वास प्रत्येक कृती भारताच्या कल्याणासाठी असते. अमूक एक जातीचा अमूक धर्माचा म्हणून तिथे वर्णी लागत नाही.या पार्श्वभूमीवर काँग्रेय पक्ष सत्तेत असताना आणि सोनिया गांधी पक्षाच्या सर्वेसर्वा असताना त्यांच्या आजूबाजूला कोण लोक होते? त्यांचे सल्लागार म्हणून कोण लोक काम करीत होते? आताही राहुल गांधी यांच्या सहकारी टीममध्ये कोण आहेत? खरे तर जातीअंताची लढाई लढण्यासाठी माणसाच्या जातीनिहाय जन्मापेक्षा त्याचे कर्तृत्वाचे मापदंड महत्त्वाचे ठरतात. याचा अर्थ तळागाळातल्या उपेक्षित बांधवांना आरक्षण नको हा नाही, तर ज्याला जिथे आवश्यक आहे, तिथे आरक्षण महत्त्वाचेच. जातीपातीचे राजकारण करीत काही समाजविघातक लोक सदान्कदा देशात आणि समाजात विद्वेष फैलावण्याचा प्रयत्न करतात. आताही राहुल गांधींनी त्यापेक्षा वेगळे काहीही केले नाही. तसेही देशभरात सवर्ण विरुद्ध मागासवर्गीय आणि हिंदू विरुद्ध इतर धर्मीय, अशा काही घटना अपवादाने घडल्या की, राहुल गांधी त्याचे भांडवल करतात. समाजात दुही माजवण्याचाच हा प्रयत्न.

९५९४९६९६३८

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.