नवी दिल्ली : महिला आरक्षण अर्थात नारीशक्ती वंदन अधिनियम संसदेने मंजुर केले आहे. यामुळे भारताची नारीशक्ती आता राष्ट्राचे नेतृत्व करण्यास सज्ज झाली आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या घटनादुरुस्तीवर संसदेने मोहर उमटविली. विधेयकावर राज्यसभेत मतदान होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेस संबोधित केले.
लोकसभेत आणि राज्यसभेत महिला आरक्षण विधेयकावर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली आहे. यामध्ये दोन्ही सभागृहांतील एकूण १३२ सदस्यांनी सहभाग नोंदविला असून ही चर्चा भविष्यातदेखील उपयोगी ठरणार आहे. या विधेयकास सर्व सदस्यांनी पाठिंबा दिल्याने त्यांचे मन:पूर्वक आभार मानत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
देशात या प्रसंगानंतर नवा आत्मविश्वास निर्माण होणार असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, सर्व पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी या विधेयकास पाठिंबा दिला आहे. नारीशक्तीविषयी सर्व राजकीय पक्षांची सकारात्मक भूमिका कौतुकास्पद आहे. या विधेयकाच्या मंजुरीमुळे नव्या विश्वासाने नारीशक्ती राष्ट्राचे नेतृत्व करण्यास सज्ज झाली आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.