नवी दिल्ली : सोमवारपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, मंगळवारी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले. या विधेयकावर आज सभागृहात चर्चा सुरु झाली आहे. यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षाकडून विधेयकावर चर्चेला सुरुवात केली. तर सरकारकडून केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, भारती पवार आणि अपराजिता सारंगी या महिला खासदार आपली भूमिका मांडणार आहेत.
सोनिया गांधींनी आपल्या भाषणात महिला आरक्षण विधेयक आमच्या पार्टीने आणले, असे विधान केले. त्यासोबतच ओबीसी महिलांना आरक्षण देण्याचा मुद्दाही उपस्थित केला. त्यावेळी त्यांना भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी प्रत्युत्तर दिले. महिला आरक्षणावर चर्चेसाठी संसदेत आज ७ तासांचा वेळ राखून ठेवण्यात आला आहे.