हरहुन्नरी ‘भारत’

    20-Sep-2023   
Total Views |
Article On Artist Bharat Laxman Shirsat
 
परिस्थितीचा बाऊ न करता गेली १७ वर्षं कला क्षेत्रात काम करणारे हरहुन्नरी कलाकार भारत शिरसाट यांच्याविषयी...

भारत लक्ष्मण शिरसाट यांचा जन्म मुंबईचा. देशभक्ती आणि देशाभिमानी चित्रपटांमुळे त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव ’भारत’ ठेवले. भारत शिरसाट हे तसे मध्यमवर्गीय कुटुंबातले. पोटासाठी जवळपास ३५ वर्षांपूर्वी भारत यांचे आईवडील गावाकडून कामाच्या शोधात मुंबईत स्थलांतरित झाले. त्यानंतर भारत यांच्या आई-वडिलांनी वेठबिगारीचे काम सुरू केलं. मुळात अशिक्षितपणाचे सावट भारत यांच्या कुटुंबावर बरीच वर्षं होतं. त्यामुळेच आर्थिक परिस्थितीशी झुंज देणार्‍या भारत यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण सोपारा इंग्लिश स्कूलमधून आणि महाविद्यालयीन शिक्षण अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातून पूर्ण केले. त्याचबरोबर मराठी साहित्यात ‘एमए’चे पदव्युत्तर शिक्षण ही त्यांनी घेतले. त्यामुळे पिढ्यान्पिढ्यांचा निरक्षरतेचा अंधार भारत यांच्या उच्चशिक्षणाने नाहीसा झाला.

खरंतर भारत यांना लहानपणापासून समाजसेवेची आवड. त्यामुळे मोठेपणी आपण पोलीस व्हायचं असं त्यांनी मनोमन ठरवलं होतं. पण, नियतीने त्यांच्यासाठी वेगळाच रस्ता निवडला होता. त्यामुळेच भारत हळूहळू वेगवेगळ्या कला प्रकारांत सहभागी होऊ लागले. शालेय जीवनात गायन, निबंध, हस्ताक्षर, मिमिक्री अशा स्पर्धेत ते सहभागी व्हायचे. त्यानंतर महाविद्यालयीन जीवनात प्रवेश झाल्यावर नाटकाची तालीम महाविद्यालयाच्या कट्ट्यावरून पाहणारे भारत शिरसाट यांची रंगभूमीवर येण्यासाठीची धडपड सुरू झाली. मग नाटकात काम करायला मिळाल्यावर नीरज जड, चार्ल्स गोम्स, चेतन सैदाणे, मनीष सोपारकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. तसेच त्यांचे काका मुकुंदा शिरसाट यांनीही त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले. पुढे नाटकात भारत यांचा सहभाग वाढला. पण, त्याचा परिणाम कधीच अभ्यासावर झाला नाही. मात्र, नाटकातील सोंगाड्या आणि आयुष्यातील जीवलग मित्र शाम राऊतच्या रुपाने त्यांना भेटला.

मग ‘टाईमपास’, ‘एक क्षण गोठलेला’, ‘हार के बाद जीत हैं’ यांसारख्या ३५ हून अधिक एकांकिका भारत यांनी महाविद्यालयातून आणि वेगवेगळ्या नाट्य संस्थेच्या माध्यमातून केल्या. त्याचवेळी त्यांनी ’आल्या आल्या मारू नका’ या व्यावसायिक नाटकासाठीही काम केले. पुढे त्यांनी नाट्यकलेतच करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळेच नाटकातूनही आपण समाजापर्यंत, समाजाच्या प्रश्नांना घेऊन सामाजिक काम करू शकतो, हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी नाट्यकलेतच करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘राष्ट्रीय सेवा योजने’च्या माध्यमातून आणि कलापथकांच्या माध्यमातून तुटपुंज्या मानधनात आणि वेळप्रसंगी गावोगावी निःशुल्क पथनाट्याचे कार्यक्रम केले. त्यामुळे माणुसकी आणि माणूसपण नाटकाने शिकवलं, असं भारत आवर्जून सांगतात.

दरम्यान, भारत शिरसाट यांना शिक्षणसाठी फार संघर्ष करावा लागला. शिक्षण पूर्ण करण्यासाठी पेपर लाईन टाकण्यापासून विविध छोटीमोठी कामे शिक्षणासोबत सातत्याने त्यांनी सुरुच ठेवली. पण, परिस्थितीला कधीच दोष दिला नाही. त्यावेळी ‘आंबटगोड’, ‘पंचनामा’ यांसारख्या मालिका आणि ‘मुक्काम पोस्ट आईच्या गावात’ या प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या चित्रपटातही त्यांनी काम केले आणि त्यातून मिळणार्‍या पैशातून कुटुंबाचा आणि शिक्षणाचा खर्चही त्यांनी सांभाळला.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर भारत यांनी अभिनयासह चित्रपट, नाटकांचे दिग्दर्शन करायलाही सुरुवात केली. त्यांनी ‘बळी’, ‘छोरी’, ’क्रिमिनल जस्टीस’, ’शिमगा’, ’फॉरेन्सिक’, ’ताटवा’ यांसारख्या चित्रपटांत साहाय्यक दिग्दर्शक, अभिनेता म्हणून कामे केले.

त्यानंतर भारत यांचा अभिनय आणि दिग्दर्शनाच्या शिस्तबद्ध चौकटीतून लिखाणाच्या मुक्तांगणात प्रवेश झाला. सुरुवातीला कुसुमाग्रज, सुरेश भट, नामदेव ढसाळ यांच्या कवितांनी प्रेरित झालेले भारत शिरसाट कविता लिहू लागले. त्यानंतर दिग्दर्शनाकडे वळल्यावर प्रहसन, एकांकिका लेखनही त्यांनी केले. त्याचदरम्यान त्यांना एका चित्रपटात साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करताना ऐनवेळी चित्रपटाचे संवाद लिहिण्याची संधी मिळाली. मग साहाय्यक लेखक म्हणून मालिकाचे आणि चित्रपटांचे लेखनही ते करू लागले. मुळात कला क्षेत्रातील अनिश्चितता लक्षात घेऊन भारत यांनी अभिनय, दिग्दर्शन, लेखन अशा क्षेत्रांत मुसाफिरी केली. त्यामुळेच नवनिर्मिती करा, कॉपी करू नका, असे भारत आवर्जून सांगतात.

त्यामुळेच ‘इत्तर’, ‘घराघरात छत्रपती शिवाजी महाराज’, ‘बत्ती’ यांसारख्या त्यांच्या लघुपटांना लेखनाचे पारितोषिक मिळाले. तसेच त्यांना लघुपटासाठी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरील लघुपट महोत्सवात आठवेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिके मिळाले आहेत. त्याचबरोबर गेल्यावर्षी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘विसर्जन’ या एकांकिकेला मुंबई विद्यापीठाच्या ’युवा महोत्सवा’त प्रथम क्रमांकाचे परितोषिक मिळाले. पण, या सगळ्यात जिद्ध, चिकाटी, मेहनत, सत्याची कास या गोष्टींना त्यांनी खूप महत्त्व दिले. तसेच भविष्यात प्रयोगशीलपणे फिल्म मेकिंगच्या क्षेत्रात नवनवे प्रयोग करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यासाठी ’दै. मुंबई तरुण भारत’कडून त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुप्रिम मस्कर

इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. सध्या साठ्ये महाविद्यालयात 'एमएसीजे'च्या प्रथम वर्षात शिकत आहेत. मुंबई विद्यापीठातून 'लोककला' या विषयात पदविका पूर्ण केली आहे. वक्तृत्व स्पर्धा, अभिनय स्पर्धांमध्ये अनेक परितोषिके प्राप्त.