मुंबई : देशाला नवी संसद अर्पण करताना सर्व खासदारांना संविधानाच्या प्रति वाटण्यात आल्या होत्या. संविधानाच्या या प्रतींवरून आरोप करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी सवाल केला आहे. ''डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान काँग्रेसला मान्य नाही का ?'' असा सवाल भोसले यांनी काँग्रेसला विचारला आहे.
आचार्य तुषार भोसले म्हणाले की, ''काल नव्या संसदेच्या उदघाटनाची वेळी सर्व खासदारांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या मूळ संविधानाच्या प्रति देण्यात आल्या. मात्र या प्रतींमध्ये सेक्युलर आणि सोशालिस्ट या शब्दांचा समावेश नसल्याच्या कारणावरून काँग्रेस नेत्यांनी आकांडतांडव केले. मुळात संविधानात हे दोन शब्द नव्हते, ते इंदिरा गांधींनी १९७६ मध्ये घटनादुरुस्ती करून घुसवले. बाबासाहेबानी लिहिलेल्या घटनेत हे दोन शब्द नव्हते. त्यामुळे माझा काँग्रेस नेत्यांना सवाल आहे की त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान मान्य नाही का ?'' असे आचार्य भोसले यांनी म्हटले आहे.