पुणे : अभिनेता आर. माधवन याची पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिग्दर्शक शेखर कपूर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर सहा महिने हे पद रिक्त होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भात ट्विट करत माधवनचे अभिनंदन केले आहे.
काय म्हणाले अनुराग ठाकूर?
'आर माधवन यांची एफटीआयआय आणि गव्हर्निंग काउंसिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचं अभिनंदन. मला विश्वास आहे की, मोठा अनुभव आणि नैतिकतेच्या आधारावर ते या संस्थेच्या प्रगतीसाठी काम करतील. सकारात्मक बदल घडवतील आणि संस्थेला आणखी वरच्या स्तरावर घेऊन जातील. माझ्या शुभेच्छा नेहमीच सोबत असतील.
आर. माधवन एफटीआयआय सोसायटी आणि नियामक मंडळाचे अध्यक्ष असून केंद्र सरकारतर्फे 'एफटीआयआय'चे सोसायटी सदस्य म्हणून कला क्षेत्रातील व्यक्तींची यासाठी निवड केली जाईल. या सदस्यांच्या निवडीनंतर सोसायटी स्थापन करत त्यातून नियामक मंडळ तयार होईल. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून ही प्रक्रिया खंडित झाल्यामुळे सोसायटी आणि नियामक मंडळाविषयी संभ्रम सध्या निर्माण झाला आहे. दरम्यान, नुकताच आर. माधवन याच्या रॉकेट्री: द नंबी इफेक्ट या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.