मुंबई : "भारतस्य संगीत विश्वानुबंध यात्रा हा ग्रंथ भारतीय संगीताच्या उत्क्रांतीचा मानववंशशास्त्रीय आढावा आहे. आणि म्हणूनच हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे." असे उद्गार पं. अरुण द्रविड यांनी भारतस्य संगीत विश्वानुबंध यात्रा या ग्रंथाच्या प्रकाशन समारोहावेळी काढले. तर विदेशी भारतीय संगीत उपासकांचा देखील विचार मुंबई तरुण भारत ने केला, ही मोठी बाब आहे, असे पंडित रोणू मजुमदार म्हणाले. दै. मुंबई तरुण भारत आणि सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार, यांनी संयुक्त रित्या साकारलेल्या 'भारतस्य संगीत विश्वानुबंध यात्रा या ग्रंथाचे प्रकाशन दि. २ सप्टेंबर २०२३ रोजी साठ्ये महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ भारतीय शास्त्रीय गायक पंडित अरुण द्रविड आणि प्रख्यात बासरी वादक पंडित रोणू मजुमदार यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
या उपक्रमात पॉलिसी ॲडव्होकसी रिसर्च सेंटर (PARC), संस्कृती संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठान (SSASP), अशोक दा रानडे आर्काइव्ह्ज (ADRA) आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद,भारत सरकार यांचे सुद्धा महत्वाचे साहाय्य मुंबई तरुण भारत संस्थेस लाभले. यावेळी व्यासपीठावर मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार, चेअरमन सुश्रुत चितळे, पार्कचे संचालक विक्रम शंकरनारायणन, ग्रंथाचे संशोधक संकलक डॉ. पौरस सरमळकर आणि विशेष प्रकल्प समन्वयक उमंग काळे उपस्थित होते. प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर रसिकासाठी सांगितिक मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, सतार वादक मेघा राऊत, तबला वादक अक्षय जाधव, संतूर वादक निनाद अधिकारी आणि बासरी वादक हर्षित शंकर यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
अरुण द्रविड पुढे म्हणाले, "हा प्रकल्प करण्याबाबत कौतुक आहे. कारण संगीत ही भावनांची जागतिक दर्जावर होत असलेली अभिव्यक्ती आहे. संगीत रत्नाकर आणि नाट्य शास्त्र यासोबतच पं भातखंडे यांच्या साहित्याचाही उल्लेख यावेळी संगीताच्या प्रसारासाठी आवर्जून करायला हवा. महत्वाची गोष्ट म्हणजे या ग्रंथात अनेक संगीतकार आणि संगीत अभ्यासक आहेत, केवळ भारतीय च नाही तर भारतेतर सुद्धा आहेत."
पंडित रोणू मुजुमदार आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, "हा ग्रंथ संगीतात रुची असणाऱ्या आपल्या सर्वाना एकत्र जोडतो. संगीताला भाषा नसते म्हणून मी नेहमी म्हणतो, जोपर्यंत मनात प्रेम नाही तोवर आयुष्य एक अपूर्ण गाणं आहे. भारतीय संगीतात भारतीयांचाच विचार न करता परदेशी संगीतकारांच्याही मुलाखती आहेत. हे पाहून आनंद झाला. काही माझ्या परिचयातले आहेत ज्यांना खरंच भारतीय संगीताबद्दल आपलेपणा वाटतो. त्यांची दखल मुंबई तरुण भारतने घेतली त्याबद्दल मला आनंद आहे."
किरण शेलार भूमिका मांडताना म्हणाले, "राजकीय व्यासपीठावरून भारताची ताकद काय या प्रश्नाचा पुनः उल्लेख नियमितपणे केला जातो. भारताचा अमृत काळ सुरु झालेला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून भारत इतर राष्ट्राशी जोडला जातोय. भारताची ताकद काय हा प्रश्न उपस्थित केल्यावर मी म्हणेन की भारताची ताकद सांस्कृतिक आहे. संस्कृती जोडण्याची आहे. संगीताच्या, कलेच्या माध्यमातून आपण इतरांशी ऋणानुबंध स्थापित करतो." आपले मनोगत व्यक्त करत त्यांनी सर्व मान्यवरांची ओळख करून दिली.
विक्रम शंकरनारायणन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पार्कची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "एकहाती पौरसने हा प्रकल्प पूर्ण केला, त्याबद्दल मला त्याचा अभिमान वाटतो. भारताच्या सॉफ्ट पावर्स हा भारताचा महत्वाचा घटक आहे. आज पश्चिमात्य संगीत आपण सर्वच ऐकतो. परंतु आपल्या भारतीय सांगितबद्दल आपल्याला काय माहिती आहे? आज आपण संगीताच्या माध्यमातून जगाशी कसे संबंध प्रस्थापित केले आहेत ते या ग्रंथातून दिसेल. मुंबई तरुण भारतने ही महत्वपूर्ण संधी दिली त्याबद्दल आभारी."
संगीत संशोधक पौरस आपले मनोगत सांगत होते. ते म्हणाले, "माझ्यासाठी हा महत्वाचा प्रकल्प होता. पहिलाच आणि मोठ्या प्रमाणावर केलेला होता. माझा थोडक्यात प्रवास मला यनिमित्त सांगायला आवडेल. मी पेशाने दंतवैद्य आहे. परंतु संगीत माझी आवड आहे. मी माझी ओपीडी सांभाळत अडीच वर्षे काम करून का प्रकल्प पूर्ण केला. आणि म्हणूनच माझ्यालेखी याचे मोल मोठे आहे."
उमंग काळे म्हणाले, "संगीत हे केवळ मनोरंजन नाही, तर आपल्या आयुष्यात त्याची महत्वाची भूमिका आहे. हा प्रकल्प पूर्ण करताना मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. परदेशी लोक सुद्धा भारतीय संगीत गुरु-शिष्य परंपरेत राहून शिकले, हे मला फार महत्वाचे वाटते."
कला आचार्य यांनी ग्रंथाचे संपादन करतानाचा आपला अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, "प्राचीन भारतात ६४ कला आहेत त्या आपल्याला माहिती आहेत. वातस्यायनाच्या कामसूत्रात आहे. त्यातली संगीत ही महत्वाची कला आहे. हे कार्य करताना नक्कीच आनंद झाला. कारण यांत अनेक घटक होते. रसायनशास्त्र, स्थापत्यशास्त्र आणि कृषी विज्ञान शास्त्र या सर्वांचा समावेश होता. संगीतात कलाकार आणि रसिक दोघेही एकरूप होतात. हा फरक इतर कला आणि संगीतात आहे, आणि म्हणूनच संगीत महत्वाचे आहे. संगीताला ब्रम्हरुपी आहे . म्हणून आपण ब्रम्हनंदात विलीन होतो."