कलाविष्काराने बहरलेली 'रंगसभा'

    02-Sep-2023   
Total Views |
Article On Rangsabha Book Author By Prof. Gajanan Shepal

दै. ‘मुंबई तरुण भारत’ हे प्रारंभीपासूनच कलाकारांना, त्यांच्या कलाकृतींना व्यासपीठ देणारे एक हक्काचे माध्यम. आमच्या या प्रयत्नांत जेजेच्या प्रा. गजानन शेपाळ यांचे भरीव योगदान. ‘कोविड’पूर्वी विविध कलाप्रदर्शनांचा आढावा घेणारे ‘कलादालन’ हे त्यांचे सदर अगदी अखंडपणे सुरु होते. ‘कोविड’ काळात कलाप्रदर्शनांमध्येही खंड पडला. पण, कलेच्या प्रचार-प्रसाराचे व्रत थांबता कामा नये, म्हणून प्रा. शेपाळ यांनी विविध कलाकार, त्यांच्या कलाशैलीविषयी स्तंभलेखनाची कल्पना मांडली आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’नेही या कल्पनेला मूर्त स्वरुप दिले. मग ‘कलादालन’चे ‘कलादान’ झाले आणि आजही दर शनिवारी आमच्या ‘विविधा’ या पान क्र. ८ वर हा कलाविष्कार वाचकांच्या विशेष पसंतीस पडतो. ‘कलादान’मधील आणि अन्य वृत्तपत्रांतील अशाच काही लेखांमधील निवडक १०० कलाकारांच्या कलाप्रवासाचे संकलन करुन ‘रंगसभा’ हे देखणे पुस्तक प्रा. शेपाळ यांनी साकारले आहे. त्याचाच हा परिचय...

रंगभाषा हे प्रसंगी शब्दमाध्यमांपेक्षाही ताकदवान माध्यम. रंग, रेषा, रुपांची ही कला थेट मनाला भिडणारी. खरं तर एखादी कला जितकी उलगडायला जावी, तितके तिचे अर्थ लागत जातात आणि म्हणूनच या कलेकडे कसे पाहावे, ती कशी समजून घ्यावी, कशी जाणवून घ्यावी, हे सांगण्याचं काम कलासमीक्षक इमानेइतबारे करत असतात. असेच एक कलासमीक्षक, प्राध्यापक आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’चे हक्काचे स्तंभलेखक म्हणजे डॉ. गजानन सीताराम शेपाळ. त्यांच्या ‘रंगसभा’ या पुस्तकाचे नुकतेच राज्यपालांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन संपन्न झाले. त्यानिमित्ताने कलाप्रेमींच्या संग्रही असावा अशा या देखण्या पुस्तकाविषयी..

मुळात या पुस्तकाचं मुखपृष्ठच विलक्षण बोलकं आहे. आपली सर्जनशक्ती चाळवणारा कॅनव्हासचा शुभ्र रंग, त्यावर शुभ्रधवल चौकटीतले १०० कलाकारांचे चेहरे आणि कलात्मक पद्धतीनेच हिरव्या रंगात लिहिलेले नाव, ’रंगसभा.’ हिरवा रंग सृजनाचा असतो. तो उल्हास, आशा घेऊन येतो. काळ्या ओसाड मातीतून एखादा तृणाचा अंकुर उमलून यावा तसा! त्या हिरव्याकंच रंगाला उठाव देणारं आणि नजरेला आकृष्ट करणारं लहानसं लाल चुटूक फूल यावं तसा पूर्णविराम. संपूर्ण कलाकृतीला पूर्णत्वास नेणारं, हे मुखपृष्ठ पाहिल्यावर सुरुवातीची पानं उलटून पाहायचा मोह आवरत नाही.

पुस्तकाला तब्बल चार दिग्गजांनी प्रस्तावना दिली आहे. प्रत्येकाची प्रस्तावना एक-एक वेगळा आयाम घेऊन आपल्या समोर येते. त्यापैकी एक म्हणजे दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार. या लेखसंग्रहातील बहुतांश लेख दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘कलादान’ या सदरात पूर्वप्रकाशित झालेले आहेत. या सदरामागची भूमिका आणि एकंदरच चिकित्सा किरण शेलार यांनी त्यांच्या प्रस्तावनेत केली आहे. आपल्या प्रस्तावनेत किरण शेलार लिहितात की, “हे पुस्तक म्हणजे निरीक्षण ते निर्मितीचा प्रवास उलगडण्याची प्रक्रिया.” कारण, इथे निर्मिती आहे आणि निर्मितीचे डोहाळेसुद्धा! संकल्पनेच्या अंकुरण्यापासून तिच्या अभिव्यक्तीपर्यंत कलाकाराच्या मनात येणारे उचंबळ चित्र साकारतात, केव्हा वायाही जातात. चित्रनिर्मिती ही आत्मसंवादाकडून जनसंवादाकडे जाणारी प्रक्रिया. ही एक निराळीच दुनिया आहे, जिचा दर्जा ठरवण्याचे मापदंड आहेतही आणि तसे म्हणायला गेलो तर नाहीतही. यावेळी कवी ग्रेसांच्या एका ओळीचे उत्तम विश्लेषण ते करतात.

‘ग्रेस पर्वताला ‘सौंदर्यसत्तेचे प्रतीक’ म्हणतात. ‘पर्वताने मोहम्मदाकडे कधीच जाऊ नये,’ असे ते सांगतात. कल्पनेच्या या सुंदर विश्वापलीकडे चित्रकार आणि रसिकांमध्ये सेतुबंधनाचे काम समीक्षक करतो. दृश्यकला शिक्षणतज्ज्ञ आणि सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयाचे निवृत्त अधिष्ठाता प्रा. मं. गो. राजाध्यक्ष यांनी लेखकाविषयी तसेच लेखकाच्या क्षमतांविषयी लिहिले आहे. ते म्हणतात की, “जेव्हा चित्रकाराला लेखणीची भाषा अवगत असते, तेव्हा उत्तमोत्तम कलाकृती तो मोठ्या वाचक वर्गापर्यंत पोहोचवू शकतो” आणि ते काम शेपाळ यांनी उत्कृष्टरित्या केले आहे. चित्रकारांचे कामातील सातत्य, त्यांची शैली, त्यातील प्रयोगशीलता, खास अशी स्वतंत्र रंगसंगती आणि कलाकाराचे कलाकृतीशी जोडलेले भावनिक नाते, अशा सर्वच गोष्टींचा मागोवा घेत तयार झालेली ही समीक्षा. त्यांनी जणू कलेच्या सागर मंथनातून त्यांच्या हाती लागली ती काही अमूल्य अशी झाकली माणके. ज्यातील काही प्रसिद्धीपराङ्मुखही होती. अशांना लख्ख प्रकाशात आणले ते शेपाळांनी.

पत्रकार आणि कलारसिक विवेक सबनीस म्हणतात की, “महाराष्ट्रात पुण्या-मुंबईकडे सर्वदूर पसरलेले बुद्धिमान चित्रकार सागरतळातील शिंपल्यांमधील मोत्यांसारखे त्यांनी हुडकून काढले आहेत. एरव्ही आपल्याकडील कलांच्या संदर्भात गोंधळ निर्माण करणारे वातावरण, त्याबाबत आढळणारी अनास्था, तसेच कलेला सामान्य पाहून फटकून ठेवण्याची वृत्ती अगदी सहज दिसून येते. त्याच्या विरोधात आशादायी, वाचकाला चित्रकलेचा आनंद देत समृद्ध करणारे हे लेखन आहे.” चित्रकलेचा शास्त्र म्हणूनही शेपाळ यांनी विचार केल्यामुळेच त्यांच्या लिखाणाला उंची प्राप्त झाली आहे. कलेतील नैतिकता ही कलेची मूलभूत गरज असते. ब्रिटिश राजवटीत कलेचे झालेले नुकसान लक्षात घेता, ते म्हणतात की, “नाटक, संगीत, नृत्य या कलाप्रकारांमध्ये जशी घराणी व संस्थात्मक विचारप्रवाह निर्माण झाले तसेच चित्रकलेबाबतही घडले. ही उतरंड जेवढी पूरक ठरली, तशी काही अंशी ती मारकही ठरली आहे. ही एकप्रकारची जातीव्यवस्था उपरेपणाने निर्माण केली गेली की काय, असा प्रश्न पडतो.”

ज. जी. महाविद्यालयाचे कलाशिक्षण प्रशिक्षण विभागप्रमुख डॉ. गणेश तरतरे यांनी आपल्या दीर्घ प्रस्तावनेत सर्वंकष मुद्दे मांडलेत. लेखकाच्या शैलीचे कौतुक करताना ते म्हणतात की, “कलेसारख्या क्लिष्ट विषयाचे सामान्य भाषेत निरूपण करणे कठीण. त्यामुळे गंभीर समीक्षेची मांडणी करता येत नाही. शेपाळ यांनी या गंभीर समीक्षेचाही विचार करावा. हे ते सहज करू शकतात, याबद्दल विश्वास आहे. सौंदर्यशास्त्राशिवायही समीक्षा होते. तिचा प्रांत वेगळा आहे. कलेचं आंतरिक मर्म उकलून दाखवण्याचा मध्यम मार्ग शेपाळांनी स्वीकारला. पाश्चिमात्य कलेच्या तंत्रात भारतीय कलांचा श्वास कोंडला आहे. त्यामुळे समकालीन कलेसंदर्भात लिहिताना कोणते मापदंड वापरावेत याबाबत संभ्रम आहे. परंतु, इथला जीवनवाद पाश्चिमात्य तंत्रावर मात करतो. शेवटी तंत्र हे माध्यम आहे, आत्मा नाही. शेपाळांनी कलेचे गूढ तत्त्वज्ञान सुलभ व ओघवत्या शब्दात मांडले आहे. पुढे त्यांनी वृत्तपत्रांच्या भूमिकेबाबतही कौतुक केले आहे. कला आणि सामान्य माणसातलं अवघडलेपण दूर करून तिला सर्वदूर पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य वृत्तपत्रांचे असते,” असे ते म्हणाले.

डॉ. गजानन शेपाळ आपल्या मनोगतात म्हणतात की, “दै. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये सुमारे दहा वर्षांपूर्वी दत्ता पंचवाघ यांनी ‘कलादालन’ नावाचा स्तंभ सुरू करण्यास सांगितला. तो आजवर (आता कलादान या नावाने) सुरू आहे. दृश्यकलांतील नामवंत नसले तरी चालेल; परंतु प्रयोगशील, प्रामाणिक, दृश्यकलेत योगदान देणार्‍यांच्या प्रवासाबाबत लिहायचे ठरले.” ग्रंथाच्या प्रवासासोबतच स्वतःच्या मनातला इतक्या वर्षांतला प्रवास त्यांनी या मनोगतातून मांडला आहे. कलेची समीक्षा करताना माणूस कसा अंतर्बाह्य बदलत जातो, याचे शेपाळ सर म्हणजे चालतेबोलते उदाहरणच!

माणसांचे वर्णन करताना लेखक कलेच्या प्रवाहांवरही भाष्य करतात. कलेचे बदलते प्रवाह त्यालाच जोडून कला संस्थांतले राजकारण, अशा अनेक बाबी निगुतीने प्रकाशात आणून विषयाला आणि व्यक्तीला न्याय देतात. डॉ. उत्तम पाचरणेंविषयी बोलताना ते उत्तम यांनी घडवलेल्या राजकीय क्रांतीविषयी बोलतात. ‘आमच्या कलाक्षेत्रांचंही एक भन्नाट कलाकारण असतं,’ असं सागंताना ते म्हणतात की, “एकेदिवशी सार्‍या प्रचलित ओंगळवाण्या कलाकारणाला मूठमाती देत उत्तम ललित कला अकादमीचे अध्यक्षच नाही, तर शिल्पकार बनले. त्याच दिवशीपासून ललित कला केंद्राने कात टाकली. सर्व कला सहोदर आहेत,’ असे त्यांचे म्हणणे. शिल्पकला, चित्रकला, उपयोजित कला आणि दृश्यकला या सर्वच एकसदृश आहेत. एखादे शिल्प साकारताना उत्तम पाचारणे त्यांच्या मध्याचा अभ्यास करतात. धातू, दगड, कॅनव्हास, लाकूड माती, माध्यमाच्या स्वरुपावरून त्याला कोणती ट्रीटमेंट द्यायची हे ठरवतात.’ प्रा केशव मोरेंबद्दल ते म्हणतात की, ‘रंगलेपनाला आध्यात्मिक गतीत शोधणारे कलातपस्वी.’ अमरावतीच्या मूर्तिकार जिराफे बंधूंविषयी ते लिहितात की, रंगोपचार आणि औषधोपचाराची एकत्रित सांगड घालत, ते मोग्गलान श्रावस्ती यांच्याबद्दल बोलतात. सोलापूर येथील भगवान रामपुरे यांच्या कलरविषय बोलताना त्यांनी त्यात ओतलेला तत्त्वज्ञानाचाही उल्लेख करतात.

एवढेच काय, कलाकारांची निवड करताना त्यांनी केवळ मुख्य धारेतील चित्रकार, शिल्पकार एवढेच न पाहता, सुलेखन करणारे, मूर्तिकार, मुद्राचित्रकार, व्यंगचित्रकार, छायाचित्रकार, हस्तकला अशा अनेकांचा विचार केला आहे. कलाशाखांचा विचार करता आधुनिक तंत्रज्ञानाचाही त्यात उल्लेख आवर्जून केला आहे. हे पुस्तक वाचताना प्रकर्षाने जाणवली ती गोष्ट म्हणजे, प्रत्येकाच्या कलाकृतीत पॅटर्न्स. स्वतःच असं काहीतरी वेगळेपण कलाकार आपल्या कलेत उतरवत असतो. त्या शैलीतील कलाकृती, तिची धाटणी हिची एक स्वतंत्र ओळख असते. पुस्तकाची बांधणी आणि कागदाचा दर्जा उत्तम असल्याने पुस्तक चित्रांचेच आहे की काय, असे वाटते आणि म्हणूनच पुस्तक वाचनीय प्रेक्षणीयसुद्धा झाले आहे.

पुस्तकाचे नाव : रंगसभा-पहिले शंभर
लेखक : डॉ. गजानन सीताराम शेपाळ
प्रकाशक : ए. व्ही. एस कलाप्रतिष्ठान
पृष्ठसंख्या : ४००
मूल्य : २५००/-

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.