संगीत नाटकाचे नवे सूर...

    15-Sep-2023   
Total Views |
Sangeet Natak
 
एका कीर्तन परंपरा असलेल्या कुटुंबातली एक गोष्ट. सांगलीतलं समर्पित असं एक कुटुंब, परंतु प्रत्येकाचं संगीत वेगळं, प्रत्येकाचे गीतप्रकार वेगळे. यातून असलेली सर्वांची मतभिन्नता आणि दोन पिढ्यांमधले अंतर. हे अंतर दूर करणारा एक सेतू अशी रुळलेली कथा घेऊन आलेलं एक संगीत नाटक ‘संगीत अवघा रंग एक झाला’ एका दशकाने पुन्हा नव्या नटसंचासह रंगमंचावर आले आहे. त्यानिमित्ताने या संगीतमय घराची गोष्ट ...

संगीत मैफिलींतून बाहेर पडले आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचले ते नाट्यगीतांतून. रागसंगीत ऐकणारा एक वर्ग आहे. परंतु, या मर्यादा मोडून संगीत घराघरात, रसिकांच्या मनात पोहोचले ते संगीत नाटकांतून. संगीतात झालेली ही क्रांतीच! आजही ही संगीत नाटके रंगभूमी गाजवतात. डॉ. मीना नेरूरकर यांनी लिहिलेले आणि ‘आत्मन’ व ‘सिद्धिदाता’ निर्मित ’संगीत अवघा रंग एक झाला’ या नाटकाचे प्रयोग सध्या तुफान गाजत आहेत. गौतम मुर्डेश्वर, प्रमोद पवार, ॐकार प्रभुघाटे, श्रद्धा वैद्य असा उत्तम नटसंच. विशेष म्हणजे, सर्वच कलाकार गातात! सर्वांचं संगीत वेगवेगळं. यात नाट्यसंगीत, कीर्तन, रागसंगीत, बंदिश, चित्रपट संगीत, इंग्रजी गीतेसुद्धा आहेत आणि पारंपरिक संगीताचा नव्या संगीताशी झालेला संगमसुद्धा!
 
साधारण कथानक असे, एका घराची ही गोष्ट. कीर्तनकार बुवा, पत्नी, दोन मुले व एक मुलगी. एक मुलगा कायमचा परदेशात स्थायिक. मधल्या लेकीला परजातीय श्रीमंत पुरुषाशी लग्न करायचे आहे व धाकट्या मुलाला पारंपरिक चालत आलेले कीर्तन नवीन पद्धतीने जतन करायचे आहे. त्याला त्यात आजच्या पिढीचे बदलही करायचे आहेत. अप्पा वेलणकर अगदी आपल्या पारंपरिक संगीतावर ठाम. त्यांची तीनही मुले त्यांना आपलं म्हणणं पटवून देऊ शकत नाहीत. अगदी त्यांचा मित्रसुद्धा! अशातच एका गोड गळ्याच्या परीचं घरात आगमन होतं. तिच्या सहवासात अप्पांचे विचार बदलू लागतात. ती कोण मुलगी?

श्रद्धाचा आवाज सुंदर तर आहेच, वयाच्या मानाने परिपक्वसुद्धा. आवाजाला धार आहे आणि तेवढीच मधुरतादेखील. अभिनय आणि गायन या दोन्ही भूमिकेत ती अत्यंत सहजतेनं वावरते. एखाद्या प्रशिक्षित आणि अनुभवी नटीसारखी. ॐकारच्या आवाजात गोडवा आहे. षोडशवर्षीय तरुणाने गावं तसा गोड गातो तो. तरीही प्रगल्भ! त्याच्या आवाजाची फेक आणि त्यापाठोपाठ येणारे, समरस होणारे सूर म्हणजे निव्वळ पर्वणी. शंखनाद व्हावा आणि गाभारा भारून जावा तसं होतं. प्रत्येक एका आवर्तनाला जीव हेलावून जावा असं गातो. मात्र, ज्या पाश्चिमात्य प्रभाव असलेल्या संगीताचा आग्रह तो धरतो, त्यापेक्षा त्याचं पारंपरिक रागसंगीतच भावलं मला. प्रमोद पवार आणि गौतम मुर्डेश्वर यांचा अनुभवसंपन्न आणि कसदार अभिनय रंगत आणतो. प्रमोद पवारांचं इतर वेळी असलेलं मृदू बोलणं रंगमंचावर जेव्हा वरच्या पातळीत चढतं आणि विषयानुरूप मनांच्या आंदोलनानुसार ज्या पद्धतीने आवाजाची लय ते बदलतात, हे कौशल्य वाखाणण्याजोगेच!

Sangeet Natak


हा संघर्ष आहे आणि त्याला धरून समाजात होणार्‍या सामाजिक अभिसरणाचे द्योतक आहे. दोन पिढ्यांमध्ये विचारवाद स्वाभाविक असतात, ते प्रकर्षाने अधोरेखित होतात. कुटुंबव्यवस्था, विवाहसंस्था, आर्थिक बाबींकडे पाहण्याचा व्यक्तिनुरूप दृष्टिकोन, खाद्यसंस्कृती, नातेसंबंध आणि सामाजिक स्थिती असा सर्वच मिलाफ दिसून येतो. २०१३ पर्यंत या नाटकाचे वेगळ्या नटसंचासह ३०० हून अधिक प्रयोग झाले. त्यानंतर ते आज पुन्हा नव्या दमाच्या उत्कृष्ट कलाकारांसहित रंगभूमीवर उतरलंय. नाटकाचे सात प्रयोग झाले आणि या एवढ्या कालावधीतही नाटक उत्तम जमलंय!
 
प्रकाशयोजना, नेपथ्य, उत्कृष्ट म्हणावं असं. रंगभूषेबाबत बोलायचे झाल्यास अति मेकपमुळे काही पात्रांच्या चेहर्‍यावर कृत्रिमता आल्यासारखे वाटते. वेशभूषाही सर्वांना साजेशी अशीच. मात्र, ’शेप ऑफ यु’ गाणं ज्या घरात उघड उघड बोललं जातं तिथे ऑफिसात काम करणारी अविवाहित मुलगी अजूनही साडीच नेसते, हे पाहता नाटकाचा काळ नक्की कोणता, असा काहीसा गोंधळात टाकणारा प्रश्न पडतो. नाटकातून शेवटास कुटुंब एकत्र येतं आणि अप्पा आपल्या मुलांचे विचार पटवून घेतात, हे खरे असले तरीही संगीतातले प्रयोग मात्र त्यांना मान्य नसल्याचे जाणवते. एकूणच संगीतातील बदलते प्रवाह पाहायचे असल्यास हे नाटक एकदा नक्की पाहावे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.