ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या आठवणीत नानांचे डोळे पाणावले

    14-Sep-2023
Total Views |
 
nana and vikram
मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी ७०-८० च्या दशकात आपल्या समृद्ध अभिनयाने गाजवणाऱ्या अनेक नटांपैकी एक नाव आजही घेतले जाते ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे. द वॅक्सिन वॉर या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित आगामी चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने बातचीत करत असताना नाना विक्रम गोखले यांच्या आठवणीत भावूक झाले. “जगातल्या पहिल्या १० नटांची नावं सांगा असं कुणी विचारलं तर त्यात एक नाव विक्रम गोखले यांचं असेल”, अशा शब्दांत त्यांनी विक्रम गोखलेंच्या अभिनयाचे कौतुक केले.
 
जगातल्या पहिल्या १० नटांच्या यादीत विक्रम गोखले यांचे नाव....
 
दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासोबत नटसम्राट या चित्रपटात नाना पाटेकर यांनी केलेलं काम आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसले आहे. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील ताकदीच्या कलावंतामध्ये विक्रम गोखले यांचे नाव आवर्जून घेतले जाते. ७०-८० च्या दशकात एकत्रित एकाच मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या विक्रम गोखले यांच्या आठवणीत नानांचे डोळे पाणावले. नाना म्हणाले, “विक्रम गोखले गेल्यामुळे माझं वैयक्तिक नुकसान झालं. जगातल्या पहिल्या १० नटांची नावं सांगा असं कुणी विचारलं तर त्यात एक नाव विक्रम गोखले यांचं असेल. विक्रम यांच्या जाण्यामुळे पाठीवर हात ठेवणाऱ्या थोरल्याला हात निघून गेला आहे याची खंत वाटते”, अशी दु:खद भावना नानांनी व्यक्त केल्या.
 
चित्रपटसृष्टीच्या इतिहास डोकावत नानांनी ज्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यासाठी अनेक कलाकार झटत असत ते दिग्दर्शक आज या आक़ेवारीच्या किंवा बॉक्स ऑफिसच्या स्पर्धेत कुठेच दिसून येत नाहीत याकडे लक्ष वेधले. नाव न घेता त्या दिग्दर्शकाचे आजच्या या आधुनिक जगात अस्तित्वच राहिले नाही हे सांगत नानांनी चित्रपटसृष्टी ही काळानुरुप बदलत जाणार आहे असे म्हटले. त्यामुळे आपण खुप सामान्य आहोत यावर विश्वास ठेवला की असामान्य गोष्टी करण्याचा तुम्ही प्रयत्न करु शकता, असा सल्ला देखील यावेळी नानांनी दिला.
 
‘द वॅक्सिन वॉर’ या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरिजा ओक, सप्तमी गौडा, रायमा सेन व अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट देशभरात २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.