सनातनविरोधी सनकींची टोळी

    13-Sep-2023   
Total Views |
Stalin's son Udhayanidhi slammed over Sanatana Dharma remarks

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे सुपुत्र आणि द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन हे त्यांच्या सनातन धर्माच्या उच्चाटनाविषयी केलेल्या विधानावर आजही ठाम आहेत. त्यांच्या विधानावरून कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत वादंग झाल्यानंतरही त्यावरून माफी मागणे तर दूरच, उलट आपल्या उफराट्या विधानाची टिमकी मिरवण्यातच त्यांनी धन्यता मानली. आता उदयनिधीचा हा उद्दामपणा कमी होता की काय, म्हणून द्रमुकच्या आणखीन एका नेत्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये द्रमुकचेच नेते आणि तामिळनाडूचे उच्चशिक्षण मंत्री के. पोनमुडी यांनी तर चक्क ‘इंडिया’ आघाडीची स्थापनाच मुळी सनातन धर्माविरोधात लढण्यासाठी झाली असल्याची अगदी ढळढळीत कबुली दिली. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीतील सनातनविरोधाचा हा छुपा अजेंडा जगजाहीर झाला असून, आगामी काळात अशीच आणखीन काही विधाने आघाडीतील अन्य नेत्यांच्या तोंडून बाहेर पडली, तर कदापि आश्चर्य वाटायला नको. खरं तर राजकीय पक्ष किंवा आघाडी म्हणून अन्य एखाद्या राजकीय पक्षाचा, युतीचा अथवा विचारधारेचा विरोध अगदी स्वाभाविक. परंतु, एखादा राजकीय पक्ष अशाप्रकारे थेट एका धर्मालाच संपुष्टात आणण्याच्या वल्गना करण्याचा हा कदाचित पहिलाच प्रकार. म्हणजे आजवर काँग्रेस आणि तत्सम विचारसरणीच्या पक्षांकडून ‘सेक्युलॅरिझम’च्या नावाखाली अल्पसंख्याकांचे लांगूलचालन उघड उघडपणे घडत होतेच. काँग्रेसचा हिंदूद्वेषही रामजन्मभूमी, रामसेतू आणि अशा कित्येक प्रसंगांतून लपून राहिलेला नव्हता. द्रमुकही त्याला अपवाद नाहीच. परंतु, यंदा आपण एकटे नाही, तर झुंडीत आहोत, म्हटल्यावर या चलाख कोल्ह्यांनी गळे काढायला सुरुवात केली. उदयनिधीच्या विधानाचा ‘इंडिया’ आघाडीतील दोन-तीन पक्षांनी तोंडदेखला विरोध जरी केला असला, तरी अन्य पक्षांनी त्यावर मतप्रदर्शन केलेले नाही. त्यातच राहुल गांधींनीही युरोप दौर्‍यात ‘भाजप जे करते, त्यात हिंदू असे काहीच नाही’ म्हणत उदयनिधींच्या विधानावर प्रतिक्रिया न देता, अप्रत्यक्ष सहमतीच व्यक्त केलेली दिसते. त्यामुळे अशा सनातनविरोधी सनकींच्या या निधर्मी टोळीला देशातील हिंदू बांधव कदापि माफ करणार नाही आणि आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देईल, हे निश्चित!

‘आय एम ए सॅड सॅड हिंदू’

‘शेंडी-जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, संघाचे-भाजपचे हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व नाही, हिंदुत्व आमच्या रक्तात आहे’ वगैरे वगैरे वल्गना करणारे हिंदुहृदयसम्राटांचे (कु)पुत्र उद्धव ठाकरे मात्र उदयनिधीच्या सनातनविरोधी उद्गारांवर गप्पगारच आहेत. उदयनिधीच्या पिताश्रींना म्हणजे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना दूरध्वनीवरून ठाकरे म्हणे आपला निषेध नोंदवणार असल्याचे वाचनात आले खरे. पण, ठाकरेंनी तसे काही केले असले तरी उपयोग शून्यच! उदयनिधीच्या विधानानंतर ठाकरेंच्या जाहीर सभा, पत्रकारांशी संवादही झाले. पण, त्यावेळीही ठाकरेंनी उदयनिधीच्या विधानावरून साधा ‘ब्र’ ही काढला नाही. म्हणजेच काय तर उद्धव ठाकरेंचे उदयनिधीच्या विधानावर एकमत तरी आहे किंवा उदयनिधीच्या विधानाला विरोध करण्याचे साधे धारिष्ट्यही ठाकरे दाखवू शकत नाहीत, हेच वास्तव. जाहीरपणे भाजप, संघाच्या हिंदुत्वाला गैर ठरवण्यात सर्वस्व मानणार्‍या ठाकरेंना सनातन धर्माच्या, अशा गलिच्छ अपमानाबाबत मूग गिळून गप्प बसावेसे वाटते, यातच त्यांची कणाहीनता अधोरेखित व्हावी. सनातन धर्म आणि हिंदुत्व, हिंदू संस्कृती हे वेगवेगळे असावे, असाही जावईशोध उद्या उद्धव ठाकरेंनी यदाकदाचित लावला, तरी आश्चर्य वाटायला नको. खरं तर हिंदुत्ववाचे ठेकेदार असल्याप्रमाणे मिरवणार्‍या ठाकरेंनी उदयनिधीची जाहीर झाडाझडती घेतली असती, त्यांना त्यांचे शब्द मागे घ्यायला लावले असते, तर ते सर्वार्थाने बाळासाहेबांचे पुत्र कदाचित शोभलेही असते. पण, राजकीय हव्यासापोटी ठाकरे यापैकी काहीही करतील, याची सूतराम शक्यता नाहीच. त्यामुळे संघाचे, भाजपचे हिंदुत्व ठाकरेंना मान्य नाही, हेही ठीक. पण, मग उदयनिधीचे सनातनविरोधी फुत्कार ठाकरेंना मान्य आहेत का, हे त्यांनी त्यांच्या शिवराळ टोमणेबाज शैलीत एकदा सांगावे. ‘आय एम ए मॅड मॅड हिंदू’ असे गर्वाने, अभिमानाने सांगणारे बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, तर उदयनिधीचा समाचार त्यांनी कुठल्या शब्दांत घेतला असता, हे वेगळे सांगायला नकोच. पण, केवळ राजकीय लाचारीपोटी उद्धव ठाकरेंना अशा घृणास्पद वक्तव्यांचा जाहीर निषेध करायचीही सोय उरली नसल्याने, ठाकरेंची अवस्था म्हणजे ‘आय एम ए सॅड सॅड हिंदू’ अशीच!



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची