वनवासींच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणारे वनवासी कल्याण आश्रम

    12-Sep-2023   
Total Views |
Article On Vanvasi Kalyan Ashram

१९५२ साली सुरू झालेली ‘वनवासी कल्याण आश्रम’ या सेवाभावी चळवळीची यात्रा आता ७० वर्षांची झाली आहे. एका अर्थाने अमृत महोत्सवी वर्षाच्या दिशेने ‘वनवासी कल्याण आश्रम’ची वाटचाल आता सुरू झाली आहे, असे म्हणावे लागेल. सर्वार्थाने उपेक्षित राहिलेल्या, आपल्याच हिंदू धर्माचे अभिन्न घटक असलेल्या वनवासी, जनजाती समाजाच्या सर्वांगीण उन्नतीच्या दिशेने चालू असलेला हा प्रवास म्हटला, तर थक्क करणारा तर आहेच. पण, या देशाच्या एका समाज घटकाला त्याचे आत्मभान आणि गौरवशाली वारसा पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी चालू असलेला, हा प्रवास तितकाच अद्भुत आणि रोमांचकारीदेखील आहे. वनवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचा विचार समोर ठेवून अखंडपणे कार्यरत असणारी ‘वनवासी कल्याण आश्रम’ या संस्थेच्या कार्यावर टाकलेला, हा प्रकाशझोत.

उपेक्षित, दलित, दुर्बल, जनजातींच्या उत्थानाचा जेव्हा जेव्हा विषय येतो, तेव्हा या सर्व घटकांना ’राष्ट्रीय प्रवाहात आणणे’ हा शब्दप्रयोग हमखास केला जातो. मात्र, वनवासी क्षेत्रातील संस्कार, सभ्यता, संस्कृती, परंपरा हाच आपला खरा राष्ट्रीय प्रवाह असून, त्या प्रवाहात सामील होण्यातच आपल्या देशाचा खरा उत्कर्ष असल्याचा विचार ‘कल्याण आश्रमा’ने आपल्या गेल्या ७० वर्षांच्या साधनेच्या आधारावर प्रतिपादित केला आहे. यातच खरेतर ‘वनवासी कल्याण आश्रम’चे वेगळेपण आहे. दुसरी एक बाब ‘वनवासी कल्याण आश्रम’ने ठळकपणे मांडली. ती म्हणजे, वनवासी संस्कृती आणि परंपरा हीच खरी हिंदू किंवा भारतीय संस्कृती आहे. हा केवळ प्रचार करण्याचा मुद्दा नसून, सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेले, हे एक चिरंतन सत्य असल्याची ‘कल्याण आश्रमा’ची भूमिका आहे.

२० हजारांपेक्षा अधिक प्रकल्प, ५० हजार वनवासी गावांशी निरंतर संपर्क, प्रत्यक्ष वनवासी क्षेत्रात आणि नगरीय क्षेत्रात कार्य करणारे हजारो समर्पित कार्यकर्ते, हे ‘कल्याण आश्रमा’चे काहीसे संख्यात्मक चित्र. एका अर्थाने वनवासी बांधवांमध्ये ’तू मै एक रक्त’ या अनुभूतीच्या बळावर भाव जागरण करण्याचे, हे कार्य तर आहेच. पण, वनवासी क्षेत्राच्या रुपाने आपला राष्ट्रीय प्रवाह अधिक दृढ व मजबूत करण्याचेदेखील, हे राष्ट्रीय स्वरुपाचे कार्य आहे.

जवळपास ६५० पेक्षा अधिक जनजातींमध्ये विभागला गेलेल्या आणि एक-दोन राज्य वगळता जवळपास सर्व राज्यांमधील दीड लाखांपेक्षा अधिक गावांमध्ये वास्तव्य असलेल्या जनजाती समाजाची संख्या आपल्या देशात १२ कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे ही आकडेवारी लक्षात घेता संघटनेचे हे स्वरूप छोटे वाटत असले, तरी या अल्पशा वाटणार्‍या बळावर ‘वनवासी कल्याण आश्रम’ने संपूर्ण वनवासी क्षेत्रात राष्ट्रीय विचारावर आधारित आपल्या कार्याचे एक मजबूत असे जाळे विणले आहे.

१९५२ साली मध्य प्रदेशातील जशपूरनगर येथे ‘वनवासी कल्याण आश्रम’ची स्थापना एका छोट्याशा छात्रावासाच्या माध्यमातून झाली. मात्र, ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या हजारो कार्यकर्त्यांनी केलेल्या साधनेच्या बळावर आज जवळपास संपूर्ण देशांमध्ये असलेल्या वनवासी क्षेत्रात ‘कल्याण आश्रमा’ने आपल्या कार्याची मुळे नेऊन पोहोचवलेली आहेत. वनवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचा विचार समोर ठेवून अखंडपणे कार्यरत असणारी ‘कल्याण आश्रम’ ही वनवासी क्षेत्रातील कदाचित एकमेव सामाजिक संघटना म्हणावी लागेल. ‘वनवासी कल्याण आश्रम’चे संस्थापक वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांनी जे उद्दिष्ट ठरवले होते, त्याच उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी ‘वनवासी कल्याण आश्रम’चे हजारो कार्यकर्ते देशभरात कार्यरत असल्याचे आपल्याला दिसते.

इतिहासात झालेल्या चुकांची तीच ती उजळणी न करता, त्या चुका दुरुस्त करून जनजाती बांधवांच्या विकासासाठी प्रामाणिकपणे आणि नि:स्वार्थीपणे प्रयत्न करण्याचा मार्ग ‘वनवासी कल्याण आश्रम’ने अवलंबिला. त्यासाठी आधार घेतला, तो सेवाकार्याचा. अर्थात, सेवाकार्य हे एक माध्यम आहे ते साध्य नाही, याची जाणीव बाळासाहेबांच्या मनात पक्की होती. कारण, कुठल्याही सोईसुविधा पुरवणे, हे ‘वनवासी कल्याण आश्रम’चे उद्दिष्ट कधीच नव्हते. बाळासाहेब देशपांडे नेहमी म्हणायचे की, ’आम्हाला असा समाज निर्माण करायचा आहे की, कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत तो विकासाची आकांक्षा बाळगून असेल.’

एका अर्थाने स्वाभिमानी, आत्मनिर्भर आणि आपली धर्म-संस्कृती, परंपरा यांबाबत गौरवाची भावना असलेला समाज आपल्याला निर्माण करण्याचे उद्दिष्ट कल्याण आश्रमाने आपल्यासमोर ठेवले. बाळासाहेब स्वतः ना कधी या उद्दिष्टांपासून ढळले ना, त्यांनी ‘वनवासी कल्याण आश्रम’ला या उद्दिष्टापासून दूर जाऊ दिले. या कार्याच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेली कार्यपद्धती विकसित, तर केलीच, पण हाच विचार, हीच कार्यपद्धती सक्षमतेने पुढे घेऊन जातील, असे शेकडो कार्यकर्ते त्यांनी आपल्या हयातीतच निर्माण केले. हेच बाळासाहेब देशपांडे यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्याचमुळे बाळासाहेब देशपांडे गेल्यानंतरदेखील आजही त्याच विचाराने, ध्येयाने आणि त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर ‘वनवासी कल्याण आश्रम’ची वाटचाल चालू असल्याचे आपल्याला दिसते.

वनवासी समाजाच्या सर्व समस्यांचे मूळ हे शिक्षणाच्या अभावात होते. त्यामुळे स्वाभाविकपणे कल्याण आश्रमाची सुरुवातच मुळी एका छात्रावासाच्या माध्यमातून झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या सर्व कार्याचा देशभरात जो विस्तार झाला. तोदेखील शिक्षणाच्या माध्यमातूनच झाला. अनेक ठिकाणी छात्रावास, शाळा, बालसंस्कार केंद्र, एकल विद्यालय यांसारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून शिक्षण विषयक जागरण झाले.

आज खूप ठिकाणी वनवासी क्षेत्रातील जाणते लोक असे मानतात की, ‘वनवासी कल्याण आश्रम’चे कार्य जर सुरू झाले नसते, तर हा भाग केव्हाच संपूर्ण ख्रिश्चन झाला असता. एका अर्थाने ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करणारी ही प्रातिनिधिक स्वरुपाची प्रतिक्रिया म्हणावी लागते. आज विविध सेवाकार्याच्या माध्यमातून व निरपेक्ष संपर्काच्या माध्यमातून कल्याण आश्रमाने राष्ट्रवादी विचार करणार्‍या व्यक्तींचे एक खूप मोठे जाळे वनवासी क्षेत्रात विणण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे आज निश्चितपणे आपण असे म्हणू शकतो की, या सर्व षड्यंत्रकारी कारवायांना खूप मोठ्या प्रमाणात पायबंद घालण्यात ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे कार्य यशस्वी ठरले आहे.

’वनवासी, नगरवासी, आपण सारे भारतवासी’ हा आश्रमाचा विचार घेऊन वनवासी बांधवांच्या विकासात सहभागी होणे, ही मोठा भाऊ म्हणून आपलीदेखील जबाबदारी आहे, असा भाव असलेले हजारो कार्यकर्ते आज नगरातदेखील अत्यंत निरलस भावनेने कार्यरत असल्याचे आपल्याला दिसते. त्यामुळे ज्यांना आपल्या देशासाठी, समाजासाठी काहीतरी रचनात्मक कार्य करायचे आहे, अशा हजारो लोकांसाठी ‘वनवासी कल्याण आश्रम’ हे अत्यंत प्रभावी व विश्वासार्ह माध्यम असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी आपल्या कामातून निर्माण केला आहे. ‘वनवासी कल्याण आश्रम’ आज आपल्या १४ विविध आयामांच्या माध्यमातून कार्यरत आहे. शिक्षण, आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच हितरक्षा, श्रद्धा जागरण, खेलकूद, लोककला अशा विविध अंगानादेखील ‘वनवासी कल्याण आश्रम’ने स्पर्श केला आहे. हजारो प्रकल्प किंवा विविध आयाम असले, तरीदेखील जनजाती समाजाची सर्वांगीण उन्नती, हे उद्दिष्ट ‘वनवासी कल्याण आश्रमा’ने कधीच दृष्टिआड होऊ दिलेले नाही. त्यामुळे आज ‘हितरक्षा’ सारख्या आयामाच्या माध्यमातून वनवासी बांधवांना त्यांचे हक्क प्राप्त करून देण्यासाठी ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे कार्यकर्ते खूप मोठे प्रयत्न करीत आहेत.

या सर्व कामाचा एकत्रित परिणाम म्हणून स्वाभाविकपणे एक जागृत, संघटित व सामर्थ्यशाली वनवासी समाजाच्या निर्मितीत झाला आहे, असे आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. २०२७ साली कल्याण आश्रमाला ७५ वर्षे पूर्ण होतील. तेव्हा एक स्वाभिमानी, सुसंघटित वनवासी समाजनिर्मितीचे जे स्वप्न ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे संस्थापक वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांनी बघितले होते, ते निश्चितपणे पूर्णत्वास आलेले असेल. मात्र, त्यासाठी संपूर्ण समाजाने पूर्ण शक्तिनिशी या कार्याच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता आहे. कारण, ‘कल्याण आश्रमा’चे कार्य म्हणजे आपला ’राष्ट्रीय प्रवाह’ सुदृढ करण्याचे एक मूलभूत असे राष्ट्रीय स्वरुपाचे कार्य आहे.

९३२१६५८५७१
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.