प्रेक्षकांची ‘नस’ नाकारणारा

    11-Sep-2023   
Total Views |
Naseeruddin Shah calls Gadar 2, The Kerala Story success disturbing

चित्रपट हिट होत नसले की, मग ‘लाईमलाईट’मध्ये राहण्याचा खटाटोप सुरू होतो. त्यासाठी वादग्रस्त मुद्द्यांना हात घालायचा आणि नकारात्मक का होईना प्रसिद्धी मिळवायची, असा काहींचा शिरस्ता. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते नसरुद्दीन शाह यांचे नाव यामध्ये तर अग्रक्रमावर. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चित्रपटांची, वेबसीरिजची पोळी भाजून त्यांना उदरनिर्वाह. हिंदू प्रेक्षक लागतात, मात्र त्यांच्या भावना आणि अस्मितेशी यांना काहीही देणेघणे नसते. त्यामुळेच हिंदू आणि हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडणार्‍या प्रत्येक गोष्टीवर आणि कृतीवर यांना आपले रडगाणे जगाला ऐकवायचे असते. नसरुद्दीन यांना अनेक विक्रम मोडीत काढणार्‍या आणि देशवासीयांच्या मनात आपली जागा निर्माण करणार्‍या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचा त्रास होतोय. ‘द काश्मीर फाईल्स’सारखे चित्रपट प्रसिद्ध होणे त्रासदायक असून अशा चित्रपटामुळे भावी पिढी धोक्यात असल्याचेही ते बरळले. ’मॅन वुमन मॅन वुमन’ या लघुपटाचे दिग्दर्शन नसरुद्दीन यांनी केले असून नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान त्यांनी आपली मळमळ बाहेर काढली. विशेष म्हणजे, तब्बल १७ वर्षांनी त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात परतण्याचा निर्णय घेतला. इतकी वर्षं दिग्दर्शन क्षेत्रानेही मोकळा श्वास घेतला असेल. पण, पुन्हा परतल्यानंतर जगाला कळलंही पाहिजे की, आपण दिग्दर्शन सुरू करत आहोत. त्यामुळे वादंग निर्माण करायलाच हवे. महाशयांना ‘गदर २’ आणि ‘द केरला स्टोरी’ हे चित्रपट कसे चालू शकले, असा प्रश्नदेखील पडला. लोकांनी चित्रपटगृहांना गर्दी केली आणि त्यांनीच हे चित्रपट डोक्यावर घेतले, हे डोक्यावर पडलेल्या माणसाला सांगून उपयोग काय? अशा वायफळ बोलण्यामुळे यांना कधी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले नाही, त्यामुळे हिंदूंवरील अन्याय लोकांपर्यंत पोहोचवणार्‍या चित्रपटांचे यशही नसरूद्दीन यांना पचेनासे झाले. दुसर्‍या चित्रपटांना वाईट आणि त्रासदायक म्हणणार्‍या नसरूद्दीन यांनी उलाला-उलाला करून देशाचं मनोरंजन केलं. या भ्रमातून वेळीच बाहेर पडणे गरजेचे आहे. चित्रपट एकवेळ ठीक, पण महाशयांना देशावर चंगळवादी राज्य करीत असल्याचा साक्षात्कार झाला. तसेच, मागील महिन्यात सिंधी भाषिकांचा त्यांनी अपमान केला. आता त्यांनी मोर्चा राष्ट्रवादाने ओतप्रेत भरलेल्या चित्रपटांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे नसरूद्दीन यांना प्रेक्षकांची नसही ओळखता आली नाही, हेच खरे!
 
हिंदुत्वाला धुडकावणारा

'जी २०’ शिखर परिषदेचा भव्य सोहळा नुकताच भारत मंडपममध्ये यशस्वीरित्या संपन्न झाला. इकडे भारताच्या रणनीतीला यश येत असताना तिकडे फ्रान्समध्ये खा. राहुल गांधींनी अकलेचे तारे तोडले. पॅरिस येथील साइंसेज पीओ युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी भारत, भाजप आणि हिंदुत्वावर आपले ज्ञान पाजळले. “मी हिंदू धर्माशी संबंधित कोणत्याही पुस्तकात वाचले नाही किंवा कोणत्याही जाणकार हिंदू व्यक्तीकडून असे ऐकले नाही की, तुम्ही तुमच्यापेक्षा दुर्बल लोकांना त्रास द्या, त्यांचे नुकसान करा, त्यामुळे हे विचार, हे शब्द, हिंदू राष्ट्रवाद हे चुकीचे शब्द आहे. ते हिंदू राष्ट्रवादी नाही. त्यांचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही, त्यांना कोणत्याही किमतीत सत्ता मिळवायची आहे आणि सत्ता मिळवण्यासाठी ते काहीही करतील,” अशी वायफळ बडबड केली. परदेशात जाऊन भारतीय राजकारण आणि सत्ताधार्‍यांवर आसूड ओढायचे असतील, तर राहुल यांनी पॅरिसमधूनच निवडणूक लढवावी. तिथे नाही तर इटली आहेच की! बरं तीन बैठका होऊन ‘इंडिया’ आघाडी मोदींविरोधात उभी ठाकली. परंतु, यांच्यातच एकमत नाही. ‘जी २०’ शिखर परिषदेनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला एकही काँग्रेसी मुख्यमंत्र्याने हजेरी लावली नाही. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगढचे भूपेश बघेल यांनी तर आमच्या विमानांना दिल्लीत उतरण्याची परवानगीच नाही, तर दिल्लीत कसे येणार, असे कारण दिले. त्यावर गृहमंत्रालयाने असे कोणतेही प्रतिबंध लावण्यात आले नसल्याचा खुलासा करून काँग्रेसचा खोटारडेपणा समोर आणला. याउलट ‘इंडिया’ आघाडीचे सहकारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, झारखंडचे हेमंत सोरेन, तामिळनाडूचे एम. के. स्टॅलिन आणि दिल्लीचे अरविंद केजरीवाल स्नेहभोजनाला पोहोचले. सर्व मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देऊनही फक्त काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी दांडी मारली. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीतील सहकारी इकडे स्नेहभोजनात व्यस्त असताना तिकडे राहुल गांधी मात्र भारतविरोधी गरळ ओकत राहिले. एवढंच नव्हे तर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ‘जी २०’ परिषदेबाबत मोदी सरकारचं जोरदार कौतुक केलं. त्यामुळे परदेशात राहुल रागात आणि इकडे ‘इंडिया’ आघाडीचे सहकारी मात्र जोमात असल्याचेच चित्र पाहायला मिळाले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.