तळकोकणच्या आरोग्यासाठी...

    11-Sep-2023   
Total Views |
Article On Dr. Amey Pradeep Desai

वैद्यकीय सेवेत आपल्या सेवाकार्याचा अविरत ठसा उमटवणारे डॉ. अमेय प्रदीप देसाई यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...

आईला मेंदूचा एका असाध्य दुर्धर रोगाने गाठले होते. आई देवाघरी गेली की, मी आत्महत्या करणार. दहावीत असणार्‍या अमेयने ठरवलेले. अमेय यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते, तर वडील कामाला असत. आईने लहाणपणापासून शिकवले होते की, बाळ जे काही करशील, त्यात तुझं अस्तित्व उमटलं पाहिजे. मग कोणतेही काम असू दे, ते करताना तुला कुणी पाहो की न पाहो, तुला कुणी शाबासकी देवो ना देवो. पण, तू हातात घेतलेले काम मनापासून १०० टक्के यशस्वीरित्या पूर्ण करायलाच हवे. त्यामुळे दुर्धर आजारामुळे कोमामध्ये गेलेल्या आईची सेवाही अमेय अतिशय निष्ठेने व्यवस्थितपणे करत. मात्र, शेवटी आई गेली. त्यानंतर काही दिवसांतच ‘रिझर्व्ह बँके’त असलेल्या अमेय यांच्या वडिलांना क्षयरोगाने गाठले. त्यांच्या छातीत पाणी झाले. आई गेल्यानंतर जीव द्यायचा, हा विचार करणार्‍या अमेय यांना वाटू लागले की, जीव दिला तर वडिलांचे काय होणार? हा विचार येत त्यांनी वडिलांच्या शुश्रूषेचे वाण स्वीकारले, अशा परिस्थितीमध्येही अमेय यांनी दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळवले.

किशोरवयात आईबाबांचे वेदनादायी आजार अनुभवणारे अमेय आज ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलचे क्लिनिकल असोसिएट आहेत. शिवाय जनकल्याण समितीतर्फे राबविल्या जाणार्‍या अनेक समाजकार्यांत त्यांचा सक्रीय सहभाग असतो. ‘एमबीबीएस’,‘पीजीडीएमएलएस’, ‘डीएनबी’ या वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून सध्या डॉ. अमेय हे वकिलीचे शिक्षण पूर्ण करीत आहेत. आकाशवाणी आणि इतर माध्यमांवर ते आरोग्यविषयक माहिती देत असतात. कोरोना देशात आला, त्या दिवसापासून ते दुसरी-तिसरी लाट ओसरेपर्यंत अमेय यांनी कोरोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी युद्धपातळीवर एक मोहीमच सुरू केली होती. कोरोना झाला तर? हा प्रश्नही त्यांच्या मनात एकदाही डोकावला नाही.

कारण, आई आजारी असताना त्यांचे काळीज दुःखाने पिळवटून जायचे. त्या काळात मन:शांतीसाठी ते धार्मिक आणि ऐतिहासिक पुस्तकांमध्ये रमू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, कार्य यामुळे मनात प्रेरणा निर्माण झाली. ठरवलेले काम महत्त्वाचे, मग त्यापुढे मृत्यूही गौण, अशी त्यांच्या विचारांची बैठकच तयार झाली होती. त्यामुळे कोरोना काळात रुग्णांची सेवा या ठरवलेल्या उद्दिष्टांपुढे त्यांना कसलीच तमा नव्हती. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते, तर ‘झी’चा ‘युवा पुरस्कार’ही त्यांना प्राप्त झाला. त्यांनी तीन पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी एका पुस्तकाला देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावना लिहिली आहे.

डॉ. अमेय देसाई यांच्या जीवनाचा मागोवा घेऊया. देसाई कुटुंब मूळचे कुडाळच्या वालावल गावचे. कामानिमित्त मुंबईत गिरगाव येथे स्थायिक झालेले. प्रदीप देसाई आणि संध्या देसाई या दाम्पत्याला दोन अपत्ये. त्यापैकी एक अमेय. देसाई गिरगावमध्ये कुडाळ देशकर निवास चाळीत राहायचे. चाळीचा कुडाळ देशकर निवास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ होते. (या मंडळाला यंदा ९७ वर्षे पूर्ण होत आहेत.) बाप्पांचे आगमन होण्यापूर्वी चाळीतले सगळे लोक एकत्र जमत गणेशोत्सवाची तयारी करीत. या गणेशोत्सवाच्या तयारीत त्यावेळीचे वयाने छोटे अमेयही सहभागी होत असत. “परस्पर संवाद, सहभाग, समजूतदारपणा, समन्वय हे सगळे अत्यावश्यक गुण या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातूनच शिकलो. तसेच पुढील आयुष्यात श्रीकांत भारतीय यांच्यासारखे हितचिंतक, मार्गदर्शक लाभले. त्यांच्याकडूनही शिकायला मिळाले,” असे अमेय म्हणतात.

असो, छोट्या-छोट्या गोष्टी मनाला वळण लावतात. सेवाव्रताचे वळण अमेय यांना कसे लागले? अमेय त्यावेळी इयत्ता नववीत होते. गणेशोत्सव सुरू होता. एक आजीबाई गणपती बाप्पांच्या दर्शनाला आल्या होत्या. पायर्‍या उतरताना त्यांचा तोल जाणार, इतक्यात अमेय यांनी आजीबाईंना हात दिला. गोष्टच साधीच. पण, समोरच्या खिडकीत आई उभी होती. अमेय यांनी आजीला मदत केली. हे पाहताना तिच्या डोळ्यात अपार आनंद अभिमान आणि लेकाविषयी कौतुक होते. आईच्या डोळ्यातले ते भाव अमेय यांच्या मनात सेवेचा दीप प्रज्ज्वलित करून गेले. त्यानंतर अमेय कधीही आईच्या डोळ्यातला तो आनंद विसरले नाहीत. सेवाभाव जपतच ते मार्गक्रमण करू लागले.

पुढे डॉ. तात्याराव लहाने यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव मिळाला. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोतिबिंदू शस्त्रक्रियेचे शिबीर आयोजित केले होते. तेव्हा तळकोकणातल्या आरोग्य समस्या त्यांनी पाहिल्या. पैशांमुळे नाही तर अज्ञान किंवा साधनसुविधांच्या अभावामुळे इथे छोटे-छोटे आजारही माणसाच्या जीवावर बेतत. हे सगळे पाहून डॉ. अमेय यांनी तळकोकण हे आपल्या आरोग्य सेवेची कर्मभूमी असल्याचे मनाशी पक्के ठरवले. तळकोकणात डॉ. अमेय आरोग्यविषयक जागरण, उपक्रम राबवत असतात. डॉ. अमेय सध्या भाजप वैद्यकीय आघाडीतर्फे कोकणचे प्रभारी म्हणूनही काम करतात. या सगळ्या काळात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुरेश प्रभू यांचेही मार्गदर्शन त्यांना मिळत असते. डॉ. अमेय म्हणतात की,”माझ्या आयुष्यात तळकोकणाला आरोग्याच्यादृष्टीने संपन्न होताना पाहायचे आहे. त्यासाठीच मी सातत्याने काम करणार आहे.” तळकोकणाच्या आरोग्यासाठी काम करणारे डॉ. अमेय देसाई हे वैद्यकीय क्षेत्रातले आदर्शच म्हणायला हवेत.

९५९४९६९६३८

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.