चीनला टक्कर देण्यासाठी भारत सज्ज; उभारणार जगातील सर्वात उंचीवर असलेली धावपट्टी

    10-Sep-2023
Total Views |


India China


मुंबई :
जी-२० शिखर परिषद संपल्यानंतर काहीच वेळात भारताकडून चीनला एक मोठा संदेश देण्यात आल्याची चर्चा होत आहे. लडाखच्या न्योमा भागात जगातील सर्वात उंच लढाऊ हवाई क्षेत्राची निर्मिती भारत करणार आहे. या योजनेचा शिलान्यास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

१२ सप्टेंबरपासून जम्मूमधील देवक पुलापासून कामाची सुरुवात करण्यात येईल. पूर्व लडाखमधील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या न्योमा पट्ट्यात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनद्वारे नवीन एअरफील्ड बांधण्यासाठी एकूण २१८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

पूर्व लडाखमधील न्योमा ॲडव्हान्स लँडिंग मैदानाचा वापर भारतीय सैन्याकडून मागील तीन वर्षांपासून केला जात आहे. युद्धाच्या सामग्रीच्या वाहतुकीसाठी प्रामुख्याने या मैदानाचा वापर भारताकडून केला जातो. २०२० मध्ये गलवानमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये अजूनही तणावाचे वातावरण आहे.

तसेच सध्या एलएसीवर चीनसोबत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चीनला चोख उत्तर देण्यासाठी या एअरफिल्डची उभारणी करणे हे भारताकडून उचलण्यात आलेले अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचे भारताला कौतुक आहे.