‘गदर २’ ऑस्करला जाण्याच्या तयारीत, दिग्दर्शक म्हणतात...

    01-Sep-2023
Total Views |
 
gadar 2
 
 
मुंबई : अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडून नवा इतिहास रचला आहे. गदर: एक प्रेम कथा हा पहिल्या भागानेही बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करत प्रेक्षकांची मने जिंकली होती. आणि आता त्याच पावलावर पाऊल ठेवत ‘गदर २’ चित्रपट भरघोस कमाई करत आहे. ११ ऑगस्ट रोजी देशभरात प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ या चित्रपटाने आत्तापर्यंत ४०० कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे आता दिग्दर्शक अनिल शर्मा ‘गदर २’ चित्रपटाला ऑस्करसाठी पाठवण्याची तयारी करत असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे. दरम्यान, ‘गदर २’ची संपूर्ण टीम या चित्रपटाला ऑस्करसाठी पाठवण्याच्या अर्जावर काम करत आहे.
 
नुकताच अनिल शर्मा यांनी इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रेक्षकच त्यांना फोन करून हा चित्रपट ऑस्करला पाठवण्याची मागणी करत आहेत असे म्हणाले. “आम्ही सगळेच यासाठी प्रयत्न करत आहोत. ‘गदर २’ला ऑस्करसाठी पाठवायला हवं, या चित्रपटात ती ताकद आहे. पहिल्या भागाप्रमाणेच ‘गदर २’ची कथादेखील एका वेगळ्याच पद्धतीने मांडली आहे आणि ही सत्य कहाणी आहे.”
 
तसेच, पुढे अनिल शर्मा यांनी ४० वर्षं या इंडस्ट्रीमध्ये काम करूनसुद्धा त्यांना किंवा त्यांच्या चित्रपटाला म्हणावा तसा सन्मान किंवा पुरस्कार मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. इतकंच नव्हे तर आपण या इंडस्ट्रीचा एक भाग आहोत असं देखील अनिल शर्मा यांना वाटत नसल्याची थेट कबूलील शर्मा यांनी यावेळी दिली.
 
 
दरम्यान, ‘गदर २’ चित्रपटाने आत्तापर्यंत ४८२.८५ कोटींची कमाई केली असून २१ आठवड्यानंतरही प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन चित्रपटाला तुफान प्रतिसाद देताना दिसत आहेत. त्यामुळे गदर २ शाहरुखच्या पठाण चित्रपटालाही मागे टाकणार असे दिसून येत आहे. तसेच, ७ सप्टेंबर रोजी शाहरुखचा ‘जवान’ चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार असून ‘जवान’ ‘गदर २’ ला मागे टाकणार की ‘गदर २’ ची जादू बॉक्स ऑफिसवर दिवसागणिक वाढत जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.