सप्टेंबर महिन्यात श्रावणाबरोबरच अनेक सणांचीही मंदियाळी आहे. या महिन्यात गणेश चतुर्थी, गोपाळकाला, पोळा यांसारखे अनेक सण साजरे केले जाणार आहेत. उपवास आणि सणांच्या दृष्टीने सप्टेंबर महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
कृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी , पोळा, हरतालिका, गणेशोत्सव, ऋषी पंचमी, ज्येष्ठ गौरी आवाहन, ज्येष्ठ गौरी पूजन, ज्येष्ठ गौरी विसर्जन, अनंत चतुर्दशी यांसारखे मुख्य सण-उपवासही सप्टेंबरमध्ये आहेत.
येत्या ६ सप्टेंबरला बुधवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला हा उत्सव साजरा केला जातो. ७ सप्टेंबरला गुरुवारी दहीहंडी साजरी केली जाणार आहे. १४ सप्टेंबरला पोळा हा सण साजरा केला जाणार आहे. १८ सप्टेंबरला हरतालिका असणार आहे. भाद्रपद महिन्यात गणरायाच्या आगमनाच्या एक दिवस आधी शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरतालिकेचे पूजन केले जाते.
१९ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. या दिवशी घरोघरी गणरायाचे आगमन होते. श्रीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होते. गणेशोत्सवाला या दिवसापासून सुरुवात होते २० सप्टेंबर रोजी ऋषी पंचमी आहे; जी हिंदू धर्मातील सात ऋषींना समर्पित आहे. २१ सप्टेंबरला ज्येष्ठ गौरी आवाहन आहे.
२२ सप्टेंबर २०२३ रोजी ज्येष्ठा गौरी पूजन केले जाणार आहे. महिला एकमेकांच्या घरी हळदीकुंकू आणि गौरीच्या दर्शनासाठी जातात. २३ सप्टेंबरला ज्येष्ठ गौरींचे विसर्जन होणार आहे .ज्यांच्या घरी गौरी येतात, त्यांच्याकडे गौरीसह गणेशमूर्तीचेही विसर्जन केले जाते. २८ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. या दिवशी गणेशोत्सवाची समाप्ती होते.