मुंबई : कोरोना काळानंतर मनोरंजनसृष्टीही आपली मरगळ झटकून पुन्हा एकदा टवटवीत झाली. विविध आशय, विषय, नवोदित कलाकार आणि दिग्दर्शकांची मांदियाळी प्रेक्षकांच्या भेटीला आली. मालिका, चित्रपट, नाटक, वेब मालिका अशा विविध माध्यमांतून मनोरंजनाचा प्रवाह जोरात आहे. मात्र, कोरोनाच्या आधीपासूनच हिंदी चित्रपटसृष्टीकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असल्याचे काही अंशी दिसून आले.
पण, २०२३ हे वर्ष खर्या अर्थाने हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आल्हाददायक ठरले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. केवळ हिंदीच नाही, तर दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटांनीदेखील बॉक्स ऑफिसवर ऑगस्ट महिन्यात भरघोस कमाई केली आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांनी देशभरात आणि जगभरात एक हजार कोटींच्या पुढे गल्ला जमवत एक नवा इतिहासच रचला. करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट जरी दि. २८ जुलै रोजी प्रदर्शित झाला असला, तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ऑगस्ट महिन्यात अधिक कमाई केली होती.
२०२३ची सुरुवातचखर्या अर्थाने हिंदी चित्रपटसृष्टीसाठी शुभसंकेत घेऊन आली. शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने जगभरात १०५०.३ कोटींची आणि देशभरात ५४०.२६ कोटींची कमाई करत एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली २’ चित्रपटाचाही रेकॉर्ड मोडला. त्यानंतर जानेवारी ते जुलै या महिन्यांत प्रदर्शित झालेल्या ‘तू झूठी मैं मक्कार’, ‘भीड़’, ‘भोला’, ‘मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे’ या चित्रपटांनीही बॉक्सऑफीसवर भरघोस कमाई केली. या व्यतिरिक्त मराठी चित्रपटांमध्येही ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने हिंदी चित्रपटांना तोडीस तोड उत्तर देत ८० कोटींच्या पुढे गल्ला जमवला.
आगामी प्रदर्शित होणार्या मोठ्या कलाकारांच्या चित्रपटांकडूनही भरघोस कमाईची आणि प्रेक्षकांच्या पसंतीची अपेक्षा मनोरंजन क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. एकूणच २०२३ या वर्षाची दमदार सुरुवात शाहरुखच्या ‘पठाण’चित्रपटापासून झाली असून, वर्षाचा शेवट त्याच्याच ‘डंकी’ या चित्रपटाने होणार आहे.
रसिका शिंदे-पॉल