#FlyingKiss case : 'राहुल गांधी यांची संसदेतून हकालपट्टी करा'

खासदार पुनम महाजन यांची मागणी

    09-Aug-2023
Total Views |
poonam mahajan on Flying Kiss case

नवी दिल्ली : लोकसभेत दि. ९ ऑगस्ट रोजी राहुल गांधींच्या फ्लाइंग किसवरून गदारोळ झाला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आरोप केला की, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अशोभनीय हावभाव केले, ज्यासाठी त्यांनी माफी मागावी. महिला खासदार सभागृहात बसल्या असताना राहुल यांनी फ्लाइंग किसचे हावभाव केल्याचा आरोप केंद्रीय मंत्र्यांनी केला.

दरम्यान काँग्रेस नेत्याच्या या कृतीवरून सभागृहात गदारोळ झाला.२२ महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कारवाईसाठी पत्र लिहिले आहे. भाजप खासदार पूनम महाजन यांनी राहुल गांधी यांची संसदेतून हकालपट्टी करण्याची मागणी केली, तर रिटा बहुगुणा यांनी फ्लाइंग किस ट्रेझरी बेंचकडे बोट दाखवल्याचा आरोप केला. पुनम महाजन म्हणाल्या की, मोहब्बत की दुकान खोलणाऱ्यांच्या भाषेत द्वेष भरलेला आहे. त्यामुळे फक्त नाव ठेवून काही होत नाही मोहब्बत करायला लागते. त्यामुळे असे आक्षेपार्ह हावभाव रस्त्यावर करू शकतो. पण संसदेत नाही, असे ही पुनम महाजन म्हणाल्या.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणतात की, आजपर्यंत अशी कृत्ये रस्त्यावर होतात असे ऐकले होते, पण आता लोकशाहीच्या मंदिरात, सदनात घडत आहे. ही अमानवी कृत्य असून लोकसभा अध्यक्षांनी कारवाई करावी. आपल्या भाषणात स्मृती इराणी म्हणाल्या की, मला एका गोष्टीवर आक्षेप घ्यायचा आहे. ज्यांना माझ्यासमोर निवेदन करण्याचा अधिकार देण्यात आला होता त्यांनी आज निघताना अशोभनीय कृत्य केले.
 
जेव्हा महिला खासदार संसदेत बसलेल्या होत्या त्यावेळी फ्लाइंग किसचे हावभाव करण्यात आले. असे कृत्य या आधी संसदेत कधीच घडले नव्हते, असे माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले. त्याचबरोबर काँग्रेस खासदाराचे असे वर्तन निर्लज्जपणाची पराकाष्ठा असून या कृत्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी ही त्यांनी केली.

तत्पूर्वी, सभागृहात अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या करण्यात आली. यानंतर संसदेत बराच गदारोळ झाला. जम्मू-काश्मीर, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपने काँग्रेसला कोंडीत पकडले.