नवी दिल्ली : उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मणिपूमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता. मात्र, केंद्र सरकारने तोडगा काढण्यासाठी वेगवान हालचाली केल्यानेच तेथे आता शांतता प्रस्थापित होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी तेथील घटनांचे राजकारण करू आगीत तेल ओतण्याचे काम करू नये, असा इशारा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांनी बुधवारी दिला आहे.
काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास ठरावाच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी प्रस्तावाविरोधात केंद्र सरकारची बाजू मांडली. यावेळी शाह यांनी मणिपूरसह सर्व मुद्द्यांवर अतिशय आपल्या जवळपास ३ तासांच्या भाषणात सविस्तर उत्तर दिले. यावेळी लोकसभेत मणिपूरमधील दोन्ही गटांना शांततेचे आव्हान करण्याचा ठराव करण्यात आला.
म्यानमारमध्ये लष्करशाही आल्यापासून मणिपूर आणि मिझोराममध्ये कुकी शरणार्थींची संख्या वाढली आहे. मणिपूरमध्ये त्यांच्या वसाहती तयार झाल्या आहेत. यामुळे तेथील मैतेई समुदायाच्या मनात लोकंसख्या असंतुलनाविषयी भय निर्माण झाले होते. त्यातच २९ एप्रिल रोजी तेथे कुकींच्या वसाहतीस गाव घोषित केल्याची अफवा पसरविण्यात आली, प्रशासनाने त्याचे तातडीने खंडनही केले. मात्र, त्यानंतर मणिपूर उच्च न्यायालयाने राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना विश्वासात न घेता मैतेईंच्या आरक्षणावर निर्णय घेण्याचा आदेश दीर्घकाळपर्यंत प्रलंबित असलेल्या याचिकेवर सुनावणी करून दिला. त्या निर्णयामुळे राज्यात दंगलींना प्रारंभ झाल्याचे केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरविषयी अतिशय गंभीर असून ते रात्री-अपरात्रीही परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे शाह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, हिंसाचार सुरू होताच केंद्र सरकारने तातडीने सुरक्षा व्यवस्था केल्या. तेथे केंद्रातून वरिष्ठ अधिकारी पाठविण्यात आले, राज्याचे पोलिस महासंचालक, मुख्य सचिव बदलून तेथे केंद्रातून अधिकारी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. आपण स्वत: तेथे तीन रात्री राहिलो असून केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हे तेथे २३ दिवस तळ ठोकून होते. आजही तेथील परिस्थितीचा दर आठवड्याला आणि केंद्रीय गृहसचिव पातळीवर दर दोन दिवसांनी आढावा घेतला जात आहे, असेही शाह यांनी यावेळी नमूद केले.
‘ती’ चित्रफित पोलिसांकडे का दिली नाही ?
महिला अत्याचाराची घटना ४ मे रोजी घडली होती, त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी ‘ती’ चित्रफित संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर सार्वजनिक करण्याच्या ‘टायमिंग’वर शाह यांनी शंका व्यक्त केली. संबंधित चित्रफीत तातडीने म्हणजे ५ मे रोजीच पोलिसांकडे दिली असती तर आरोपी तत्काळ पकडले गेले असते. कारण, दोन महिन्यांनी ती चित्रफित सार्वजनिक झाल्यानंतर ‘फेस रिकग्निशन’ तंत्रज्ञानाद्वारे ९ आरोपींना अटक झाल्याचे शाह यांनी स्पष्ट केले.
राज्यात शांततेसाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध
· हिंसाचारात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना केंद्र व राज्य सरकारतर्फे प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत. जखमी आणि संपत्तीचे नुकसान झालेल्यांनाही मदत दिली जाणार.
· जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये यासाठी केंद्र सरकार अतिरिक्त ३० हजार टन तांदुळ पुरविणार. पेट्रोलच्या पुरवठ्यासाठी १५ पेट्रोल पंप २४ तास खुले राहणार, गॅस, भाज्या आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी शिबिरांची स्थापना. डॉक्टरांची आठ पथके कार्यरत राहणार.
· वाहतुकीसाठी खोन्सेंग रेल्वे स्थानकावर तात्पुरता फलाटाची निर्मिती करून रेल्वे सेवा सुरू करणार. तात्पुरत्या हेलिकॉप्टर सेवेसही प्रारंभ.
· स्पर्धा परिक्षांसह अन्य विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय सक्रिय. ऑनलाईन शिक्षणाची सोय.
· उच्च न्यायालयाच्या कामकाजासाठी तीन ठिकाणी ऑनलाईन सुनावणीची व्यवस्था.
· केंद्रीय गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव स्तराचे एक अधिकारी आणि अन्य मंत्रालयाचे डायरेक्टर स्तरावरचे अधिकारी कार्यरत राहणार.
· कायमस्वरूपी तोडग्यासाठी भारत – म्यानमार सीमेवर १० किमीचे तारेचे कुंपण पूर्ण, ८० किमी साठीची कार्यवाही पूर्ण तर उर्वरित सीमेसाठी सर्वेक्षण सुरू. म्यानमारमधून भारतात येणाऱ्यांची बायोमेट्रीक माहिती घेणार.
राहुल गांधींचे राजकारण
राज्यातील हिंसाग्रस्त चुराचंदपूर येथे जाण्यासाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना केंद्राने हेलिकॉप्टर देऊ केले होते. मात्र, त्यांनी ते नाकारून रस्तेमार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्यांन अडविण्यात आल्यानंतर त्यांनी त्याचे राजकारण सुरू केले. विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी ते तेथे हेलिकॉप्टरने रवाना झाले. त्यामुळे अशाप्रकारचे राजकारण करून आगीत तेल ओतू नये, असे आवाहन शाह यांनी केले.
वसंतदादांचे सरकार कोणी पाडले ?
मोदी सरकारने गेल्या ९ वर्षात ९ राज्ये सरकारे पाडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना शाह यांनी सुळे यांच्या विधानाचा खरपूर समाचार घेतला. महाराष्ट्रात शरद पवार यांनीच सर्वप्रथम वसंतदादांचे सरकार पाडून जनसंघाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केल्याची आठवण गृहमंत्री शाह यांनी सुळे यांना करून दिली.