अध्यक्ष म्हणून पवारांची भूमिका संशयास्पद : अनिल गलगली

मराठी ग्रंथसंग्रहालय प्रकरणी श्वेतपत्रिका काढण्याचीही मागणी

    09-Aug-2023
Total Views |
RTI Karyakarta Anil Galgali Interview

मुंबई (ओंकार देशमुख) :
मुंबईच्या साहित्य विश्वातील महत्त्वपूर्ण आणि सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कारभारावरून संचालक मंडळ आणि अध्यक्ष संशयाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. संस्थेचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात संस्थेच्या जागेवर नवी इमारत बांधण्याची घोषणा केल्यानंतर काही मंडळींनी यावर संशय व्यक्त केला आहे. आधीच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कारभारावरून आक्षेप आणि आरोप केले जात असताना मोक्याच्या ठिकाणी नव्याने वास्तू उभारण्याची घोषणा करण्यामागे नेमका काय हेतू आहे? संस्थेत होत असलेल्या गैरप्रकारांवर पवार कारवाई का करत नाहीत? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील गैरप्रकार आणि अनियमिततांवर बोट ठेवत या प्रकरणात संस्थेचे अध्यक्ष म्हणून शरद पवारांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप ‘आरटीआय’ कार्यकर्ते आणि तक्रारदार अनिल गलगली यांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी बोलताना केला आहे.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात नेमकं चाललंय काय?

सव्वाशे वर्षांचा प्रदीर्घ इतिहास आणि गौरवशाली परंपरा असलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात गेल्या काही वर्षांपासून मोठा अनागोंदी कारभार सुरू आहे. काही मंडळींनी आपले साम्राज्य स्थापित केले असून त्यामुळे संस्थेचे नुकसान होत आहे. अनेक वर्ष घेण्यात न आलेल्या संस्थेच्या निवडणुका गेल्यावर्षी घेण्यात अध्यक्ष म्हणून पवारांची भूमिका संशयास्पद : अनिल गलगली आल्या खर्‍या पण सात ते आठ हजार सदस्यांपैकी केवळ ३२ लोकांनाच मतदानाचा अधिकार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या काही मालमत्ता विकण्यात आल्याचाही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात शासन, धर्मादाय आयुक्त आणि न्यायालयात आम्ही विविध प्रकारचे दावे केले असून त्या विरोधात आमचा संघर्ष सुरू आहे. काही विशिष्ट लोकांच्या एका कंपूने या ग्रंथसंग्रहालयावर ताबा घेतला असून त्यातून संस्थेची सुटका करणे गरजेचे आहे. संस्थेचा वाढता खर्च आणि कमी होणारे उत्पन्न यामुळे संस्थेची दुरावस्था होत आहे. आम्ही संस्थेच्या मंडळींसह शासन प्रशासन आणि न्यायालयात लढा देत असून त्याला यश येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
 
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष म्हणून शरद पवारांची यात नेमकी भूमिका काय आहे ?

संस्थेच्या मालमत्तांची झालेली विक्री बेकायदेशीर असून त्या विरोधात आम्ही अनेक ज्येष्ठ मंडळींनासोबत घेऊन आंदोलन केले होते. तसेच, संस्थेतील अनेक गैरप्रकारांची माहितीदेखील आम्ही अध्यक्ष म्हणून शरद पवारांना दिली होती. त्याची दखल घेत संस्थेचे अध्यक्ष असलेल्या शरद पवारांनी आमच्याशी तीन ते चार तासांची प्रदीर्घ चर्चा केली होती. आम्ही संस्थेच्या संदर्भात घेतलेल्या आक्षेपांवर आणि इतर काही मुद्द्यांवर शरद पवारांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र, पवारांसोबत चर्चा झाल्यानंतरही मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील त्या सर्व अनियमितता आणि गैरप्रकारांवर कुठलीही कारवाई आजतागायत झालेलीनाही. त्या बैठकीनंतरदेखील आम्ही सर्वांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही आम्हाला म्हणावासा तसा प्रतिसाद मिळाला नाही. केवळ आश्वासन देण्यापलीकडे अध्यक्ष या नात्याने पवारांनीदेखील कोणतीही कारवाई केली नाही. परवाच्या कार्यक्रमात बोलताना पवारांनी ग्रंथसंग्रहालयाच्या जागेवर एक भव्य वास्तू उभारणार असल्याचे बोलून दाखवले. पण असे विधान करून पवारांना नेमकं काय साध्य करायचं आहे ? त्या वास्तूची रूपरेषा आणि इतर बाबी काय असणार आहेत याची कुठलीही स्पष्टता पवारांकडून किंवा संस्थेकडून देण्यात आली नाही. त्यामुळे संस्थेत झालेल्या आणि होत असलेल्या गैरप्रकारांची आवश्यक ती माहिती ज्ञात असूनही पवारांनी कुठलीही कारवाई न केल्याने अध्यक्ष म्हणून शरद पवारांची भूमिका आम्हाला संशयास्पद वाटते.

संस्थेतील गैरप्रकारांची चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. तुम्ही फडणवीसांच्या घोषणेवर समाधानी आहात ?

मी सर्वप्रथम उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मनापासून आभार मानतो. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भात आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिला. आताही त्यांनी संस्थेतील गैरकारभार आणि अनियमिततांची चौकशी करण्याची घोषणा केली आहे. चौकशीची घोषणा झाली असली तरी लवकरात लवकर ही चौकशी करून झालेल्या चौकशीची माहिती लोकांना मिळेल अशा स्वरूपात ती सार्वजनिक करावी, अशी आमची मागणी आहे. सरकारनेदेखील या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन संस्थेचे होणारे नुकसान वाचवावे ही विनंती..