धम्मबांधवांच्या सेवेसाठी, धम्मजागृतीसाठी...‘भिक्खू संघाज युनायटेड बुद्धिस्ट मिशन’

    09-Aug-2023   
Total Views |
Article On Bhikkhu Sangha's United Buddhist Mission

‘भिक्खू संघाज युनायटेड बुद्धिस्ट मिशन’ सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्र भवन इमारतीचे सुशोभीकरण, नूतनीकरण आणि सौंदर्यीकरण कामकाजाचा शुभारंभ रविवार, दि. ६ ऑगस्ट रोजी राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आणि भदंत डॉ. राहुल बोधी यांच्यासह भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व विशद करणारा हा लेख...
 
"आज भदंत डॉ. राहुल बोधींनी आणि आपण सर्वांनी या वास्तूसंदर्भात जे स्वप्न पाहिले, त्यापेक्षाही भव्यदिव्य स्वरूपात ही वास्तू उभी राहणारच! या वास्तूमध्ये जानेवारी महिन्यापर्यंत समाजातील युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र आणि ‘एमपीएसी’‘युपीएसी’ अभ्यासकेंद्र उभे राहीलच. अडचणी कोणत्याही असोत, त्यातून मार्ग निघेलच. कारण, आपल्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे. तथागत गौतम बुद्धांचा आशीर्वाद आहे,” असे राज्याचे कौशल्य विकासमंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हणताच, उपस्थितांनी टाळ्यांचा जोरदार गजर केला. स्थळ होते सर्वोदय बुद्ध विहार, चेंबूर आणि समारंभ होता ‘भिक्खू संघाज युनायटेड बुद्धिस्ट मिशन’च्या इमारतीच्या सुशोभीकरण नूतनीकरण आणि सौंदर्यीकरण कामकाजाच्या कार्यारंभाचा. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनाने मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जिल्हा नियोजन समिती, मुंबई उपनगर याद्वारे सदर कामास एक कोटींचे आर्थिक साहाय्य मिळत आहे, असेही सांगितले.

 त्यानुसार या इमारतीच्या नूतनीकरण आणि सुशोभीकरणाच्या शुभारंभ कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासोबत भदंत डॉ. राहुल बोधीजी महाथेरो तसेच मान्यवर भिक्खू संघ, प्रसाद खैरनार (साहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई), शरद कांबळे, अनुराधा रोकडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच, श्रोत्यांमध्ये मुंबई शहरातील धम्मबांधव, सामाजिक कार्यकर्तेही आवर्जून उपस्थित होते. अनुराधा रोकडे या संस्थेच्या कोषाध्यक्ष आहेत. कार्यक्रमाच्या वेळी अत्यंत भावनाशील होत, त्यांनी या वास्तूच्या निर्मितीचा अणि त्यायोगे इथे राहणार्‍या भिक्खू संघाच्या दैनंदिन जीवनासंबंधीचा विषयही मांडला. धम्माचा प्रचार-प्रसार करणार्‍या या पवित्र वास्तूच्या निर्मितीसाठी आणिा विकासासाठी किती अडथळे आले, याचा आलेखच त्यांनी मांडला. अनुराधा यांनी सांगितलेले अनुभव खरेच मनात विषाद उत्पन्न करणारे होते. अनुराधासारख्या धम्मभगिनी समाजात अग्रेसर आहेत, म्हणून समाजात आजही सद्गुण निर्भयता आणि निष्ठा जागृत आहे, हेच खरे. मात्र, त्याचवेळी ‘भिक्खू संघा’च्या धम्मकार्यात अडथळे आणणारेही काही नतद्रष्ट मंडळी आहेत, हे ऐकून वाईट वाटले. मात्र, या कार्यक्रमात भदंत राहुल बोधी यांनी वास्तूच्या नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी सहकार्य केलेल्या सगळ्यांचे आभार मानले. इतकेच काय तर धम्मकार्यात अडथळे आणणार्‍यांसाठीही त्यांनी आणि भिक्खू संघाने मंगलकामनाच केली.

असो. ‘पाली-बौद्ध साहित्यातील बौद्ध धम्माचे संरक्षक’ या विषयावर ‘पीएच.डी’ केलेल्या डॉ. राहुल बोधींच्या जीवनकार्याचा आढावा घेतला तर जाणवते की, श्रीलंकेमध्ये दहा वर्षे बौद्ध धम्माचा आणि ‘भिक्खू संघा’च्या जीवनांचा अभ्यास करून अनुभूती घेऊन ते भारतात आले. भारतात आले तेच मुळी धम्मबांधवांच्या सेवेसाठी, त्यांच्या धम्मजागृतीसाठी! जिथे आज सर्वोदय बुद्ध विहार आहे, तिथे तीन दशकांपूर्वी दलदल होती. अशा ठिकाणी भदंत राहू लागले. समाजाचे धम्माच्या माध्यमातून त्यांनी एकत्रिकरण केले. संविधान आणि कायदा- सुव्यवस्थेच्या माध्यमातून तिथे समाजासाठी काय करता येईल, याचा अभ्यास केला. अर्थात, सद्कार्य कधीही एकटे पडत नाही. त्या न्यायाने भदंत यांच्याशी सज्जन समाज आपसूकच जोडला गेला. मग भदंत डॉ. राहुल बोधी यांनी ‘भिक्खू संघाज युनायटेड बुद्धिस्ट मिशन’च्या माध्यमातून १९८८ साली गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले.

तसेच, मुकबधिर विद्यार्थ्यांसाठीही वसतिगृह सुरू केले. विपश्यना, ध्यानधारणा शिबिराचे आयोजन ते करू लागले. इतकेच काय, भिक्खू आणि श्रामणेरांंचे प्रशिक्षणही सुरू केले, महिलांसाठी धम्मशिक्षा देणारे सायंकालीन धम्मवर्ग सुरू केले, तर प्रत्येक रविवारी धम्मप्रेरणा विकसित करणारे वर्गही सुरू केले. समाजात एकता वाढीस लागावी, समाजाची मंगलमय प्रगती व्हावी, यासाठी डॉ. राहुल बोधी अक्षरशः २४ तास कार्य करू लागले. समाजाचे एकत्रिकरण व्हावे, मनोमिलन व्हावे आणि त्यातून एकसंघ समाज आणि देश घडावा, यासाठी डॉ. राहुल बोधी नवनवे उपक्रम आयोजित करू लागले. त्यांचा नि:स्वार्थीपणा आणि जागृत धम्मजाणीव यामुळे समाजही त्यांच्या शब्दाला प्रमाण मानू लागला होताच. पुढे ‘महापरित्राणा’, ‘अष्टशील ग्रहण’, ‘महासती पठानसुत्तोे’, ‘महासती पठानसुत्तो अद्भुत विज्ञान’, ‘धम्मपद’, ‘संगीतसुत्त’, ‘अर्हत सारिपुत्र का जीवन चरित्र’, ‘शांती आणि आनंदासाठी बुद्धांची महान शिकवण’ आणि ‘संडे धम्म ट्रेनिंग स्कूल’ असे विविध विषय घेऊन डॉ. राहुल बोधी आधुनिक तंत्रज्ञान जोपासणार्‍या युवा समाजातही धम्म जागृत करू लागले.

डॉ. राहुल बोधी यांच्या आणि त्यांच्या संस्थेच्याही कार्याचा मागोवा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, त्यांनी समाजाला दिलेली प्रेरणा आणि विचार हे धम्माच्या मूळ शिकवणीनुसार कुटुंब समाज आणि देश काय, अगदी विश्व कल्याणासाठीचेच आहेत. भदंत राहुल आणि त्यांच्या संघटनेने हे धम्मकार्य करू नये, यासाठीही प्रचंड अडथळे आणणारे काही लोक होते म्हणे. मात्र, या सगळ्या परिक्षेपात या कार्यक्रमामध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे मौलिक विचार समाजाला खूप प्रेरणा देऊन गेले. ते म्हणाले, ’‘डॉ. बाबासाहेबांनी जे आपल्याला दिले ते शब्दात सांगू शकत नाही. आपला समाज नम्र आहे. मात्र, जिथे समाज संघटित आहे, जिथे कुणी समाजावर अत्याचार करत असेल, तर समाज एका मिनिटामध्ये संघर्षातून अन्यायावर विजय मिळवतो. इथे अशी काही समस्या असेल, तर समाजासोबत आम्ही आहोत.”

गेल्याच महिन्यात माता रमाबाई आंबेडकर नगर येथे भव्य भिक्खू निवासाच्या पुनर्बांधणीसाठीही मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांतून सहकार्य मिळाले होते. आताही चेंबूर येथील या धम्म वास्तूसाठी त्यांनी पुढकार घेतला आहे. या सगळ्यांचे श्रेय मंगलप्रभात लोढा रा. स्व. संघाला देतात. मुख्यमंत्री आणि त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याला ते श्रेय देतात. तसेच, रा. स्व. संघाचे कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे चेंबूरच्या या विहार वास्तूचे नूतनीकरण व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते, असेही ते म्हणाले. मंत्री मंगलप्रभात लोढा असोत की, रा. स्व. संघाचे विठ्ठल कांबळे किंवा संजय नगरकर असोत, धम्मासाठी, ‘भिक्खू संघा’साठी आणि समाजासाठीची त्यांची तळमळ आणि संवेदनशीलता शब्दातीत आहे. धम्माची जाणीव आणि तळमळ असणार्‍यांसाठी धम्मानुसार आशीर्वचन आहे. ते धम्मासाठी, ‘भिक्खू संघा’साठी विचारकार्य करणार्‍या या सर्वांसाठीच आहे

‘ये केचि बुद्धं सरणं गतासे,
न ते गमिस्सन्ति अपायभूमिं।
पहाय मानुस देहं
देवकार्य परिपूरेस्सन्ति।’
जो गुरू बुद्धाचा आश्रय घेतो, कधीही दुःखात पडत नाही, तो मानवी शरीराच्या नाशानंतर देवकयाला प्राप्त होतो. तसेच, तथागतांच्या धम्माची सेवा करणार्‍या ‘भिक्खू संघा’ची काळजी घेणारे आणि धम्मासाठी प्रयत्नशील असणार्‍या या सर्वांचे सद्कार्य मंगलमयच होईल. या सगळ्यातून वाटते की, धम्म म्हणा, धर्म म्हणा, समाजातली सज्जन शक्ती एकत्र येत आहे. समाज आणि देशाचे खरेच ‘अच्छे दिन’ आले आहेत.


भवतु सब्ब मंगलम्...

गेले ४५ वर्षे या परिसरात धम्मज्ञान जागृतीसाठी आम्ही कार्यशील आहोत. मंगलप्रभात लोढा प्रचंड काम करतात. काही महिन्यांपूर्वी ते इथे आले होते. विहार आणि त्यासंदर्भात माहिती घेतली होती आणि आपण स्वप्न पाहिलेल्या पवित्र वास्तूच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमासाठी आज ते प्रत्यक्ष उपस्थित आहेत. ‘भिक्खू संघाज युनायटेड बुद्धिस्ट मिशन’ सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्रातून आणखीन मोठ्या प्रमाणात सगळ्यांच्या कल्याणाची कामना आणि त्यासाठीचे धम्मज्ञान आणि सेवाकार्य केले जाईल.
- डॉ. भदंत राहुल बोधी

देश विश्वगुरू बनण्याचे स्वप्न सगळ्यांच्या कष्टातून सत्यात उतरतेय

मी रा. स्व. संघाचा स्वयंसेवक आहे. देशहित सर्वतोपरी आहे. मला माहिती आहे की, ‘भिक्खू संघाज युनायटेड बुद्धिस्ट मिशन’च्या माध्यमातून धर्म आणि समाजासाठी अनेक कल्याणकारी सेवाभावी उपक्रम राबविले जातात. हे सगळे सेवाभावी पवित्र कार्य समाजाला एकत्र आणते. बाहेरच्या शत्रूशी लढणे सोपे असते. मात्र, त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकी हवी. आपला देश विश्वगुरू बनावा, हे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदींचे स्वप्न आहे. देश विश्वगुरू बनण्याचे हे स्वप्न तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्यांच्या कष्टातून आणि त्यागातूनच सत्यात उतरत आहे.
- आ. मंगलप्रभात लोढा,
कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र
 
संघ-भाजपच्या माध्यमातून धम्मसेवेमध्ये खारीचा वाटा

धम्माची शिकवण समाज आणि देशाला तारत आहे. शांतीपूर्ण कल्याणाचा मार्ग सांगणार्‍या तथागतांच्या विचारांचा प्रसार करणार्‍या ‘भिक्खू संघाज युनायटेड बुद्धिस्ट मिशन’ आणि भदंत डॉ. राहुल बोधी यांचे कार्य शब्दातीत आहे. रा. स्व. संघ आणि भाजप यांच्या माध्यमातून का होईना, माझ्यासारख्या सामान्य धम्मबांधवाला धम्मकार्यामध्ये सेवेमध्ये खारीचा वाटा उचलायला मिळाला. तसेच, भदंत राहुल बोधी यांचे आशीवर्चन लाभावे, हे माझे भाग्यच!
-शरद कांबळे, सदस्य,
जिल्हा नियोजन समिती उपनगरे

धम्मभगिनींकडून लोढा यांचे खूप खूप धन्यवाद

मालाड-मालवणीमध्ये गेले अनेक वर्षे मंगलप्रभात लोढा आम्हा धम्मबांधवांच्या सुरक्षा आणि स्थैर्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. माता रमाबाई नगर येथील भिक्खू निवास आणि आता चेंबूरमधील बौद्ध विहाराचे काम लोढा यांच्या पुढाकाराने होत आहे. जातपात न पाहता, काम करणार्‍या लोढांना त्यांच्या धम्मभगिनींकडून खूप खूप धन्यवाद. तसेच, भदंत राहुल बोधी यांनी धम्मासाठी समाजासाठी केलेले काम आम्हाला कायमच प्रेरणादायी आहे.
- शुभांगी जाधव,
क्रांतिसंघर्ष महिला मंडळ

९५९४९६९६३८

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.