लोकसभेत शेवटच्या चेंडूवर षटकार मारू : पंतप्रधान नरेंद्र मोदी

भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत मार्गदर्शन

    08-Aug-2023
Total Views |
PM Narendra Modi On No Confidence Motion

नवी दिल्ली
: विरोधी पक्षांनी आणलेला अविश्वास ठराव हा सरकारविरोधात नसून त्यांच्यातीलच अविश्वासाचे निदर्शक आहे. त्यामुळे लोकसभेत शेवटच्या चेंडूवर षटकार मारू, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत केले आहे.

भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांच्या अविश्वास ठरावाविषयी भाजप सदस्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, विरोधी आघाडी 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स' स्वतःच अविश्वासाने भरलेली आहे आणि आपल्या घटक पक्षांच्या विश्वासाची चाचणी घेण्यासाठी त्यांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. ही आघाडी अहंकाराने भरलेली असून अविश्वास ठरावाद्वारे आपला राजकीय अजेंडा पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे अविश्वास ठरावाच्या चर्चेत शेवटच्या चेंडूवर षटकार मारू, असा विश्वास त्यांनी खासदारांना दिला.

विरोधी पक्षांवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की त्यांचे नेते सामाजिक न्यायाची चर्चा करतात पण घराणेशाही, तुष्टीकरण आणि भ्रष्ट राजकारणातून त्यांनी सर्वात जास्त नुकसान केले आहे. भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाचे राजकारण संपवण्याची हीच वेळ असल्याचे ते म्हणाले.