विचारधारेला लागलेली घरघर

    07-Aug-2023   
Total Views |
Murder case against AAP leader Javed Ahmed In Nuh Violence

स्वतःला जगातील सर्वात स्वच्छ आणि सामान्य पक्ष म्हणवून घेणार्‍या आम आदमी पक्षाला आता घरघर लागली आहे. ही घरघर आकडेवारीची नव्हे, तर विचारधारेला लागलेली घरघर आहे. हरियाणातील नूहमध्ये दंगल भडकावल्याप्रकरणी आप नेता जावेद अहमद याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याआधी दिल्लीमध्ये दंगल झाली, तेव्हादेखील आप नेता ताहीर हुसेनवर दंगल भडकावल्याचा आरोप होता. त्यावेळी त्याने थेट पोलिसांनाही आव्हान दिले होते. याप्रकरणी आम आदमी पक्षाने सरळसरळ ताहीर हुसेनचे समर्थन करत, तो दोषी नसल्याचे सांगितले होते. त्याचीच पुनरावृत्ती आता हरियाणात झाली. नूह दंगलीतील आरोपी जावेद अहमद याचेही आम आदमी पक्षाकडून समर्थन केले जात आहे. हरियाणातील नूह आणि गुरुग्राम भागात झालेल्या हिंसाचारात बजरंग दलाचे नेते प्रदीप कुमार यांचा मृत्यू झाला होता. सोहना येथील प्रदीप यांच्या हत्येप्रकरणी आप नेता जावेद याच्यावर ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी फरिदाबादच्या प्रसिद्ध निकिता तोमर हत्याकांडात जावेदचा भाचा तौसिफ दोषी असल्याचेही समोर येत आहे. त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, नूह दंगलीत जावेदचे नाव पुढे येताच त्याच्या बचावासाठी आपने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. जावेद हा आपच्या अल्पसंख्याक आघाडीचा अध्यक्ष असल्याची माहिती आहे. यानिमित्ताने आपचा दंगलखोरांना समर्थन करण्याचा आणि हिंदूद्वेषी चेहरा पुन्हा एकदा समोर आला. आपचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनुराग धांडा यांनी जावेद विरोधात दाखल केलेल्या ‘एफआयआर’बाबत स्पष्टीकरण देताना भाजपवरच टीका केली. हा ’एफआयआर’ खोटा असल्याचे सांगत विनाकारण आप नेत्यांना यामध्ये गोवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. नूह दंगलीप्रकरणी आतापर्यंत एकूण २१६ जणांना अटक करण्यात आली असून, १०४ ‘एफआयआर’ नोंदवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, याआधी दिल्ली दंगलीच्या वेळी सर्व व्हिडिओ पुरावे मिळाल्यानंतरही मुख्य सूत्रधार ताहीर हुसेनला आपने शेवटपर्यंत वाचवले होते. त्याचीच पुनरावृत्ती आता होताना पाहायला मिळत आहे. सामान्य माणसांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेला आम आदमी पक्ष शिशमहल व्हाया दंगलखोरांच्या समर्थनाकडे चालला आहे. यालाच म्हणतात विचारधारेला लागलेली घरघर!

बघ्याची भूमिका सोडा!

राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर, त्यांची खासदारकी पुन्हा त्यांना बहाल करण्यात आली. कार्यकर्ते एकमेकांना मिठाई भरवत तोंड गोड करत ‘राहुल झिंदाबाद’च्या घोषणा देऊ लागले आहेत. परंतु, आधी ‘बजरंग दला’वर बंदी घालण्याची घोषणा करून याच काँग्रेसने कर्नाटकमध्ये हिंदूविरोधी राजकारणाचा कित्ता गिरवला. राजस्थानमध्ये तर अतिक्रमणाच्या नावाखाली सर्रास हिंदू मंदिरे जमीनदोस्त करण्यात आली. ‘द केरला स्टोरी’मुळे धर्मांतराचा प्रपोगंडा सर्वांसमोर आला. त्यावरही ममतांसहित काँग्रेसने आक्रोश करत चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आणि आता छत्तीसगढमध्ये धर्मांतरणाचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यावर छत्तीसगढचे काँग्रेस सरकार चिडीचूप आहे. छत्तीसगढमधील बलराम जिल्ह्यात ख्रिश्चन धर्मांतराच्या प्रकाराने खळबळ उडाली. कररी चालगली गावातील चौघई येथे काही बाहेरील धर्मप्रचारकांकडून गावातील लोकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु, काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा धर्मांतरणाचा प्रकार उधळून लावला गेला. सोमारू नावाच्या व्यक्तीच्या घरात, हा प्रकार चालू होता. यावेळी घटनास्थळी बायबलदेखील सापडले. यानंतर याला ‘प्रार्थना सभे’चे नाव देण्यात आले खरे. परंतु, याठिकाणी भलताच खेळ सुरू होता. गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या संदर्भात लोकांचे येणे-जाणे सुरू होते. काँग्रेसचे बघेल सरकार आल्यापासून धर्मांतरणावर फक्त बघ्याचीच भूमिका, हे सरकार घेत आले आहे. ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या मोहापायी येथील निरपराध ग्रामस्थांचे धर्मांतर केले जाते. धर्मांतरणाचे प्रकार उघडकीस आणल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून दबाव आणला जातो. त्यामुळे विरोधकांची मोट बांधणारी काँग्रेस छत्तीसगढमधील धर्मांतरणाचे प्रकार थांबविण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. छत्तीसगढमध्ये वनवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अशिक्षितपणा, गरिबीचा फायदा उचलून या वनवासींचे धर्मांतर केले जाते. त्यामुळे येथील काँग्रेस सरकारने बघ्याची भूमिका सोडून कारवाई करावी, अन्यथा आगामी निवडणुकीत जनता काँग्रेसला बघून घेण्यात कुठलीही कसर सोडणार नाही, हे मात्र नक्की.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.