मुंबईकरांची बेस्ट बससेवा लवकरच पूर्ववत होणार : मंत्री मंगलप्रभात लोढा
07-Aug-2023
Total Views |
मुंबई : मागील दोन दिवसांपासून बेस्टमधील कंत्राटी कर्मचारी आंदोलनावर गेल्यामुळे विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था, येत्या २४ ते ४८ तासात पूर्ववत करणार असल्याचे मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. ते मंत्रालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, बेस्टच्या आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारद्वारे बेस्टच्या ताफ्यात ३०५२ बसेस पैकी २६५१ बसेस नागरिकांच्या सेवेत कार्यरत करण्यात आल्याचे लोढांनी यावेळी सांगितले. . बेस्टच्या ताफ्यात एकूण ३०५२ बसेस आहेत. त्यापैकी १३८१ बसेस ह्या बेस्ट च्या मालकीच्या असून, १६७१ बसेस भाडे तत्वावर आहेत.
दरम्यान, मंत्रालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी परिवहनचे प्रधान सचिव पराग जैन, बीईएसटीचे आयुक्त विजय सिंघल उपस्थित होते. कंत्राटी कामगारांच्या मागण्या लक्षात घेऊन त्यासंदर्भात कायदेशीर पूर्तता व्हावी असे सरकारतर्फे बसेसच्या मालकांना सांगण्यात आले असून कामगारांच्या मागण्या सोडवण्याबाबत सरकार उदासीन नसून याबाबत पुन्हा एक बैठक घेऊ, असे देखील मंत्री लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, नागरिकांना कोणताही त्रास नको आणि त्याचबरोबर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा न्याय मिळावा असे सरकारचे धोरण असून, त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहोत. मुंबईकरांच्या सेवेत लवकरच पूर्ण क्षमतेने बेस्टची सेवा रुजू होईल, असे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले.