आयुष्यात ‘युटर्न’ असतोच!

    07-Aug-2023   
Total Views |
Aticle On Marathi Serials And Film Writer Parag Kulkarni

अनेक मालिका आणि चित्रपटांसाठी लेखन केलेले, बोरिवलीचे पराग कुलकर्णी. एक अवलिया कलावंत. मात्र, तितकेच समाजशील आणि श्रीस्वामी समर्थांचे भक्त. त्यांच्या जीवनाचा घेतलेला मागोवा...

'लेक माझी लाडकी’, ‘दुहेरी’, ‘विठू माऊली’, ‘ज्योतीबाच्या नावाने चांगभलं’, ’योग योगेश्वर जय शंकर’, काही दिवसांत प्रसारित होणारी ‘सिंधुताई माझी माई’ या मालिका आणि ‘डोंबिवली फास्ट’, ‘मुंबई- -पुणे-मुंबई‘, ‘गैर बाबांची शाळा’, काही दिवसांत प्रसारित होणारा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाचे लेखन पराग कुलकर्णी यांनी केलेले. मालिका आणि चित्रपटाच्या मायावी दुनियेत राहूनही समाजाशी आणि धर्माशी नाळ जोडून असणारा, या मातीशी पक्के ऋणानुबंध जपणारा अवलिया म्हणजे पराग. मात्र, गेले २४ वर्षं पराग यांनी पादत्राणे घालण्याचे सोडले आहे. श्रीस्वामी समर्थांचा अनुग्रह त्यांना प्राप्त झाला. स्वामी आज्ञेने त्यांनी पादत्राण न घालता जीवन व्यतित करत कला आणि समाजाची सेवा करण्याचे व्रत स्वीकारले. आता यावर अनेकजण श्रद्धा-अंधश्रद्धेचे प्रश्न उपस्थित करतील.पण, आयुष्यात अनेकदा श्रद्धा आणि अतर्क्य गोष्टींचा मेळ मानवाला लागत नाही.

जनार्दन आणि शोभा कुलकर्णी हे मूळचे कोल्हापूरचे. मात्र, कामानिमित्त मुंबईत स्थायिक. त्यांना तीन अपत्य. त्यापैकी एक पराग. जनार्दन बँकेत उच्चपदस्थ अधिकारी. कामानिमित्त नेहमी फिरतीवर असत. शोभा या अत्यंत शिस्तप्रिय, मात्र तितक्याच संवेदनशील. जातपात, विषमता मानू नये, आपण सर्व एकच आहोत, असे मानत घरी येणार्‍या प्रत्येक गरजू व्यक्तीस सढळ हस्ते मदत करणार्‍या शोभा. लहानपणी सगळे ठीकच होते. मात्र, आठवीमध्ये असताना पराग यांना वाईट संगत लागली. बघूया एक सिगारेट ओढून, असे म्हणत सिगरेटचा घेतलेला पहिला झुरका पुढे आयुष्यात १५ वर्षे नरक देऊन गेला. ते सगळ्या प्रकारची व्यसने करू लागले. त्यासाठी घरातून पैसे चोरू लागले. आईला कुणकुण लागली होती. आईने समजावले; पण व्यर्थ. व्यसनेच्या गर्तेतच दहावीला ते कसेबसे उत्तीर्ण झाले.

मुलगा मुंबईतून बाहेर शिकायला गेला की, सुधारेल म्हणून आईने मग पराग यांना त्यांच्या पित्याकडे पुण्याला शिकायला पाठवले. शिक्षणासाठी आणि सुधारणा होण्यासाठी पुणे-मुंबई अशा वार्‍या करूनही पराग यांच्यात सुधारणा झाली नाही. मात्र, या काळात मन रमावं काही तरी करावं, त्याने तरी व्यसन सुटेल, म्हणून ते व्हिडिओ पार्लरमध्ये काम करू लागले. या काळात त्यांनी शेकडो हिंदी चित्रपट पाहिले. काही कामच नव्हते, त्यामुळे चित्रपट बघितल्यानंतर त्यावर त्यांच्या मनात विचार येई की, या चित्रपटाचा शेवट किंवा मध्यांतर, असा असता तर? महाविद्यालयात असताना मात्र आता पराग यांना नाटकांचे वेड लागले, वाचनाचे वेड लागले होते. मात्र, नशा कायम होती. आईबाबा मित्र परोपरीने समजावत होते. पण, पराग यांची नशा सुटत नव्हती. त्यातच नाटकाचे वेड लागले. महाविद्यालयात नाटकांमध्ये काम करताना त्यांची ओळख केदार शिंदे यांच्याशी झाली. पुढे नशेपायी पराग कधी तरी घरी जाऊ लागले. काही दिवस, तर ते केदार शिंदे यांच्याही घरीही राहिले.

मात्र, नशा पाठ सोडत नव्हती. याच काळात कधीतरी निशिकांत कामत यांच्याशी भेट झाली आणि पराग त्यांचे सहकारी म्हणून काम करू लागले. तीन-चार वर्षं ते निशिकांत यांच्या घरीच राहू लागले. पराग नशा करायचे; पण काम उत्तम करायचे. या काळात निशिकांत यांनी पराग यांना एका मालिकेच्या लेखनाचे काम मिळवून दिले. पराग यांच्या आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी हाती लागले होते. पराग यांनी व्यसनात का होईना; पण मालिकेसाठी २६ भाग लिहिले. आयुष्याला वळण मिळेल, असे वाटले. पण, ती मालिका पडद्यावर यायच्या आतच बंद झाली. पराग मग आणखीन नशेच्या आहारी गेले. पराग यांच्या आयुष्यातली १९९७ ते १९९९ ही तीन वर्षे अशीही गेली की, त्या तीन वर्षांत ते कुठे आणि कसे जगले, हे त्यांना आजही आठवत नाही. या सगळ्या काळात आईबाबा मात्र कायम आशावादी असायचे. कधी तरी पराग सुधारेल. वल्लभ जोगळेकर आणि योगेश जोशी यांसारखे मोजके मित्रही समजवायचे. पण, काही उपयोग नव्हता.

मात्र, एक दिवशी जागेपणी त्यांच्या डोळ्यासमोर स्वामी समर्थ आणि सत्य साईबाबांची प्रतिमा आपसूक तरळली. त्य दुसर्‍या दिवशी पराग झोपेतून उठले, तेच मुळी व्यसनाबद्दल प्रचंड तिटकारा घेऊन. हे कसे झाले, का झाले? याचे उत्तर नव्हते. पण, दररोज तंबाखूपासून इतर अमली पदार्थ घेत व्यसन करणारे, पराग व्यसनमुक्त झाले. याच काळात त्यांच्या हाती स्वा. सावरकरांचे ‘माझी जन्मठेप’ पुस्तक आणले. आयुष्यात काही तरी करावे, अशी प्रेरणा निर्माण झाली. अनेक सामाजिक कार्यात ते पुढाकार घेऊ लागले. गरीब-गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य असू देत की, व्यसनाधीन मुलांचे समुपदेशन असू दे, पराग नेहमीच सहकार्य करू लागले. पराग यांचा विवाह पुढे प्राजक्ता यांच्याशी झाला. सहचारिणीही चांगलीच लाभली.

सहा वर्षांपूर्वी ‘जॉईन आरएसएस’ या मोहिमेअंतर्गत पराग रा. स्व. संघाशी जोडले गेले. पुढील सारे आयुष्य सेवाकार्यासाठी देण्याचा त्यांचा निर्णय आहे. त्यातही व्यसनमुक्ती क्षेत्रात त्यांना काम करायचे आहे. व्यसनाधीनतेकडून पुन्हा अपघाताने किंवा केवळ दैवी कृपा आणि आत्मशक्तीने सुरळीत आयुष्या परतणारे पराग म्हणतात की, ”आयुष्यात ‘युटर्न’ असतो. तो आपल्या मनाने आपणच घ्यायचा असतो. आयुष्यात कधीच काही संपत नाही. श्रद्धा आणि विश्वास माणसाला जगण्याचे बळ देते. नव्याने जगायला शिकले पाहिजे.” व्यसनातून बाहेर येऊन पुन्हा नव्याने आयुष्य जगणार्‍यांसाठी पराग कुलकर्णी यांचे आयुष्य एक आदर्श आहे.
९५९४९६९६३८


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.