रुग्णाचे विश्लेषण आणि समन्वय

    07-Aug-2023
Total Views |
Article On Homeopathy And Homeopathic Treatment

जेव्हा आजारीपणाच्या स्थितीचे मूळ कारण आपण शोधण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळी असेही लक्षात येते की, प्रत्येक रुग्णाची जी सद्य मानसिक स्थिती असते, तिचे मूळ भूतकाळातच असते, असे नाही. कित्येक रुग्णांमध्ये सद्यःपरिस्थितीच्या आणि भूतकाळाचा कुठलाही संबंध दिसून येत नाही. याउलट असे लक्षात यायला लागले की, लहान मुले व नुकतीच जन्मलेली बाळे यांच्यातसुद्धा ही मानसिक स्थिती असते. त्यामुळे ही स्थिती कशी उत्पन्न होते, त्याचाही शोध घेणे क्रमप्राप्त आहे. याचा अभ्यास करताना असे लक्षात येते की, लहान मुलांची स्थिती ही बर्‍याच वेळा आईच्या गरोदरपणातील स्थितीसारखी असते. बर्‍याच लहान मुलांमध्ये त्यांचे गुण वागण्याची पद्धत तसेच ’State of Disposition’ हे आई किंवा वडील यांच्यापैकी एकासारखे असते.

यावरून असे कळते की, ही ’State’ किंवा ’Root cause’ हा आई-वडिलांकडून मुलांकडे येत असतो. प्रसारित होत असतो. हे नीट समजून घेण्यासाठी एका पेशंटची केस आपण पाहूया. माझ्या क्लिनिकमध्ये एक दोन महिन्यांचे बाळ आले होते. त्याची आई व वडील त्याला त्वचारोगाच्या उपचारासाठी घेऊन आले होते. त्या बाळाला चेहर्‍यावर पूर्ण असे काळे व छोटे छोटे डाग होते व पुरळ होते, जे जन्मत:च होते. सतत ते बाळ चेहरा खाजवत राहायचे व सतत ते बाळ चिडचिड करत व रडत राहायचे. त्याचा चेहरा सतत लाल असायचा.

बाळाला तपासल्यानंतर मी त्या बाळाच्या आईला काही प्रश्न विचारले व तिच्या गरोदरपणातील तिच्या स्थितीबद्दल माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी मला असे कळले की, ती बाई त्या मुलाची खरी आई नव्हती व ते बाळ दत्तक घेतलेले होते. आता पंचाईत अशी झाली की, त्या बाळाची खरी आई कोण, हे मला माहीत नव्हते. परंतु, सुदैवाने त्या बाईला हे ठाऊक होते की, बाळाची खरी आई कोण आहे आणि त्या बाईने सांगितले की, त्या बाळाच्या आईला पाच मुले होती व हे सहावे मूल होते. घरच्या अतिशय गरिबीच्या परिस्थितीमुळे त्या बाईने आपले सहावे मूल अनाथालयामध्ये ठेवले. त्या बाईच्या मानसिक स्थितीबद्दल अनाथालयातील एका कर्मचार्‍याने सांगितले की, ती बाई खूप रडत होती.

देवाला व नशिबाला सारखी दोष देत होती व देवानेच आपल्याला शिक्षा केली, असे म्हणत होती. या तिच्या मानसिकतेबद्दल मला माहिती कळल्यावर मी होमियोपॅथीच्या पुस्तकांमध्ये ही ’State’ शोधली व त्या स्थितीच्या अनुसार जे औषध निघाले, तेच औषध त्या दोन महिन्यांच्या बाळाला दिले व जणू चमत्कार व्हावा तसे त्याच्या चेहर्‍यावरचे काळे डाग व पुरळ नाहीसे झाले. त्यावेळी मला लक्षात आले की, हे मूळ किंवा आजाराचे मूळ हे आईकडून मुलाकडे येऊ शकते. गरोदरपणात किंवा त्याच्या अगोदरपासून जी ’State of Disposition’ आईच्या मनात असते, तिचा थेट परिणाम हा गर्भावर होत असतो व त्याप्रमाणेच गर्भाची वाढ व नंतर मानसिक स्थिती बनत असते. पुढील भागात या स्थितीबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. (क्रमश:)

डॉ. मंदार पाटकर 
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
९८६९०६२२७६