वास्तविकता लपविण्याचे हिंदूविरोधी षड्यंत्र!

    06-Aug-2023
Total Views |
Catholic Father Bolmax Perera comment on Chhatrapati Shivaji Maharaj

दक्षिण गोव्यातील सेंट फ्रान्सिस झेव्हियर्स चर्चचे फादर बोलमेक्स परेरा यांनी नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह टीप्पणी करत आधी अकलेचे तारे तोडले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच फादरने माफी मागून सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला. यानिमित्ताने वास्तविकता लपविण्याचे हिंदूविरोधी षड्यंत्र लक्षात घ्यायला हवे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी ‘कॅथलिक प्रिस्ट’विरोधात गोव्यात गुन्हा दाखल झाल्याची बातमी आणि सदर घटनेचे वास्तव लपवणारे विश्लेषण ‘लोकसत्ता’ने दि. ५ ऑगस्ट रोजी केले. यामधील बातमी वजा विश्लेषणानुसार, एका कथित व्हिडिओ क्लिपनुसार, फादर बोलमेक्स परेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तसेच त्यांच्यामध्ये देव पाहणार्‍या शिवप्रेमींना उद्देशून असे म्हटले आहे की, ‘त्यांच्या मतानुसार शिवाजी महाराज, हे राष्ट्रीय नायक आहेत, आपण त्यांचा योग्य आदर आणि सन्मान केलाच पाहिजे. मात्र, ते देव किंवा दैवत नाहीत. यासाठी हिंदू बांधवांशी संवाद साधला पाहिजे आणि शिवाजी तुमचा देव आहे की, राष्ट्रीय नायकाच्या रुपात तुम्ही त्याला पाहता? हे विचारलं पाहिजे. जर राष्ट्रपुरुष म्हणून तुम्ही शिवरायांकडे पाहत असाल, तर त्याला दैवत कसं काय म्हणणार?‘ या आशयाचं वक्तव्य त्यांनी केल्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आणि त्यांनी ख्रिश्चन धर्मगुरू फादर बोलमेक्स परेरांविरोधात गोव्यात शुक्रवारी रात्री वास्को पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सदर फादर बोलमेक्स परेरा हे दक्षिण गोव्यातली सेंट फ्रान्सिस झेव्हियर्स चर्चचे फादर आहेत. सदर घटनेचे वर्णन करताना बातमीत म्हटले आहे की, शिवप्रेमींनी याबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर फादर बोलमेक्स परेरा यांनी खेद व्यक्त करत “माझ्या प्रवचनातला काही भाग निवडकपणे समोर आणला गेला आहे. मी असंही म्हटलं होतं की, राष्ट्रपुरुषांमध्ये छत्रपती शिवरायांची गणना होते. तसेच, शिवाजी महाराजांचं कार्य, जात, धर्म, पंथ, भाषा यांच्यापलीकडचं आहे. विदेशातील लोकांनाही, ते आदरणीय आहेत,” असे फादर परेरा यांनी आपल्या निवेदनात म्हटल्याचे सांगण्यात आलेले आहे.

सदर बातमीवजा विश्लेषण वाचून घडलेली घटना, ही फारशी गंभीर नसल्याचा समज होतो. परंतु, सदर घटनेचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर तिचे गांभीर्य लक्षात येते! सदर घटनेचे मुद्देसूद विश्लेषण पुढीलप्रमाणे करता येईल.

१) मुळात फादर परेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कुठल्याही प्रकारची टिप्पणी करण्याची आवश्यकताच काय होती? बरे टिप्पणी केलीच, तर त्यातून तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलायचेही आहे आणि ते वादग्रस्त होणार नाही, असाही तुमचा समज आहे, तर तुमचा हिंदू समाजाला गृहीत धरून आपल्या सोयीप्रमाणे तुम्हाला अपेक्षित, असा शिवचरित्राचा अर्थ समाजात पसरवण्याचा दृष्ट हेतू सहज स्पष्ट होतो.

२) छत्रपती शिवाजी महाराजांना शिवप्रेमींनी कुठल्या दृष्टीने पाहावे, हे सांगण्याचा अधिकार फादर परेरा यांना कोणी दिला? दगडाला शेंदूर फासून त्या माध्यामातून ईश्वराचे अस्तित्व शोधणारा नव्हे, त्याचा साक्षात्कार करून घेणार्‍या प्राचीन परंपरेचा वाहक आजचा हिंदू समाज आहे. त्यामुळे हिंदू समाजावर अनन्यसाधारण उपकार केलेल्या लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी दैवी अवतार मानत असेल, तर हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. तो हिंदूंच्या धार्मिक आस्थेचा विषय आहे. फादर परेरा यांनी त्यात लुडबुड करण्याचे कारण काय?

३) छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपुरूष होते, त्यांच्याविषयी तुम्हाला आदर वाटतो, हा साक्षात्कार होण्याकरिता तुमच्या वयाची इतकी वर्षं का लोटावी लागली? आणि जर साक्षात्कार आधीच झाला होता, तर आजतागायत तुमच्या किंवा तुमच्या चर्चच्या माध्यमातून, या राष्ट्रपुरुषाचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार का नाही घेतला गेला?

४) तसेच, त्यांचे ’शिवाजी महाराजांचं कार्य हे धर्म, पंथ, भाषा यांच्यापलीकडचं आहे!’ असे म्हणणे, जाणीपूर्वक खरा इतिहास लपवून आपल्या हेतूंच्या पूर्ततेसाठी चुकीचा इतिहास समाजात रुजविण्याचे षड्यंत्र असल्याचे सहजपणे दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे हिंदवी स्वराज्य होते. स्वराज्य म्हणजेच हिंदूंचे राज्य! त्याच्याच रक्षणासाठी, संवर्धनासाठी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. उर्दू-फारसी शब्दांच्या मिश्रणामुळे अशुद्ध झालेली आपली भाषा पुन्हा शुद्ध करण्यासाठी महाराजांनी ‘राजव्यव्हार कोशा’ची निर्मिती करून घेतली. यावरून महाराजांचे आपल्या भाषेवरील प्रेम दिसून येते. महाराजांची राजमद्रा त्यांनी हेतुपुरस्सर संस्कृतमध्ये तयार करून घेतली. अशा असंख्य गोष्टींमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा आणि कार्याचा हेतू सहजच स्पष्ट होतो. मर्यादा पुुषोत्तम प्रभू श्रीरामासमान आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आपल्या डोळ्यासमोर येते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी हिंदू समाज किती संवेदनशील आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तेव्हा फादर परेरा यांनी नको ती वक्तव्यं करून आपले सुप्त मनसुबे पूर्ण करण्याची दिवा स्वप्ने बघू नयेत. असा स्पष्ट संकेत त्यांच्याविरुद्ध दखल केलेल्या तक्रारीवरून दिसून येतो. हिंदू समाज आज बर्‍यापैकी जागरूक झाला आहे. त्याला गृहित धरून त्याच्या श्रद्धेवर, आस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून फार काही हाती लागणार नाही, ही गोष्ट फादर परेरांना आता कळून चुकली असावी.

खरेतर गोव्याच्या भूमीत आजही शिवप्रेमींना, हिंदुत्ववादी संघटनांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजामध्ये रुजवण्याकरिता संकटांचा सामना करावा लागतो आहे. इतकेच नव्हे, तर परधर्मीयांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांना, पुतळ्यांना विरोध होत असल्याच्या घटना गेल्या काही वर्षांमध्ये वाढीस लागल्याचे त्याठिकाणी एकंदरित चित्र आहे. आज गोव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पुतळे दिसत आहेत, ते गोव्यातील शिवप्रेमींनी अनंत अडचणींचा सामना करून उभारले आहेत. इतकेच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराज, हे बाहेरचे आहेत, त्यांचा गोव्याशी काही संबंध नाही, अशा प्रकारचं एक मिथक समाजामध्ये प्रसृत करण्याचं काम गोव्यामध्ये काही मंडळींकडून होत आहे. फादर परेरा यांच्या वक्तव्याकडे अशाच प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाहिले पाहिजे.

एक गोष्ट मात्र येथे लक्षात घ्यायला हवी की, फादर परेरा किंवा अन्य जे कोणी असं म्हणत आहेत की, ‘शिवाजी महाराज हे दैवत नव्हते, तर ते राष्ट्रनायक होते आणि हे हिंदूंशी बोलायला हवं,’ यावरून त्यांना महाराजांची जनमानसातील प्रतिमा पुसायची आहे, हे स्पष्ट होते. तसेच, या धर्मगुरूंना गोव्यातील एकंदरित परिस्थिती माहीत असूनसुद्धा त्यांनी नको ते वक्तव्य करून, त्यामुळे होणार्‍या परिणामांचा बाऊ करून हिंदू संघटना हा वाद वाढवून कशाप्रकारे अतिशयोक्ती करत आहेत? हे भासवून समाजमन दूषित करण्याचे कुटिल कारस्थान असण्याचा संशयही निर्माण होतो. त्यामुळे फादर परेरा यांचे वादग्रस्त विधान ही शुल्लक गोष्ट नाही. समाजात संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य आपल्याला महागात पडू नये, सदर प्रकरण आपल्या अंगाशी येऊ नये, म्हणूनच फादर परेरा यांनी आपले विचार किती उदात्त आहेत, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी किती आदर आहे? असे भासवण्यासाठी नंतर सारवासारव करण्यासाठी, हा प्रयत्न केल्याच्या शक्यतेला वाव आहे.

त्यामुळे या असल्या धूर्त धर्मगुरूंच्या अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे हिंदू समाजातून संतप्त प्रतिक्रिया येणे, हे स्वाभाविकच आहे. फक्त समाजाने त्याकडे डोळसपणे पाहण्याची आवश्यकता आहे. तसेच, प्रसार माध्यमांनी एखाद्या घटनेवर व्यक्त होताना, तिचे विश्लेषण करताना सदर घटनेची पार्श्वभूमी जाणून घेऊन जबाबदारपणे वागण्याची आवश्यकता आहे; अन्यथा समाजात संभ्रम निर्माण करणार्‍यांच्या यादीत आपले नाव सारखे सारखे का येते? समाजातून सतत आपल्यावर टीका का होते? याचे चिंतन करण्याची आवश्यकता आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा गोव्याशी काय संबंध आहे, हे इतिहासाच्या प्राथमिक अभ्यासकालादेखील चांगले ठाऊक आहे. त्यामुळे गोव्यातील धर्मांधांनी इतिहासापासून योग्य ती शिकवण जरूर घ्यावी!

अॅड. प्रसाद शिर्के