महाराष्ट्र : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकात आधुनिक सेवा सुविधा मिळणार असल्याचे राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकासाठी या माध्यमातून ३५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा, इलेक्ट्रिक जिने, प्रशस्त फलाट, पार्कींग अशा अनेक दर्जेदार सुविधा पुरविण्यात येणार आहेत. दरम्यान, या कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉनफरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले.
गृहनिर्माणमंत्री सावे म्हणाले, देशातील नागरिकांसाठी रेल्वे सेवा अत्यंत महत्त्वाची असून पुर्वीच्या रेल्वे सुविधा आता कमी पडत असल्याने नव्याने रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच, राज्यातील ४४ रेल्वे स्थानकांबरोबर आपल्या शहरातील रेल्वे स्थानकाचा विकास होतोय, ही आनंदाची बाब आहे, असल्याचे ते यावेळी म्हणाले.
तसेच, या माध्यमातून आधुनिक सेवा सुविधा देण्याबरोबरच राज्य शासन विकासकामासाठी खंबीरपणे सोबत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, औरंगाबाद रेल्वे रेल्वे स्थानक येथे आयोजित कार्यक्रमाला खासदार इम्तियाज जलील, आ. प्रशांत बंब, जेष्ठ नेत्या चित्रा वाघ, संजय केनेकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, रेल्वेच्या नांदेड विभागाचे राजेंद्रकुमार मिना उपस्थित होते.