मुंबई : शरद पवार गटात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील ३ महत्त्वाचे आमदार अजित पवार गटात सहभागी होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
यामुळे शरद पवार गटातील आमदारांपैकी एक ज्येष्ठ आमदार तिसऱ्या विस्तारात मंत्रीपदाची शपथ घेण्याची देखील शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे. दरम्यान राज्य मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार १० ऑगस्ट आणि १७ ऑगस्ट दरम्यान होण्याची शक्यता आहे.
मात्र, याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या काही आमदारांना अजितदादांनी आपल्या गटात सहभागी करून घेण्यास नकार दिल्याचेही समजते आहे. शरद पवार गटातील इतरही काही आमदार अजितदादा गटात सहभागी होण्यासाठी उत्सुक असून त्यांना अद्याप तरी अजित दादांकडून प्रवेशाचा ग्रीन सिग्नल मिळालेला नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.