सुट्टीच्या दिवशीही अजितदादा मंत्रालयात! वाचा नेमकं काय घडलं?
05-Aug-2023
Total Views |
मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन रात्री उशीरा संस्थगित झाले. तरीही त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कामात व्यग्र असल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुट्टीच्या दिवशीही मंत्रालयात हजेरी लावत नागरिकांच्या पत्रांची दखल घेत त्यासंदर्भातील आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना अजित पवारांनी यावेळी दिल्या. त्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात चर्चादेखील झाली.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार हे तत्पर निर्णयांसाठी, त्यांच्याकडील नस्त्यांचा तसेच कामांचा वेळेवर निपटारा करण्यासाठी ओळखले जातात. विधिमंडळ अधिवेशन काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी, निवेदने व पत्रे देण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती. परंतु विधिमंडळ कामकाजातील व्यस्ततेमुळे सर्वच पत्रे-निवेदनांवर कार्यवाही होऊ शकली नव्हती. अधिवेशन संपताच, दुसऱ्या दिवशी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात येऊन सर्व प्रलंबित कामे निकाली काढल्याचे पाहायला मिळाले.