छत्रपती शिवाजी महाराज : भारतीय उद्योजकांचे प्रेरणास्रोत

    05-Aug-2023
Total Views |
Chhatrapati Shivaji Maharaj Inspiring Indian Entrepreneurs

आपण म्हणत आलोत ’उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी’ नाही, तर जिजाऊंनी स्वराज्य निर्माण करून ’छत्रपती’ होण्याचे स्वप्न लहान शिवबांच्या मनात पेरलच नसतं. म्हणूनच त्यांच्या चारित्र्यातून उद्योग-व्यवसाय कसा करावा, यशस्वी उद्योजक कसं व्हावं, याचीही प्रेरणा आपल्याला मिळू शकते.

'विको वज्रदंती’, ‘पितांबरी’पासून ते आजच्या ‘अलअदिल सुपर स्टोअर्स’चे ‘मसाला किंग’ डॉ. धनंजय दातार यांच्यापर्यंत व्यवसायात मराठी माणसाने अटकेपार झेंडे फडकवले आहेत. नोकरी सुरक्षित आणि व्यवसाय असुरक्षित या मानसिकतेतून मराठी समाज आज बाहेर पडत आहे. वरील व्यवसायांचे जनक म्हणजे पेंढारकर, परीक्षित प्रभूदेसाई, डॉ. धनंजय दातार ही शून्यातूनच विश्व निर्माण करणारी नावे आहेत. त्यामागे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची दृष्टी आहेच, असे मला वाटते. म्हणून मग शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन अनेक व्यावसायिक निर्माण व्हावेत, यासाठीच हा लेखप्रपंच.

१) मानसिकता : पूर्वीपासून अगदी १५व्या, १६व्या शतकातसुद्धा मराठी तरुण सुलतानाकडे किंवा बादशाहाकडे चाकरी करण्यात धन्यता व गर्व अनुभव करीत. त्यातून मिळणार्‍या वतन किंवा जहागिरीतच ते स्वतःला राजे म्हणवून घेत. आपण सुलतान किंवा बादशाहाकडे चाकरी करतो म्हणजे ती एक प्रकारची गुलामगिरीच आहे, याचे भान त्यावेळच्या मुलांना नव्हते. स्वतःकडे सर्व प्रकारच्या क्षमता असूनही त्यावेळी त्यांना स्वतःचे राज्य स्थापन करावेसे नाही वाटले. त्याप्रमाणे आजही मोठ्या प्रमाणात मराठी तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा दिसून येत नाही. हा विचार आजच्या मराठी तरुणांबाबत १०० टक्के बरोबर नसला, तरी मराठी तरुणांची मानसिकता व्यक्त करणारा आहे. एकमेकांशी असणारे हेवे-दावे, भाऊबंदकी, आपल्याला जमेल का? आपण अयशस्वी झालो, तर कुणी आपल्याला नावे, तर ठेवणार नाही ना? समाज काय म्हणेल? आपले समाजात काय स्थान असेल? आजचा मराठी तरुण या विचारातच इतका गुरफटतो की, स्वतःचे स्वातंत्र्य, स्वावलंबन, स्वाभिमान, अभिमान, या संकल्पना त्यांच्या मनाला शिवतही नाहीत. त्यामुळेच आजही काही अपवाद वगळता मराठी तरुण उच्च शिक्षण घेऊन नोकरी करण्यात धन्यता मानतात. त्यांचे विश्व नोकरी, लग्न, घर आणि त्यांच्यासारखाच विचार करणारी त्यांची मुले या पलीकडे नसते.

२) आजूबाजूची नकारात्मकता :आपल्या आजूबाजूचे नकारात्मक विचार आपल्याला आपल्या उद्दिष्टांपासून दूर नेतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सर्वात प्रथम हिंदवी स्वराज्य निर्मितीचा विचार मांडला असेल, तेव्हा त्यांच्या आजूबाजूच्या काही लोकांनी तरी नकारात्मक विधाने केलीच असतील. जसे, या आधी कोणी स्वतःचे राज्य निर्माण केलं होते का? कोणाला करायला जमलं आहे का? ज्यांनी असे प्रयत्न केले, त्या सर्वांचे शेवटी काय झाले? असेच एखादा उद्योग- व्यवसाय सुरू करतानासुद्धा बर्‍याच वेळा आपल्या आजूबाजूचे लोक नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करतात. तेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत या सर्व नकारात्मकतेच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवत, पडेल ते कष्ट करण्याची तयारी ठेवली, तर आपण आपले स्वप्न निश्चितच पूर्ण करू शकू.

३) आत्मविश्वास : खरंतर आजच्या मराठी मुलांसमोर उद्योजक होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्रोत आहेत. त्यातून प्रेरणा घेऊन मराठी माणसाने व्यावसायिकता अंगी बाणवली पाहिजे. आपण ’नोकरी मागणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे कसे होता येईल,’ असा विचार त्यांना करता आला पाहिजे. उच्च शिक्षण घेऊन त्यातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करत स्वतः उद्योजक बनत, उद्योग व्यवसायाला सुरुवात केली पाहिजे. आपल्या बाल शिवबा राजांनी वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा रायरेश्वराच्या मंदिरात घेतली, तेव्हा त्यांच्याकडे फक्त त्यांच्या वडिलांना आदिलशहाकडून मिळालेली पुणे व सुपे परिसरातील लहानशी जहागिरी होती. त्यांच्या आयुष्यात मोठमोठी संकटे आली; पण त्यांनी कधीही ध्येयाचा विसर पडू दिला नाही. याउलट संकटेच आपल्याला सामना करण्याची शक्ती देतात, ताकद देतात, ऊर्जा देतात, जिद्द देतात, तुमची क्षमता वाढवतात, तुमचे सामर्थ्य वाढवतात. परिणामी, १६४६ मध्ये स्थापन झालेल्या हिंदवी स्वराज्याचे पुढील १०० वर्षांत साम्राज्यात रुपांतर झाले.

४) सकारात्मक प्रेरक दृष्टिकोन : छत्रपती शिवाजी महाराजांकडे काम करणारे सर्व कर्मचारी, मग तो साधा शिपाई असला, तरी त्याच्या सुखदुःखात महाराज सहभागी होत. त्याच्या परिवाराची सर्वतोपरी काळजी घेत. त्याच्या सुखदुःखात त्याला योग्य ती मदत करत. त्यामुळे रयतेला महाराजांबद्दल सकारात्मक विश्वास निर्माण होण्यास मदत होई. उद्योजकानेसुद्धा आपल्याकडे काम करणारे सर्व कर्मचारी व आपल्या उत्पादनाशी संबंधित असलेले सर्व ग्राहक यांच्याशी शक्य तितके चांगले संबंध प्रस्थापित करणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यवसायवृद्धी होण्यास निश्चितच मदत होते. आपल्या कर्मचार्‍यांच्या सुखदुःखात जमेल, त्या पद्धतीने सहभागी होत त्यांना योग्य ती मदत केल्यास, तेही आपल्या मालकाशी प्रामाणिक राहतील.

५) धोरण : महाराजांनी व्यवस्थापनासंदर्भात घालून दिलेले धडे आज मॅनेजमेंटच्या अनेक कोर्सेससाठी प्रमाण मानले जातात. आजच्या आधुनिक कालखंडातील ‘मॉडर्न मॅनेजमेंट सायन्स’च्या अनेक गोष्टींची सुरुवात महाराजांनी आधीच केली होती. उदाहरणार्थ, स्वराज्य निर्मितीच्या कार्यात कामी येणार्‍या प्रत्येकाच्या घरातील व्यक्तींना अनुकंपा तत्त्वावर नोकरीवर घेत. ज्या घरात पुरुष नाहीत, त्या घरातील स्त्रीला अर्धे वेतन पेन्शन म्हणून दिले जात असे. त्यावेळी अनुकंपा किंवा पेन्शन हे शब्द नव्हते; पण महाराजांनी या योजना सुरू केल्या होत्या. हे आपल्याला अनेक उदाहरणांवरून सहज लक्षात येते.

६) कमी खर्च जास्त नफा : मित्रांनो, व्यवसाय निवडताना तो कमी खर्चात कमी कष्टात जास्त नफा देणारा कसा असेल, असा विचार करणे फार आवश्यक असते. महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात याचे तंतोतंत पालन केल्याचे दिसते. हा आदर्शच त्यांनी पुढच्या पिढ्यांसाठी घालून दिला आहे. महाराजांनी त्यांच्या संपूर्ण जीवनात दक्षिण दिग्विजय ही एकच मोहीम केली. महाराजांना शत्रूची खडान्खडा माहिती मिळत असे. त्या माहितीच्या आधारे महाराजांना गनिमीकाव्याच्या युद्धतंत्राचा वापर करत शत्रूला जेरीस आणणे सहज शक्य होई. कोणत्याही व्यावसायिकाने आपल्या व्यवसायाची अशीच सखोल माहिती मिळविली पाहिजे. त्यातील खाचखळगे समजून घेतले पाहिजेत. त्याआधारे त्याला त्याच्या व्यवसायात यश मिळविणे नक्कीच सोपे होईल.

७) जोखीम : महाराजांना स्वराज्य निर्मितीच्या कामात अनेकदा जीवावर बेतेल, अशा अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण, अखंड सावध राहून महाराजांनी त्यावर मात केली. उदा. आग्य्राहून सुटका किंवा अफजलखानाची भेट या प्रसंगातील थरार कोणालाही हादरवून टाकणारा आहे. उद्योजकांनी संकटाला न घाबरता अत्यंत सावधपणे हुशारीने त्यावर मात केली पाहिजे. संकटाला घाबरून आपल्या उद्दिष्टांपासून माघार घेता कामा नये.

८) प्रामाणिकपणा : महाराजांनी सूरतवर छापा टाकला. त्यातून जे धन मिळवले, त्यातून त्यांनी किल्ले बांधले. ते सर्व धन त्यांनी स्वराज्याच्या कामासाठी वापरले. उद्योजकांनीसुद्धा उद्योग व्यवसाय करताना अशाच प्रकारचे धोरण अवलंबिणे गरजेचे असते.

९) प्रभावी सुसंवाद : आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी उद्योजकाने अधिकाधिक माणसे कशी जोडता येतील, याचा सतत विचार केला पाहिजे. जोडलेला प्रत्येक माणूस टिकवून ठेवता आला पाहिजे. तो आपल्याला केव्हा, कुठे, कसा उपयोगात येईल, हे सांगता येत नसते. याची जाणीव सतत उद्योजकाने ठेवलीच पाहिजे.

१०) दूरदृष्टी : शिवचरित्र म्हणजे विवेक. हा विवेक प्रत्येकाने जपणं फार आवश्यक असतं. महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या कार्यात सदसद्विवेक बुद्धीचा, निरक्षरविवेक बुद्धीचा यथायोग्य उपयोग केल्याचे दिसून येते. उदा. त्या काळात धर्मशास्त्रानुसार समुद्र लांघणे चूक होते. पण, महाराजांनी काळाची पाऊले ओळखली समुद्रमार्गे आपल्याला धोका उत्पन्न होऊ शकतो, हे त्यांच्या लक्षात आले होते. उद्योजकालासुद्धा आपल्या उद्योग विकासाच्या दृष्टीने काळाची पावले ओळखता येणे व त्यानुसार आवश्यक ते बदल स्वीकारणे आवश्यक असते, तरच उद्योगाचा विकास होऊ शकतो.

११) कल्पकता : महाराजांना आरमार उभारताना युद्धबोटी व व्यापारी बोटींची आवश्यकता होती. इंग्रजांकडे मागणी केल्यावर त्यांनी देण्यास नकार दिला. तेव्हा महाराजांनी स्वतः इंग्रजांकडील बोटींपेक्षा चांगल्या दर्जाच्या ’संगमेश्वरी बोटी’ निर्माण केल्या व पुढे खंदेरी-उंदेरीच्या युद्धात याच बोटींच्या साहाय्याने इंग्रजांचा आरमारी पराभवसुद्धा केला. त्यामुळे इंग्रजांनासुद्धा महाराजांच्या या बोटींचा हेवा वाटू लागला. उद्योजकाचे उत्पादन कौशल्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण इतरांपेक्षा वेगळे असावे. जर त्यात नावीन्यता, आकर्षकता, चविष्टता, भव्यदिव्यता असेल, तरच तुमच्या उत्पादनाला बाजारात उठाव मिळेल. तुमचा व्यवसाय तेजीत येईल. मात्र, या गोष्टी नसतील, तर उत्पादनाला बाजारात उठाव मिळणार नाही. उद्योजकाने आपल्या उद्योगाचा विस्तार करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर केला पाहिजे. असा वापर नाही, केला तर कदाचित त्याला मिळणार्‍या यशात अपूर्णता राहू शकते.

१२) व्यसनाधीनता : मित्रांनो आज दारू, बिअर पिणे, सिगारेट, विविध प्रकारची व्यसने, हा शिष्टाचार होऊन बसला आहे. माझ्या मते, ‘जो शिवचरित्र जगतो तो, कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला बळी पडणार नाही.’ उद्योग-व्यवसाय करणार्‍या व्यक्तीने सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहावे. आपण नीट अभ्यास केला, तर आपल्या सहज लक्षात येते की, देशातील सत्तेची सूत्रे ही दर्शनी स्वरूपात जनतेच्या हाती दिसतात. पण, अप्रत्यक्षरित्या उद्योगपतींच्याच हातात असतात. हे तुम्हा आम्हा सर्वांनाच ज्ञात आहे. आज तुम्ही-आम्ही सर्वांनी आपण निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करणे, हाच एक शिवरायांचा मावळा म्हणून त्यांना केलेला मुजरा असेल. पण, देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी या देशातील युवकांनी सुद्धा आत्मनिर्भर होणे, अत्यंत आवश्यक आहे.

एक राष्ट्रवादी शिक्षक म्हणून मी माझ्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यकर्तृत्वातून घ्यावा, असा आदर्श यशस्वी उद्योजकतेचा मार्ग प्रत्येक व्यक्तीने अंगीकारावा. या उद्देशानेच येथे मांडला आहे. ही व्यक्तिरेखा पुढील अनेक पिढ्यांना अशीच संघर्षरत राहून यशस्वी जीवन जगण्याची प्रेरणा देत राहील.

प्रा. प्रशांत शिरुडे
(लेखक के. रा. कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, डोंबिवली येथे सहशिक्षक आणि इतिहास संकलन समितीचे सदस्य आहेत.)
prashantshirude१६७४@gmail.com
९९६७८१७८७६