बर्लिन : जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक

    05-Aug-2023
Total Views |
Berlin-world-archery-championships-2023-india-wins-historic-gold

मुंबई
: बर्लिन येथे जागतिक तिरंदाजी अंजिक्यपद स्पर्धेमध्ये कपांऊड प्रकारात भारतीय महिला संघाने सुवर्णपदक जिंकले आहे. या सुवर्णपदकासह भारताने नवा इतिहास रचला आहे. तसेच, या स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळाले आहे. ज्योती सुरेखा, अदिती स्वामी, पर्णित कौर या चमूने ही सुवर्ण कामगिरी केली आहे. दरम्यान, अव्वल मानांकित मेक्सिकोच्या महिला चमूचा २३५-२२९ असा पराभव केला आहे.

दरम्यान, उपांत्य फेरीतील पात्रता फेरीत द्वितीय मानांकित भारतीय त्रिकुटाने गतविजेत्या कोलंबियाचा २२०-२१६ असा पराभव करून विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला होता. तत्पूर्वी, भारतीय महिला कंपाऊंड संघाने पहिल्या फेरीत बाय मिळाल्यानंतर अनुक्रमे उपांत्यपूर्व फेरीत आणि उपउपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेई आणि तुर्कीचा पराभव केला होता.

एकंदरीत, जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये भारतीय संघाला पहिल्यांदाच सुवर्णपदकावर मोहोर उठविता आली आहे. भारतीय संघाने मेक्सिकोच्या संघाचा पराभव करत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. या सुवर्ण पदकामुळे भारताचे तिरंदाजीमधले स्थान निश्चितच उंचावणार आहे.