मुंबई : देशभरात अनेक घटना घडत असून हिंसाचार वाढताना दिसत आहे. अलीकडेच हरियाणातील नूहमध्ये हिंसाचार भडकला होता. या हिंसाचारामुळे अभिनेता गोविंदा एका वादात अडकला आहे. गोविंदाने या प्रकरणाबाबत एक ट्विट केले होते. हे ट्विट समोर आल्यानंतर एकीकडे गोविंदाला ट्रोल केले जात असून दुसरीकडे गोविंदाने त्याचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचे सांगितले आहे.
अकाउंटवरुन काय लिहिले ?
एका ट्विटर युजरने हरियाणातील हिंसाचाराचा व्हिडिओ शेअर केला होता. मुस्लिमांची दुकाने जमावाने लुटल्याचा दावा यात करण्यात आला होता. तेच ट्विट गोविंदाच्या ट्विटर अकाऊंटवरुन रिट्विट करत, “आपण इतके खालच्या पातळीवर गेलो? लाज वाटावी स्वतःला हिंदू म्हणवून घेणार्या लोकांना. शांतता निर्माण करा. आपण लोकशाहीत आहोत." असे ट्विट करण्यात आले होते.
लोकांनी मला राजकारण आणि त्यांच्या छुप्या अजेंडापासून दूर ठेवावे
या प्रकरणावर गोविंदाने इंस्टाग्रामवरुन स्पष्टीकरण दिले असून एका वेबसाईटला त्याने मुलाखत देखील दिली आहे. तो म्हणाला की, “मला राजकारण सोडून १८ वर्षे झाली आहेत. राजकारणात परत येण्यासाठी मी ट्विट करणारा व्यक्ती नाही. अशा प्रकारची फेक न्यूज धोकादायक आहे, कारण लोक अशा ट्विटद्वारे माझ्याबद्दल चुकीचे मत बनवू शकतात”.गोविंदा पुढे म्हणाला की, ठमला हरियाणात शोज मिळू नये, काम मिळून नये, यासाठी कुणीतरी हे केले असावे. ज्या व्यक्तीला सर्वांनी खूप भरभरुन प्रेम दिले, ते काहींना खपत नाही. लोकांनी मला राजकारण आणि त्यांच्या छुप्या अजेंडापासून दूर ठेवावे, अशी माझी इच्छा आहे. ना मी कोणाच्या राजकारणात गेलो, ना मला कोणाचा पाठिंबा मिळाला. माझ्या चित्रपटाला थिएटर्स मिळाले नाहीत, मला खूप त्रास झाला”, अशी प्रतिक्रिया गोविंदाने दिली आहे.