इंडोनेशियाचे संस्कार...

    30-Aug-2023   
Total Views |
Indonesia Teacher tonsures at least 14 female students for not wearing hijab 'properly' in classroom

‘त्या’ १४ विद्यार्थिनींचे शिक्षेच्या स्वरुपात जबरदस्तीने केशवपन करण्यात आले. विद्यार्थिनींच्या पालकांनी या कृत्याबद्दल शाळेला जाब विचारला. मुलींचे जबदरस्तीने केस कापणार्‍या शिक्षकाचे उत्तर होते- विद्यार्थिंनीनी हिजाब व्यवस्थित घातला नव्हता. डोक्यावरचे काही केस दिसत होते. हिजाबच्या आत टोपीसदृश कपडा वापरायचा असतो, तो त्यांनी वापरला नव्हता. त्यामुळे त्यांचे केस कापले. ही घटना कालपरवाच इंडोनेशियामध्ये घडली. भयंकर! शरीर मेल्यावरच मृत्यू होतो का? छे! किशोरवयीन मुली. जगभरातील कुठलीही या वयातील मुलगी म्हणजे बिनपखांची परीच!

हिजाब घातला नाही. म्हणून या वयाच्या मुलींचे जबदरस्तीने केस छाटले? त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल? भीती, असाहाय्यता आणि जुलूमशाहीचा बळी होणे, ही भावना मनात खोल रूजलीच जाणार. काय म्हणावे या क्रूरतेला? बरं हिजाब परिधान करणे, हा काही त्या शाळेचा ड्रेसकोड नव्हता, तरीसुद्धा इंडोनेशियामधील शाळेत त्या कट्टरपंथी शिक्षकाने विद्यार्थिनींना सजा दिली. काही वर्षांपूर्वीही इंडोनेशियामध्ये अशीच घटना घडली होती. एका ख्रिस्ती मुलीला शाळेत जबरदस्तीने हिजाब परिधान करण्यास लावले होते.

तसेच, मागे इंडोनेशियाच्या जावामध्ये एक घटना घडली. अल जायतून नावाच्या शाळेत मुख्याध्यापक पांजी गुमिलांग यांनी प्रार्थना समारोह आयोजित केला. त्यावेळी स्त्री आणि पुरूषांसाठी एकत्र प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. स्त्री-पुरूषांना एकत्र प्रार्थना (नमाज) करण्यासाठी शाळेत परवानगी दिली. आयोजन केले म्हणून मुख्यध्यापक पांजी गुमिलांग गुन्हेगार ठरवले गेले. त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. आखाती अरबी देशांमध्ये जो धार्मिक कट्टरता उन्माद दिसतो, तो उन्माद आता इंडोनेशियामध्येही दिसू लागला आहे. मात्र, मुस्लीम धर्म हिंसेला परवानगी देत नाही, अशी भूमिका इंडोनेशियाच्या उलेमांनी घेतली. भारतात येऊन अजित डोवाल यांच्या समवेत त्यांनी या विषयावर चर्चाही केली आहे. दुसरीकडे कट्टरतावाद दाखवला, तर जनतेवर राज्य करता येईल, अशी मानसिकता इंडोनेशियन राज्यकर्त्यांची आहेच.

जागतिक अभ्यासकांच्या मते, सौदी अरेबियाच्या माध्यमातून इथे कट्टरतावादी विघातक मनोवृत्तीची सुरुवात झाली. २०१६ साली ‘इसिस’ ही दहशतवादी संघटना इंडोनेशियन भाषेत त्यांचे ‘अल फतिहीन’ नावाचे साप्ताहिक प्रकाशित करू लागली. पुढे तीन-चार वर्षांत इंडोनेशियामध्ये ११ आत्मघातकी हल्ले झाले.दहशतवाद्यांनी लक्ष्य केले-ते हिंदूबहुल बाली बेटाला. या बेटावर हिंदू संस्कृती आणि धर्माच्या खुणा वैभवशालीरित्या विराजमान आहेत. जगभरातले प्रवासी बाली बेटावर येतात. पर्यटन क्षेत्रामुळे बालीमधील हिंदू संपन्न आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की, हिंदूंच्या अस्तित्वाच्या जीवंत खुणा म्हणजे बाली बेट. या बेटावर दहशतवादी हल्ले केले, तर इथे जगभरचे पर्यटक येणार नाहीत. मग एकाकी पडलेल्या बाली बेटाचे इस्लामीकरण करणे सोपे जाईल, असे काही कट्टरपंथीयांना वाटते.इंडोनेशियातले हिंदुत्व नष्ट करण्यासाठी कट्टरपंथी प्रयत्न करत आहेत. मात्र, वाढता कट्टरतावाद सहन न होऊन इथले मुस्लीम पुन्हा हिंदू धर्मात परतत आहेत.
 
२०१७ साली जावाची राजकुमारी कांजेंग महेंद्राणी आणि थायलंडचे माजी राष्ट्रपती सुकार्णो यांची कन्या सुकमावती यांनी २०२१ साली इस्लाम त्यागून हिंदू धर्म स्वीकारला. ‘नॅशनल इंडोनेशियन ब्यूरो ऑफ़ स्टेटिस्टिक्स’ने मान्य केले होते की, गेल्या एका दशकात जावामधील किमान एक लाख मुस्लिमांनी हिंदू धर्म स्वीकारला. ते हिंदू धर्माकडे परत का वळत असतील? तर इंडोनेशियातील मुस्लिमांचे पूर्वज भारतीय हिंदूच आहेत, हे सत्य इथल्या मुस्लिमांनी स्वीकारले आहे. इंडोनेशियाचे माजी राष्ट्रपती सुकार्णो यांनी तर पाकिस्तानच्या दूताला म्हटले होते की, ‘’आमचा धर्म मुस्लीम आहे. मात्र, आमची संस्कृती रामायण आहे.” इंडोनेशियामध्ये १४ मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला गेला. कारण, इंडोनेशिया मुस्लीमबहुल असला, तरी रामायणाने संस्कारित आहे, नाही तर इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येही महिलांना काय सहन करावे लागते, हे जगजाहीर आहेच.
 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.