नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक घेतली. त्यांनी आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.
पक्षाध्यक्ष नड्डा यांनी भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांसोबत तयारीचा आढावा घेतला. यावेळी मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणामधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या सुरू असलेल्या तयारीचाही त्यांनी आढावा घेतला आणि भविष्यातील रणनीतीवर चर्चा केली.
नड्डा यांनी यावेळी नड्डा यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्यासोबत मध्य प्रदेशातील यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. भाजपने गेल्या महिन्यात भूपेंद्र यादव यांची मध्य प्रदेशसाठी पक्षाचे निवडणूक प्रभारी आणि वैष्णव यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारास वेग आला आहे. प्रचाराचा एक भाग म्हणून राज्यात लवकरच विशेष प्रचारयात्रा काढण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह प्रमुख नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही यात्रा राज्यातील वेगवेगळ्या पाच ठिकाणांहून निघणार आहे.
१६१ जागांसाठी भाजपची रणनीती
गेल्या निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता त्या लोकसभा जागांवर भाजपची नजर आहे. गतवेळच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभूत झालेल्या १६१ लोकसभा जागांपैकी १ हजार मतदारसंघांमध्ये पक्षाचे दिग्गज नेते उभे करून या जागा जिंकता येतील. या जागांसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या सदस्यांमध्ये राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, विनोद तावडे, माजी सरचिटणीस नरेश बन्सल, पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा आणि राष्ट्रीय सचिव हरीश द्विवेदी यांचा समावेश आहे.