वारसा सफर गिरगावची...

    30-Aug-2023
Total Views |
Article on Heritage Girgaon
 
भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांतातर्फे नुकतीच गिरगांवची वारसा सफर आयोजित करण्यात आली होती. अधूनमधून पण जोरदारपणे कोसळणार्‍या पावसाच्या सरींची मजा लुटत सहभागींनी सफरीचा आनंद घेतला. त्याचाच शब्दबद्ध केलेला हा अनुभव...
 
गिरगांव या ग्रामनामाचा उगम ’गिरीग्राम’ या शब्दांतून झाला आहे. वालुकेश्वराच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेला गाव तो ‘गिरीग्राम’ किंवा ‘गिरगाव.’ मुंबईतले अत्यंत धनिक आणि तितकेच दानशूर व्यापारी सर जमजेटजी जिजीभाई (सर जे.जे.) यांनी १९३८ साली या गिरगावातली खूप मोठी हिरवळयुक्त जमीन विकत घेतली. स्थानिक लोकांच्या गुरांना चरण्यासाठी त्यांनी गुरचरण किंवा चरणी म्हणून ते कुरण विनामूल्य उपलब्ध करून दिले. त्या ’चरणी’वरून पुढे १८६७ साली तिथे बांधण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाला ‘चरणी रोड’ किंवा ‘चर्नी रोड’ असे नाव मिळाले, अशी गमतीदार माहिती घेत सफरीतली मंडळी पुढे, जगन्नाथ शंकरशेट उर्फ नाना यांच्या ठाकूरद्वार येथील मूळ वास्तूमध्ये गेली. त्या मूळ वास्तूचा थोडासा भाग, एक तुळशी वृंदावनच आता शिल्लक आहे. परंतु, भारतात रेल्वे आलीच पाहिजे, असा आग्रह धरणारा नाना शंकरशेट नामक द्रष्टा महापुरुष या वास्तून वावरला, हे ऐकताना एक वेगळाच थरारक अनुभव मिळाला.
 
पुढे झावबा राम मंदिर आणि आत्मारामबुवा राम मंदिर, ज्यांना स्थानिक लोक अनुक्रमे ‘गोरा राम’ आणि ‘काळा राम’ या नावांनी ओळखतात, त्या देवस्थानांचा परिचय झाला. १८७८ साली विठोबा वासुदेव झावबा या पाठारे प्रभू ज्ञातीतल्या धनिक गृहस्थांनी गोरा राम मंदिर उभारले होते, तर या आधीच म्हणजे १८२८ साली सावंतवाडीहून आलेले एक साधुपुरुष आत्मारामबुवा पळसुले यांनी सुंदर काळ्या पाषाणाच्या राम पंचायतन मूर्तीची स्थापना केली होती. लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य म्हणजेच ’भाऊचा धक्का’ बांधणारे भाऊ अजिंक्य यांच्या पाठबळाने या ठिकाणी ठाकूरद्वार उभे राहिले. १८७० मध्ये कृष्णनाथबुवा ठाकूरदास यांनी राममंदिराच्या शेजारीच श्रीस्वामी समर्थ अक्कलकोट यांच्या पादुका स्थापन केल्या. म्हणजेच काळा राम आणि गोरा राम या दोन्ही प्रख्यात देवस्थानांच्या उभारणीत पाठारे प्रभू या ज्ञातीचा मोठाच सहभाग होता.हा सगळा इतिहास समजून घेत मग वारसा सफर ठाकूरद्वारच्या वैद्यवाडीत प्रविष्ट झाली. सिन्नरहून मुंबईला आलेल्या आणि अनेक लोकांना रामोपासनेला लावणार्‍या मौनी महाराजांचा मठ, राममंदिर आणि समाधी यांचा इतिहास मौनी महाराजांचे पणतू प्रमोद देशपांडे यांनीच सर्वांना ऐकवला. मौनी महाराज १८७७ मध्ये समाधिस्थ झाले.

Article on Heritage Girgaon

याच वाडीत एक विठ्ठल मंदिर आहे. मुंबईचे मूळ रहिवासी जे कोळी लोक त्यांच्यापैकी एका महिलेने बांधून विठ्ठल-रखुमाईचरणी अर्पण केलेले हे २५० वर्षांपूर्वीचे मंदिर, सध्या बिल्डर मंडळींच्या कचाट्यात सापडले आहे. बिल्डर हिंदूच आहे. तरीही त्याला विठ्ठल मंदिर हटवून तिथे धनदांडग्यांसाठी मौजमजेची सोय करायची आहे. भक्त मंडळी कंबर कसून आपल्या या वारशाच्या रक्षणासाठी लढत आहेत. त्यांना शुभेच्छा देऊन वारसा सफर सहभागी मुगमाटातल्या बेडेकर सदन किंवा पूर्वीच्या शांतारामाच्या चाळीत आले. शांतारामाची चाळ म्हणजे टिळक युगातले मुंबईतले राजकीय सभांचे स्थान. पु. ल. देशपांडे एकदा म्हणाले होते की, “देवाने मला दोन वर दिले, तर एका वराने मी भास्करबुवा बखल्यांचे गायन ऐकेन आणि दुसर्‍या वराने, शांतारामाच्या चाळीत, गरजणार्‍या सिंहाप्रमाणे चाललेले लोकमान्य टिळकांचे भाषण ऐकेन.”
 
 
शांतारामाच्या चाळीतून आता सफरीचा अखेरचा पडाव आता. पिंपळवाडीतला यादवकालीन शिलालेख. इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्या आधी मुंबईवर सुमारे ६५ वर्षे देवगिरीच्या यादव घराण्याचा अंमल होता. बहुधा त्याच काळातला म्हणजे १३व्या शतकातला म्हणजे ७०० वर्षांपूर्वीचा हा शिलालेख आहे. वरच्या एका कोपर्‍यावर सूर्य, दुसर्‍या कोपर्‍यावर चंद्रकोर, मधल्या भागात दानपत्राचा मजकूर कोरलेला आणि अगदी खाली गधेगाळाचे चिन्हे, असा हा शिलालेख म्हणजे मुंबईतली कदाचित सर्वात प्राचीन वस्तू आहे.सुमारे पाच तास चाललेल्या या पायपिटीत अर्धा गिरगावदेखील झाला नाही. पण, गिरगावला म्हणजे मूळ मुंबई शहरालादेखील वेगळा सांस्कृतिक इतिहास आहे, हे सहभागींना कळले. मुंबई म्हणजे नुसतीच सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, व्यापारीनगरी नसून तिलाही एक घरंदाज संस्कृती आहे, याची एक झलक सहभागींना दिसली.‘भारतीय इतिहास संकलन समिती’ ही संघ परिवारातील इतिहास क्षेत्रात काम करणारी संघटना असून, समाजाला आपल्या अस्मितेची जाणीव करून देणे, हे तिचे काम आहे. यासाठी समिती अशा वारसा सफरी विनामूल्य आयोजित करीत असते. सदर सफरीत इतिहास अभ्यासक मल्हार कृष्ण गोखले यांनी प्रत्येक ठिकाणाची माहिती कथन केली.
 
 
- मल्हार कृष्ण गोखले