सेवा हैं यज्ञ कुंड, समिधा सम हम जले...

    03-Aug-2023
Total Views |
Manoj Pochat
 
पुणे येथील दि. १ ऑगस्टच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांच्या ट्विटचा आवर्जून उल्लेख केला, ते पुण्यातील तरुण उद्योजक मनोज पोचट यांची ही सेवागाथा...

प्रतिकूल परिस्थितीमुळे संगणकशास्त्राचे शिक्षण अर्धवट सोडावे लागणार्‍या पुण्याच्या तरुणाच्या आयुष्यातील कलाटणी सुखद आणि तितकीच धक्कादायक तेव्हा ठरली, जेव्हा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटची दखल घेऊन जाहीर सभेत त्यांचे कौतुक केले. आपल्या कर्तृत्वाच्या आणि जिद्दीच्या जोरावर मनोज पोचट यांनी नंतर याच क्षेत्रात उंच भरारी घेऊन ’सेवा इन्फोटेक’चा सहसंस्थापक म्हणून आपले कार्य सुरु ठेवले.पोचट यांनी ३१ जुलैच्या ट्विटमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली नऊ वर्षांनंतर देशाने केलेल्या प्रगतीमुळे जगात भारताचे नाव उंचावले आहे. भारताची ‘ग्लोबल इमेज’ चांगली झाली. तसेच, सरकारबद्दल विश्वास निर्माण झाला आणि ‘ट्रस्ट डेफिसिट टू ट्रस्ट सरप्लस’ परिस्थिती आहे, असे नमूद केले. मोदी यांनी त्यांच्या पुण्याच्या १ ऑगस्टच्या भाषणात ही आठवण करून दिल्याबद्दल पोचट यांनी मोदींचे आभार व्यक्त केले.

राज्याची उपराजधानी नागपूरच्या मध्य प्रदेश सीमेवरील पांढुर्णा तालुक्यातील राजना गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मनोज यांच जडणघडण विस्मयकारक आहे. काटोल तालुक्यातील सोनोली या आपल्या मामाच्या गावच्या जिल्हा परिषद शाळेत मराठी माध्यमाचे शिक्षण घेत त्यांनी आपले आजोबा आणि आईवडिलांनी केलेल्या संस्कारातून प्राथमिक शिक्षणाची वाटचाल सुरू केली. घरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार. परिस्थिती तशी बेताचीच. काटोलच्या महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी आर्थिक सोय करणे जिकरीचे होते. नेमके त्याचवेळी आजोबांचे आजारपण, बहिणीच्या विवाहाची तयारी, यामुळे इंदोर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ‘कॉम्प्युटर सायन्स’चे शिक्षण त्यांना अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर त्यांनी शेतीत लक्ष घातले. तथापि, आईचा आग्रह शिक्षण पुढे सुरू ठेवावे, असा होता. जनसंघ आणि भाजपच्या प्रचाराची आठवण सांगताना, त्यांच्या वडिलांनी गायींच्या पाठीवर गेरूने कमळ चिन्ह रेखाटून प्रचार केल्याचे मनोज सांगतात. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. मग आपल्या बुद्धिमत्तेवर त्यांनी यशाला कधीच दूर जाऊ दिले नाही.
 
 
‘फोर स्कूल ऑफ मॅनेजमेंट’ला ‘एमबीए’ला त्यांना प्रवेश मिळाला. विद्यापीठात तर प्रथम येऊन सुवर्णपदकही त्यांनी पटकावले. ‘एमबीए’नंतर अदानी गु्रपला गुजरातमध्ये पहिली नोकरी केली. त्यानंतर टाटा समूहात मुंबईत चार वर्षं आणि पुण्यात ‘आयबीएम’मध्ये नोकरी केली. त्यानंतर पुण्यात सुजित जैन आणि सहकार्‍यांच्या सोबतीने ’सेवा इन्फोटेक’ची स्थापना करून ते सध्या कार्यरत आहेत.गेल्या १२ वर्षांपासून पुण्यात त्यांनी संघकार्यात स्वतःला झोकून दिले आहे. ‘सीएजी पीपीपीआर ग्रुप’मध्ये सहभागी होऊन त्यांनी सेवाकार्य सुरू केले. धानोरी येथे संघाची शाखाही सुरू केली. कार्यवाह, येरवडा शिवशक्ती भाग तसेच महानगर संपर्कप्रमुख म्हणूनही मनोज यांनी कार्य केले. २०१६ पासून सुनील मेहता यांच्या नेतृत्वात सहनेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. यामुळे अनेक उद्योजक, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि प्रमुख लोकांशी त्यांचा संपर्क होत गेला. कोरोनाकाळात तर ‘सीरम इन्स्टिट्यूट’च्या अदर पुनावाला यांच्या माध्यमातून त्यांनी बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिकमार्फत पाच लाख लसींचे वितरण केले. राम मंदिर उभारणीसाठी विशेष निधी संकलनाची जबाबदारी, बाळासाहेब देवरस हॉस्पिटलसाठी निधी उभारण्याची जबाबदारी आणि इतर सेवाकार्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

मनोज पोचट हे आपल्या मूळ गावातील (राजना) तरुणांच्या हितासाठीही सातत्याने कार्य करीत असतात. उच्च शिक्षण घेताना त्यांना शेती विकून आणि कर्ज काढून हा प्रवास पूर्ण करावा लागला होता. तथापि, आता चित्र पालटले असून, आपल्या आईमुळे आपण अर्धवट सोडलेले शिक्षण पूर्ण करून ते सेवाकार्यात रमले आहेत.गुजरातमधील भूकंपग्रस्तांच्या सेवेसाठी नरेंद्र मोदी यांनी जे कार्य केले, त्यातून प्रेरणा घेऊनच आपण, ही वाटचाल सुरू केल्याचे मनोज आवर्जून सांगतात. सोशल मीडियाकडे मनोज २००७ सालापासूनच आकर्षित झाले. २०१३ साली फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये नरेंद्र मोदी यांची जी सभा झाली होती, त्यावेळी दि. १४ जुलै २०१३ रोजी त्यांनी फेसबुकवर पोस्ट करून ‘ट्रस्ट डेफिसिट’वर युवकांकडून मत मागितले होते आणि त्यावर आपण पुण्याच्या सभेत बोलू, असे सांगितले होते. तेव्हा मनोज पोचट यांनी त्या आवाहनावर प्रतिक्रियादेखील दिली होती.
 
“आगामी काळात भारत ‘सुपरपॉवर’ म्हणून उदयास येण्यासाठी हा ‘ट्रस्ट डेफिसिट टू ट्रस्ट सरप्लस’चा प्रवास सातत्याने यशस्वी करणे, ही सर्वांची जबाबदारी आहे. २०२३ पासून पुढे भारताबद्दल ‘ग्लोबल ट्रस्ट’चे वातावरण निर्माण होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी नेमक्या याच मुद्द्यावर आपल्या नावाचा उल्लेख करून अनपेक्षित सुखद धक्का दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
 
 
-अतुल तांदळीकर
(अधिक माहितीसाठी संपर्क ः ९८१९९६७५९५)