मुंबई : फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून आता बातम्या शेअर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोबतच, न्यूज पोर्टलच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेल्या बातम्यांच्या लिंक्स हटवण्यास मेटाने सुरूवात केली आहे. कॅनडामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
कॅनडा सरकारने ऑनलाईन न्यूज कायदा पारित केल्यानंतर मेटाने हे पाऊल उचललं आहे. या कायद्यावर मेटा आणि गुगल या दोन मोठ्या कंपन्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या तरी केवळ कॅनडा देशामध्येच ही कारवाई करण्यात येत आहे. मेटा कंपनीच्या कॅनडामधील पब्लिक पॉलिसी प्रमुख असणाऱ्या रेचल करन म्हणाल्या, "न्यूज आउटलेट स्वेच्छेने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर आपला कन्टेन्ट शेअर करतात. आपला वाचकांपर्यंत रीच वाढवण्यासाठी ते या प्लॅटफॉर्मचा आधार घेतात. आमच्या प्लॅटफॉर्मवर लोक सामान्य वापरासाठी येतात, बातम्या वाचण्यासाठी ते येत नाहीत." असं त्या म्हणाल्या.