सलग दुसऱ्या दिवशी बेस्टच्या कामगारांचा संप सुरुच ; मुंबईकरांना मात्र फटका
03-Aug-2023
Total Views |
मुंबई : मुंबईतील घाटकोपर डेपोमधील बेस्ट बसचे कंत्राटी चालक कालपासून संपावर गेले आहेत. विविध मागण्यांसाठी त्यांनी हा संप पुकारला आहे. आज संपाचा दुसरा दिवस आहे आणि हा संप आता अनेक आगारांमध्ये पसरला आहे. पगार वाढ, सुविधा, ओव्हर टाईम अशा अनेक मागण्यांसाठी त्यांनी हा संप पुकारला आहे.
आज दुसऱ्या दिवशी देवनार, आणि, मुलुंड, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, गोराई, शिवाजी नगर, बॅकबे, प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज आणि मजास या आगारांमधील कंत्राटी चालकही संपावर गेले आहे. मुंबईतील सामान्य नागरिकांना मात्र या सर्वाचा फटका बसतो आहे. परंतू, जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा संप सुरुच राहाणार असा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. पगार वाढीसारख्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी त्यांनी हा संप पुकारला आहे.
बेस्टमध्ये सध्या जवळपास नऊ हजार कंत्राटी कर्मचारी आहेत. हे सगळेच कर्मचारी संपावर गेले असल्याचा दावा कर्मचारी संस्थेने केला आहे. यामध्ये एसएमटी एटीपीएल असोसिएटचे दोन हजार कंत्राटी कर्मचारी, मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्टचे तीन हजार कंत्राटी कर्मचारी, हंसा ग्रुपचे दीड हजार, टीएमएल ग्रुपचे दोन हजार, ओलेक्ट्रा ग्रुपचे ५०० इतक्या खासगी कंत्राटी कर्मचार्यांचा समावेश आहे.
बेस्टच्या कर्मचार्यांच्या या मागण्यांसाठी प्रज्ञा खजुरकर या सहकुटुंब आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत. आझाद मैदानात खजुरकर यांना समर्थन देण्यासाठी हे कंत्राटी कामगार संपावर गेले आहेत. याआधीही या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी अनेक वेळा आंदोलन केले आहे.