नवी दिल्ली : रक्षाबंधन आणि ओणम सणाच्या निमित्ताने मोदी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये २०० रूपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर ४०० रूपयांनी स्वस्त दरात मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची आणि अर्थविषय मंत्रिमंडळ समितीची बैठक झाली. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती पत्रकारपरिषदेत दिली. यावेळी ते म्हणाले, रक्षाबंधन आणि ओणन सणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये २०० रूपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील ३३ कोटी गॅसजोडणीधारकांना याचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे २०२३-२४ या आर्थिक वर्षात सरकारवर ७ हजार ६८० कोटींचा बोजा पडणार आहे.
केंद्र सरकारतर्फे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरसाठी २०० रुपयांचे अनुदान दिले जाते. सरकारच्या या निर्णयानंतर उज्ज्वला ९ कोटी ४६ लाख उज्ज्वला लाभार्थ्यांना अतिरिक्त २०० रूपयांच्या कपातीमुळे एकूण ४०० रूपयांची सूट गॅस सिलिंडरच्या दरात मिळणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार देशातील ७५ लाख महिलांची उज्ज्वला योजनेंतर्गत नोंदणी करणार आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची एकूण संख्या १० कोटी ३५ लाख एवढी होणार असल्याचेही केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी नमूद केले आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगचे कौतुक करणारा ठराव केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत चांद्रयान-3 मोहिमेसाठी काम करणाऱ्या इस्रोच्या वैज्ञानिकांच्या ऐतिहासिक यशाचे कौतुक केले. ते म्हणाले की, मंत्रिमंडळ चांद्रयान आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांना सलाम करते.