मुंबई : उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या वेळी हल्ला होईल, असं विधान केलं. राऊतांच्या या विधानाचा भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंनी खरपूस समाचार घेतला आहे. केशव उपाध्येंनी ट्विट करत राऊतांच्या या विधानावर सवाल उपस्थित केला आहे. तर, यासंबंधी अधिक चौकशी करण्याची मागणी ही केशव उपाध्येंनी केली आहे.
ट्विट करत केशव उपाध्ये म्हणाले, "शिल्लक सेनेचा हताश विश्वप्रवक्ता हा अशा प्रकारच्या पुड्या सोडण्यात तरबेज झाला आहे. जनतेला संभ्रमात टाकणे, लोकांची माथी भडकवणे आणि बिनबुडाचे आरोप करणे, हा या माथेफिरूचा रोजचा धंदा आहे. श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या वेळी हल्ला होईल, हे भाकीत त्याने कशाच्या आधारे केले, त्याचा पुरावा काय ? याची चौकशी करण्यासाठी या भंपक विश्वप्रवक्त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे." असं केशव उपाध्ये म्हणाले.