मुंबई : इंडिया आघाडीची मुंबईत ३० ऑगस्ट, १ सप्टेंबरला बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या बाबत चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू आहे. ग्रँड हयात हॉटेल परिसरात मविआकडुन बॅनरबाजी करण्यात आली आहे. बैठकीसाठी मुंबईत येणाऱ्या नेत्यांच्या स्वागतासाठी हे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
तुतारी, नाशिक ढोलच्या माध्यमातून नेत्यांचे स्वागत होणार आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या डिनरमध्ये महाराष्ट्रीयन पदार्थ असणार आहेत. पुरणपोळी, झुणका भाकर, वडा पाव या पदार्थांसह इतर मराठी पदार्थही मेन्यूमध्ये असणार आहेत. या बैठकीसाठी हयात हॉटेल मधील 175 खोल्या नेत्यांसाठी बुक केल्या असून विविध राज्यातून 60 ते 65 नेते बैठकीला या राहणार उपस्थित असणार आहेत.
इंडिया आघाडीच्या बैठकीआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची ३० ऑगस्ट रोजी बैठक होणार आहे. या वेळी इंडिया आघाडीच्या बैठकीविषयी महाविकास आघाडीने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे.