
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरिक ए इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना तोशखाना प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेस स्थगिती देत त्यांचा जामीन मंजूर केला आहे.
पाकिस्तानमधील जिल्हा सत्र न्यायालयाने इम्रान खान यांना तोशखाना प्रकरणात ३ वर्षांची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने इम्रान खान यांना १ लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावला होता, तसेच त्यांच्यावर ५ वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातली होती.
पाकिस्तामधील मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने ऑगस्ट २०२२ मध्ये इम्रान खान यांच्यावर तोशखाना प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. पंतप्रधान असताना इम्रान खान यांनी त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती तोशखाना विभागाकडे उघड केली नाही. तसेच, या भेटवस्तू बेकायदेशीरपणे विकल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर करण्यात आला होता.
तोशाखाना प्रकरणी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने इम्रान खान यांच्या शिक्षेला स्थगिती देताना त्यांची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु , इम्रान खान अट्टक तुरुंगातून बाहेर येण्याआधी, गुप्त पत्र चोरी प्रकरणात (सायफर गेट स्कँडल) त्यांना ताब्यात घेण्यात आले. पाकिस्तानच्या 'द डॉन' या वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे.