महाराष्ट्रात सध्या दोन ठाकरे अर्थात राज आणि उद्धव ठाकरे असा कलगीतुरा रंगला आहे. त्यात आता भर पडली आहे, दोन पवारांची. राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीतच शिवसेनेला सोडचिठ्ठी देत मनसेची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी अनेक चढ-उतार पाहत स्थित्यंतरे अनुभवली. मात्र, त्यांना नाशिक महापालिका वगळता, अन्यत्र सत्तेची चव चाखता आली नाही. त्यामुळे ते नेहमीच ‘माझ्याकडे एकदा सत्ता येऊ द्या, मला एकदा संधी देऊन तर बघा’ असे आवाहन करत विविध विषयांवर राडे करत आपल्याकडे लक्ष वेधून घेत असतात. राज्यातील अन्य पक्षांना राज ठाकरे यांची ताकद माहीत आहे. परंतु, दुसरे ठाकरे म्हणजेच उद्धव ठाकरे राज यांना नेहमीच कमी लेखत आले असून त्यांचे सुपुत्र आदित्य हे तर मनसेची ‘संपलेला पक्ष’ अशी हेटाळणी करत राज यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करतात. सत्ता होती तोर्यंत उद्धव आणि त्यांचे सुपुत्र आदित्य यांचा रोख नेहमीच राज यांच्यावर होता. एकीकडे राज यांनी स्वबळावर पक्ष उभा केला, तर दुसरीकडे उद्धव यांना सारेकाही तयार मिळाले. मात्र, ते धड सांभाळता आले नाही. आता त्यांची केवळ उर्वरित राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत फरफट सुरू आहे. राज ठाकरे यांनी जरी मुंबई-गोवा महामार्गाचा रखडलेला प्रश्न उपस्थित करुन आंदोलनाचा पवित्रा घेतला असला तरी निवडणुकांमध्ये मतदार त्यांच्या मागे कितपत उभे राहतील, हाच खरा प्रश्न. त्यामुळे त्यांना अपेक्षित यश मिळेनासे झाले आहे. दुसरे ठाकरे उद्धव यांचीही अवस्था तशीच आहे. त्यांनीही सत्तेसाठी मराठी आणि हिंदुत्वाला मूठमाती दिल्याने त्यांच्यासोबत असलेले लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्यांनी त्यांचा त्याग करत पक्षांतर नव्हे, तर पक्षच ताब्यात घेतला. आजघडीला उद्धव यांच्याकडे पक्षही नाही आणि कार्यकर्तेही नाहीत. त्यांच्याकडे केवळ टोमणे शिल्लक असल्याचा आरोप केला जातो. हे टोमणे ते अधूनमधून राज ठाकरे यांच्यावरही मारतात. त्यांच्या या टोमण्यांना राज आपल्या परखड वकृत्वातून चोख उत्तर देतात. एकूणच काय तर, येत्या काळात राज्यात महापालिका आणि त्यानंतर येणार्या निवडणुकांमध्ये दोन ठाकरेंमधील आरोप-प्रत्यारोपाची राळ अधिक वाढलेली दिसली तर नवल ते काय!
इतरांसाठी केलेल्या सापळ्यात जेव्हा आपण स्वत:च अडकतो, त्यावेळी काय अवस्था होते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार. शरद पवार कधी काळी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असायचे. मात्र, हल्ली ते त्यांच्याशीच शर्यत लावत असल्याचे त्यांच्या अलीकडच्या उदाहरणांवरून दिसून येते. सकाळी पवार म्हणतात की, ‘अजित पवार आमचे नेते आहेत,’ तर संध्याकाळी म्हणतात, ‘मी असे बोललोच नाही.’ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट आणि त्यात शरद पवार यांचे वाढते वय पाहता, त्यांचा करिष्मा आजघडीला संपल्यात जमा झाला आहे. त्यांचे बहुतांश आमदार आणि लोकप्रतिनिधी अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे पक्षात उभी फूट पडलेली असूनही ते मान्य करण्यास तयार नाहीत. ‘आमच्या पक्षात फूट नाहीच’ असे सांगणारे पवार दुसरीकडे ‘माझा फोटो वापरू नका,’ असे म्हणताना, ‘माझ्या प्रतिमेशिवाय त्यांची ओळख नाही,’ असे परस्पर विरोधी वक्तव्य करतात. कालपर्यंत अजित पवार आणि शरद पवार या दोघांनी राजकीय मर्यादा सांभाळल्या. मात्र, आता राष्ट्रवादीतही कलगीतुरा सुरू झाला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले आहेत. अजित पवार यांना आपले राजकीय करिअर टिकवायचे आहे, तर शरद पवार यांची या वयातही महत्त्वाकांक्षा संपण्याची चिन्हे दिसत नाही. त्यामुळे त्यांनी सत्तेसाठी आजवर ज्या तडजोडी आणि फोडाफोडी केली, तोच कित्ता त्यांचे अनुयायीदेखील गिरवत आहेत. शरद पवार यांच्या माध्यमातून स्थापन झालेल्या महाविकास आघाडीचे भवितव्य यामुळे धोक्यात आले असून भाजपविरोधी आघाडी ‘इंडिया’तही शरद पवार यांना आपले स्थान टिकविणे यापुढे अवघड जाणार आहे. एकीकडे थोरले पवार महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपला हेका कायम ठेवत आहेत, तर दुसरीकडे धाकट्या पवारांनी भविष्यकाळाला साद घालत भाजप आघाडीला पाठिंबा देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. त्यातूनच ‘पवार विरूद्ध पवार’ संघर्षाची नांदी अटळ आहे.
मदन बडगुजर