केशवार्पण

    29-Aug-2023   
Total Views |
Article On Keshawarpan Written By Ravi Gole

रवी गोळे यांचे ‘केशवार्पण’ हे पुस्तक नुकतेच सा. ‘विवेक’ने प्रकाशित केले. आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या विचारकार्याला स्मरून सेवा कार्यात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रातील आणि गोव्यातील काही संस्था हा ‘केशवार्पण’ पुस्तकाचा विषय. ‘केशवार्पण’ पुस्तकाचा परिचय म्हणण्यापेक्षा पुस्तक वाचून मला झालेली अनुभूती इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

बंधुतेचे श्रेष्ठ नाते, हद्य हदया जोडिते
भेदभावा तोडूनिया,एक्य येथे नांदते
एकतेचही ही तुतारी, केंशवाचा मंत्र बोलते
डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या नावाने कार्यरत असणार्‍या सेवाभावी संस्थांच्या सेवाकार्यात आणि एकंदर सर्वच कार्यप्रणालीच्या अंतरंगातला आत्मा म्हणजे वरील काव्यपंक्तीतले भाव आहेत. रवींद्र गोळे यांचे ‘केशवार्पण’ पुस्तक वाचताना मला हे सातत्यानेच जाणवत होते. ११० पानांचे ‘केशवार्पण’ पुस्तक. नावातच सारे आहे. केशवाला अर्थातच डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या विचार कार्याला अर्पण केलेले हे पुस्तक. त्यामुळेच या संस्थांबद्दल सांग्रसंगीत लिहिताना पुस्तकाच्या सुरुवातीलाच हे पुस्तक कुणाला अर्पण केले हे सांगताना रवींद्र लिहितात-”डॉ. केशव बळीराम हेडगेवार सेवागंगेचा प्रवाह समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्यास कटिबद्ध असणार्‍या केशवकुळातील भगीरथांना सविनय अर्पण.”

सदर पुस्तकामध्ये गोवा येथील केशव सेवा साधना, वाडा येथील ‘केशवसृष्टी ग्रामविकास योजना’, नंदूरबारची डॉ. हेडगेवार सेवा समिती, इचलकंरजी येथील डॉ. हेडगेवार रुग्णालय, छ. संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालय, माणगाव येथील डॉ. हेडगेवार सेवा समिती, जळगाव येथील ‘केशवस्मृती सेवा संस्था’ अशा सात संस्थांचा समग्र परिचय या पुस्तकामध्ये केला आहे. त्याचसोबतच डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी वर्षात सेवा निधीसंकलनासाठी सुरू झालेल्या ‘डॉ. हेडगेवार स्मारक सेवा निधी’ पुणे, ‘डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती’ चंद्रपूर, ‘डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती’ अकोले तीन संस्थांचा परिचयही या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. संस्थांच्या कार्याचा आढावा घेताना लेखक या पुस्तकात म्हणतात की, ”डॉ. केशव बळीराम हेगडेवार म्हणाले होते की, अपण विशेष कार्य करतो या भावनेऐवजी हे कार्य ईश्वरी कार्य आहे, असे मानून त्यात अंत:करणापूर्वक सहभागी होण्याचा प्रयत्न केला, तर परमेश्वर आपल्याला नक्कीच यश देईल. ”डॉ. हेडगेवार यांचे हे विधान उद्धृत करत लेखक पुस्तकातील दहा संस्थांच्या कार्याचा आत्माच व्यक्त करतात. लेखक लिहितो की, ”एखादी संस्था कशी चालते? समाजमनावर तिचा परिणाम काय होतो? आणि दीर्घकाळ व्रतस्थ भावनेने कार्यकर्ते कसे काम करतात या सार्‍या प्रश्नांची उत्तरे केशव साधना या शब्दात सामावली आहेत.”

असो, तर संस्थाची निर्मिती का? कशासाठी? कधी झाली? कोणी केली? संस्थेचे उद्दिष्ट, कार्य आणि सफलता आणि ध्येय काय आहेत याचा वेध घेत हे पुस्तक वाचकाला संस्थेच्या विचारकार्याचा जीवंत अनुभव देऊन जाते. त्याचबरोबर प्रत्येक संस्थेच्या निर्मितीसाठी आणि कार्यउद्दिष्टासाठी कार्यकर्त्यांची फळी कशी उभी राहिली? ‘केशवार्पण’ म्हणत त्याग आणि कष्टाची सीमा गाठत हे कार्यकर्ते त्यांच्या कार्यात कसे यशस्वी झाले याचा एक आलेखच हे पुस्तक मांडते. शेतकरी, वनवासी, दिव्यांग, महिला, दुर्गम भागात वसलेले आणि सर्वच भौतिक सुविधापासून वचिंत असलेल्या परिसरातील नागरिकांच्या विकासासाठी संस्था अनेक स्तरावर काम करतात. त्यांच्या सेवाकार्याचा विषय एका शब्दात मांडता येणार नाही. रवींद्र गोळे यांनी यथाशक्ती हा विषय मांडला आहे. ‘केशवार्पण’पुस्तकामध्ये संस्थेच्या कार्याबद्दल लिहिताना लेखक आणि कवी असलेल्या रवींद्र गोळे यांचे शब्दसौष्ठव जाणवते. ‘केशव सेवा साधना’ संस्थेतील दिव्यांग किंवा विशेष मुले कंदील पणत्या तत्सम वस्तू बनवतात.

ते पाहून रवींद्र म्हणतात, ”जगण्याचा सुगंध अनुभवता यावा आणि या विशेष मुलांचे जीवन फुलासारखे टवटवीत व्हावे, सुगंधित व्हावे यासाठीच तर केशव सेवा साधना आटापिटा करते आहे.” वाडा येथे ‘केशवसृष्टी ग्रामविकास’ प्रकल्पाचे ग्रामस्थांच्या जीवनाला मानवतापूर्ण काम पाहून लेखक लिहितो-”आज मुबलक पाण्याने चढण चढण्याचे कष्ट धुवून टाकले आहेत. वनक्षेत्रातील स्त्री पुरुष कष्टाळू असतात त्यांना दीक्षा दिली. साधने उपलब्ध करून दिली, तर कातळ फोडून पाणी काढण्याची ताकद त्यांच्या धमन्यांमध्ये खेळत असत याचा ‘केशवसृष्टी ग्रामविकास’ प्रकल्पातील कार्यकर्त्यांना अनेक वेळा अनुभव आला आहे.” संस्था नव्हे, तर एक जीवसृष्टी असावी, अशा पद्धतीने रवी गोळे यांनी प्रत्येक संस्थेबद्दल लिहिले आहे.

सेवाकार्य करणार्‍या आणि करू इच्छिणार्‍या व्यक्ती आणि संस्थांसाठी हे पुस्तक दिशादर्शक आहे. पुस्तकाचा तपशीलवार विचार करताना मला जाणवले की, रा. स्व. संघ शाखा आणि संघाचे विविध आयाम तसेच स्वयंसेवक या माध्यमातून रा. स्व. संघाचे विश्वरूप प्रगट होत असतेच. मात्र, या संस्था रा. स्व. संघाचे आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे विश्वकल्याणाची मानवतावादी प्रेरणा देणारे विचार प्रत्यक्षात साकारात आहेत. संघ काय असतो? किंवा संघाची स्थापना करणारे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या विचारांची प्रेरणा माणूस आणि त्याद्वारे समाजातही कसा आमूलाग्र बदल करू शकते याची अनुभूती घ्यायची असेल, तर रवींद्र गोळे यांचे ‘केशवार्पण’ पुस्तक नक्कीच वाचायला हवे. रवींद्र गोळे यांनी परिश्रमपूर्वक सकारात्मक दृष्टीने या प्रकल्पांचे अवलोकन केेले. कार्यकर्त्यांच्या मनाचे वााचन व प्रभावी शब्दरचना करून तुम्हा- आम्हा वाचक मंडळींना पुस्तकरूपाने उपलब्ध करून दिले आहे.

-भैय्याजी जोशी,
अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, रा.स्व.संघ
९५९४९६९६३८

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.