‘चांद्रयाना’च्या विश्वविक्रमी यशाचा काँग्रेसला पोटशूळ

    28-Aug-2023   
Total Views |
PM Modi Can't Name A Point On Lunar Surface, Says Congress

भाजप सरकारने केलेली कोणतीही कामगिरी काँग्रेसच्या नेत्यांना खरी वाटत नाही, याला काय म्हणावे! पुलवामा हल्ल्याच्या घटनेनंतर भारताने जो ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला होता, त्याचे पुरावे द्या, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे ‘चांद्रयान’ मोहिमेबद्दल असे काही तारे तोडण्यात येत असतील, तर आश्चर्य वाटायला नको!

बुधवार, दि. २३ ऑगस्ट रोजी ‘चांद्रयान-३’ मोहिमेतील ‘विक्रम’ लॅण्डर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगदपणे उतरवून भारताने एक इतिहास घडविला. भारताच्या अवकाश इतिहासात या घटनेची नोंद सुवर्णाक्षरांनी केली जाईल. जगातील कोणत्याच देशाला जे जमले नव्हते. ते भारताने करून दाखविले! या ऐतिहासिक घटनेची दाखल घेऊन दि. २३ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. तसेच, ‘विक्रम’ लॅण्डर जेथे उतरले, त्या जागेस ‘शिवशक्ती स्थळ’ आणि आधीच्या ‘चांद्रयान-२’ मोहिमेतील लॅण्डरचे ज्या भागात क्रॅश लॅण्डिंग झाले होते, त्या भागास ‘तिरंगा पॉईंट’ म्हणून ओळखले जाईल, असेही मोदी यांनी घोषित केले. सर्वच राष्ट्राच्या दृष्टीने हा आनंदाचा, अभिमानाचा क्षण होता. पण, आपल्या देशातील काही महाभागांच्या पचनी हा निर्णय पडला नाही. काँग्रेसचे एक नेते रशीद अल्वी यांनी, तर चंद्रावरील ती जागा मोदी यांच्या मालकीची आहे काय, असा प्रतिप्रश्न केला.

पण, रशीद अल्वी यांचे दात त्यांच्याच घशात घालण्यात आले. ‘चांद्रयान-१’ मोहिमेमध्ये जो लॅण्डिंग पॉईंट ठरविण्यात आला होता. त्यास ‘जवाहर पाँईंट,’ असे नाव देण्यात आले होते. रशीद अल्वी यांच्या हे लक्षात आणून दिले जाताच, ते गडबडले. नेहरू यांच्याशी कोणीच तुलना करता कामा नये, असे सांगून त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण, भाजप सरकारने केलेली कोणतीही कामगिरी काँग्रेसच्या नेत्यांना खरी वाटत नाही, याला काय म्हणावे! पुलवामा हल्ल्याच्या घटनेनंतर भारताने जो ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला होता, त्याचे पुरावे द्या, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे ‘चांद्रयान’ मोहिमेबद्दल असे काही तारे तोडण्यात येत असतील, तर आश्चर्य वाटायला नको! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू येथे जाऊन ‘इस्रो’च्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. या मोहिमेमध्ये महिला वैज्ञानिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. त्यांच्याशीही पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला. भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ काय साध्य करू शकतात, हे या ‘चांद्रयान-३’ मोहिमेने दाखवून दिले आहे.

‘इस्रो’चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी तर भारताकडे चंद्र, मंगळ आणि शुक्र यांच्यावर जाण्याची क्षमता असल्याचे मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले आहे. माध्यमांशी बोलताना एस. सोमनाथ म्हणाले की, “चंद्र, मंगळ आणि शुक्र यांच्यावर प्रवास करण्याची भारताची क्षमता आहे. पण, त्यासाठी अधिक गुंतवणुकीची गरज असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपण अंतराळ क्षेत्राचा विकास करायलाच हवा आणि असे केल्याने संपूर्ण देश विकसित होईल. ते आमचे ध्येय आहे. पंतप्रधान मोदी यांनी जी दृष्टी दिली आहे. त्याची पूर्तता करण्यास आम्ही तयार आहोत,’ असेही ते म्हणाले. भारताने आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी यान पाठविण्याचा निर्णय घेतला असून, हे यान दि. २ सप्टेंबर रोजी सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे. त्याचप्रमाणे ‘गगनयान’ मोहिमेच्या द्वारे तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठविण्याच्या मोहिमेची तयारी भारताकडून सुरू आहे. एकीकडे विकसित राष्ट्र म्हणून उभे राहण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू असतानाच अवकाशामध्ये विविध भरार्‍या मारण्याची सिद्धताही भारताकडून केली जात आहे. खरे म्हणजे सर्व देशवासीयांनी या प्रयत्नांचे स्वागत केले पाहिजे. पण, केंद्रातील भाजप सरकार हे सर्व करीत असल्याचे पाहून काही विरोधकांचा पोटशूळ उठला आहे. पण, त्याने काही बिघडत नाही. भारताचा प्रगतीचा अश्व रोखण्याची हिंमत कोणाकडेही नाही.

मेवाड विद्यापीठात ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा!

राजस्थानमधील चित्तोडगढ शहरातील मेवाड विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान हिंसाचार, दगडफेक यांच्यात झाले. या हिंसाचाराच्या दरम्यान एका गटाकडून ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणाही देण्यात येत होत्या. या विद्यापीठाच्या वसतिगृहातील भोजन कक्षामध्ये एका स्थानिक विद्यार्थांचा काही काश्मिरी विद्यार्थ्यांसमवेत वाद झाला. त्या वादामध्ये आणखी विद्यार्थी सहभागी झाल्याने दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या दगडफेकीत दोन्ही बाजूचे विद्यार्थी जखमी झाले. या हिंसाचाराबद्दल पोलिसांनी दोन्ही बाजूच्या ३६ विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. समाजमाध्यमांवर या घटनेचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये विद्यार्थ्यांचा एक गट हातात तलवारी घेऊन विद्यापीठ परिसरात हिंडत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, विद्यार्थी ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देत असल्याचा अन्य एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते रात्रीच्या वेळी विद्यापीठाबाहेर जमले होते. या कार्यकर्त्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांच्या विरुद्ध जोरदार घोषणा दिल्या.

विद्यापीठातील काश्मिरी विद्यार्थ्यांच्या विरुद्ध विद्यापीठ प्रशासन काहीच कारवाई करीत नसल्याचा आरोप बजरंग दलाचे मुकेश नहाटा यांनी केला. काश्मिरी विद्यार्थ्यांसमवेत संघर्ष होण्याची ही पाचवी घटना असल्याकडे बजरंग दलाने लक्ष वेधले. विद्यापीठातील या विद्यार्थ्यांकडे शस्त्रे कोठून आली, असा प्रश्नही विचारण्यात येत आहे. घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. मेवाड विद्यापीठाचे संचालक हरीश गुरनानी यांच्या मते, ‘’या वादाला कारण नसताना प्रादेशिक रंग दिला जात आहे. या विद्यापीठात २९ राज्यांमधील विद्यार्थी शिकत असून, त्यामध्ये जम्मू-काश्मीरमधील ४०० विद्यार्थ्यांचा समावेश आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली. विद्यापीठ परिसरातील संघर्ष शुल्लक वादातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाद किरकोळ होता, तर तलवारी कशा काय, काही विद्यार्थ्यांच्या हाती आल्या? तसेच वादास धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करून ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा कशा काय देण्यात आल्या? या सर्व प्रकारची सखोल तपासणी केल्यानंतर त्यामागील नेमके सत्य काय आहे, यावर प्रकाश पडेल.

तामिळनाडू : हिंदू विद्यार्थ्यांच्या हातातील गंडे कापून टाकले!

देशाच्या विविध भागांमध्ये हिंदूंवर अत्याचार केल्या जात असल्याच्या घटना उजेडात येत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थ्याने शाळेच्या फळ्यावर ‘जय श्रीराम’ लिहिल्याबद्दल त्याच्या शिक्षकाने त्या मुलास मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा निषेध करण्यात येत असून, याप्रकरणी मारहाण करणारा शिक्षक आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. त्या शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३२३, ३४२, ५०६ आणि बाल संरक्षण कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेच्याआधी उत्तर प्रदेशमधील मन्सूरपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एका शाळेतील शिक्षिकेने एका मुस्लीम विद्यार्थ्यास थोबाडीत मारण्यास वर्गातील अन्य विद्यार्थ्यास सांगितले होते. या घटनेस लगेचच जातीय रंग देण्यात येऊन काही माध्यमातून त्या शाळेच्या शिक्षिकेवर टीकेची झोड उठविण्यात आली. पण, जम्मू -काश्मीरमधील घटनेची दखल मात्र तेवढ्या गंभीरपणे घेण्यात आली नाही. अशा घटना घडत असतानाच तामिळनाडूमधील अशीच एक घटना उघडकीस आली आहे.

तामिळनाडूमधील एका शाळेमधील शिक्षिकेने आपल्या शाळेतील हिंदू विद्यार्थ्यांच्या हातात जे धार्मिक गंडे बांधले होते. ते तोडून टाकून आपण किती मोठा पराक्रम केला, हे त्यासंदर्भातील पोस्ट व्हायरल करून सर्वांना दाखवून दिले. उदयलक्ष्मी नावाच्या शिक्षिकेने हे गंडे (कालावा) तोडण्याचे कृत्य केले. आता सदर पोस्ट डिलिट करण्यात आली असली तरी, हे धाडस तिला कसे करावेसे वाटले? या घटनेची माहिती देताना ती शिक्षिका सांगते, “वर्गातील माझे महत्त्वाचे काम आटोपल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी हाताला गंडे बांधले होते, त्या सर्वांना एका रांगेत उभे राहण्यास सांगितले. नंतर कात्रीने ते गंडे कापून टाकले. गंडे का बांधू नयेत, हेही आपण सांगितले. सरकार असे धार्मिक गंडे बांधण्यास अनुमती देत नसल्याने ते कापून टाकणेच योग्य होते,” असेही त्या शिक्षिकेने म्हटले आहे. मुझफ्फरनगरच्या घटनेवरून आकाशपाताळ एक करणारे राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि त्यांची हुजरेगिरीची करणारी माध्यमे हिंदू विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाची तेवढ्याच तीव्रतेने का दखल घेत नाहीत, या प्रश्नाचे उत्तर काय असेल, हे सांगण्याची गरज आहे काय?

९८६९०२०७३२

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.