उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त फक्त थयथयाट! ; चित्रा वाघ यांची उबाठा गटावर टीका

    28-Aug-2023
Total Views |
BJP Leader Chitra Wagh On UBT Chief Uddhav Thackeray

मुंबई :
उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची काल हिंगोली येथे निर्धार सभा पार पडली होती. या सभेत त्यांनी नेहमीप्रमाणेच राज्य सरकारवर टोमणेबाजी केली होती. त्या सभेला आता भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. दरम्यान, भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उबाठा गटावर टीकेची झोड उठविली असून उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त आणि फक्त थयथयाट असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.

दरम्यान, कालच्या निर्धार सभेत उद्धव ठाकरेंना नेमका कशाचा राग आहे, तुम्ही जम्मू काश्मीरचं कलम ३७० हटवल्याचा राग आहे की अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहतंय याचा राग आहे, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसचे, चित्रा वाघ म्हणाल्या, देशाची अर्थव्यवस्था मजबूत बनतेय याचा राग आहे की आपण चंद्रावर पोहोचलो याचा राग आहे.

दरम्यान, देशाची कीर्ती जगभरात पोहोचलीय याचा राग आहे. उद्धव ठाकरे आम्हाला माहितेय की, तुमचा राग पंतप्रधान मोदी यांच्यावर असून पंतप्रधान रात्रंदिवस काम करताहेत हे बघूनच तुमचा जळफळाट आणि थयथयाट सुरू असल्याची टीका वाघ यांनी केली. तसेच, मागील वेळेस तुमच्या जळजळीवर बरनोल पाठवलं होतं पण आता कळतंय की त्याचा काही उपयोग नाही. कारण तुमची जळजळ ही मानसिक असून तुमचा पक्ष संपल्यापासून तुमचं मानसिक संतुलन बिघडलंय त्यामुळे तुम्ही काळजी घ्यावी अशा शेलक्या शब्दांत नेत्या चित्रा वाघ यांनी उध्दव ठाकरेंचा समाचार घेतला.